एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट IX 385 विमानाचा दि. २४ फेब्रुवारी रोजी एक मोठा अपघात टळला. कोझिकोड ते दम्माम (सौदी अरब) असा प्रवास करत असेलल्या विमानात हायड्रॉलिक फेल्यूअर झाल्याची शंका आल्यानंतर सदर विमान तिरुवनंतपूरम येथे वळविण्यात आले. या विमानात १८२ प्रवाशी होते, तिरुवनंतपूरममध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आले. कलीकट विमानतळाहून उड्डाण घेत असताना विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला होता, त्यामुळे विमानात हायड्रॉलिक बिघाड (फेल्यूअर) झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली. हायड्रॉलिक सिस्टिम काय असते? आणि विमानात या सिस्टिमचे महत्त्वाचे स्थान का असते? याबद्दल जाणून घेऊयात.

हायड्रॉलिक सिस्टिम म्हणजे काय?

विमानात अनेक असे भाग आहेत ज्याची उघडझाप होत असते. त्यापैकीच एक आहे एलेरॉन्स (Ailerons) विमानाच्या मध्यभागी असलेल्या दोन्ही पंखाच्या मागच्या बाजूला एलेरॉन्स असतात. एलेरॉन्स वर – खाली सरकवता येतात. वैमानिक इलेरॉन्स हलवून विमान हवेत वळविण्याचे काम करत असतो. तसेच विमानाच्या शेपटाच्या भागाला जी दोन छोटी पंख असतात त्याला उद्वाहक (Elevator) म्हणतात. हे छोटे उद्वाहक विमानाच्या उड्डाणात किंवा लँडिंगमध्ये मोठी भूमिका बजावत असतात. उद्वाहक (Elevator), एलेरॉन्ससारख्या उघड-झाप किंवा वर-खाली होणाऱ्या हालचालीमुळे वैमानिकाला विमानाचे नियंत्रण करणे सोपे जात असते. खालील चित्रामध्ये ही यंत्रणा स्पष्ट दिसते.

विमानाच्या बाह्यभागात असणारे महत्त्वाच्या प्रणाली (Photo – Nasa)

तसेच विमानाच्या शेपटाकडे उद्वाहकाच्या वर एक उभी पाती दिसते. त्याला रडर (Rudder) म्हणतात. हे रडर देखील डाव्या आणि उजव्या बाजूला हलवता येते. विमानाला डावीकडे किंवा उजवीकडे झुकवण्यासाठी या रडरचा वापर होतो. विमान टेक ऑफ घेत असताना किंवा लँडिंग करत असताना रडररच्या मदतीने वैमानिक विमानाची दिशा निश्चित करत असतो.

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे एलेरॉन्स, एलिवेटर्स आणि रडर हे विमानाच्या मागच्या बाजूस असणारी एक महत्त्वाची नियंत्रण व्यवस्था आहे. त्यांच्याशिवाय विमान हवेत स्थिर राहू शकत नाही किंवा विमान हवेतल्या हवेत वळविणे, टेक ऑफ किंवा लँडिंग करणे यासारख्या हालचाली करण्यासाठी विमान सक्षम होणार नाही. हायड्रॉलिक सिस्टिमचा नेमका संबंध येथेच येतो. या सर्व यंत्रणांची हालचाल हायड्रॉलिक सिस्टिमद्वारे केली जाते.

विमानाच्या शेपटाकडे असणारे रडर, एलेवेटर्स, स्टॅबिलायजर (Photo – Wikipedia)

हायड्रॉलिकचा वापर आणखी कुठे?

विमानाच्या बाह्य भागात आपल्याला केवळ पंख, शेपटाकडील पाती, चाकं दिसत असतात. पण या सर्वांमध्ये हायड्रॉलिकचा महत्त्वाचा वाटा असतो. या सर्व यंत्रांची योग्य वेळी, योग्य प्रमाणात उघडझाप झाली नाही, तर विमानाचा अपघात देखील होऊ शकतो. विमानाचे गिअर, विमानाच्या मधल्या दोन पंखावर असणारे फ्लॅग्स आणि स्लॅट्स विमानाच्या उड्डाणासाठी आणि लँडिंगसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच लँडिग केल्यानंतर विमानाचा वेग करण्यासाठी पंखावर असणारे स्पॉईलर उघडले जातात. ज्यामुळे हवा रोखली जाते आणि विमानाचा वेग मंदावतो. वेग कमी करण्यासाठी स्पॉईलर सोबतच व्हिल ब्रेक, थ्रस्ट रिव्हरसर्स आणि हॉरिझॉटंल स्टॅबिलायझरही सक्रीय होऊन काम करतात. या सर्व यंत्रणांना व्यवस्थित चालण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणा वापरली जाते.

हे वाचा >> विमान उडते असे!

हायड्रॉलिक कसं काम करतं?

वैमानिक विमानाला हवेत स्थिर ठेवणे आणि जमिनीवर उतरत असताना नियंत्रण राखण्यासाठी एलेरॉन्स, एलिवेटर्स आणि रडर यांची योग्य प्रमाणात हालचाल करत असतो. परंतु केवळ यंत्राच्या सहाय्याने अतिशय जड असे हे यंत्र हलविणे वैमानिकासाठी सोपे नसते. तसेच मोठ्या एअरबस किंवा बोईंगसारख्या मोठ्या विमानात एलेरॉन्स खूप मोठे आणि अतिशय जड असतात. तसेच उड्डाणादरम्यान त्याच्यांवर हवेचा देखील प्रचंड दाब असतो.

विमानातील हायड्रॉलिक सिस्टिम वेळोवेळी वैमानिकाच्या फिजिकल इनपुट अमलात आणण्यासाठी द्रवाचा दबाव निर्माण करते आणि त्यानंतर Magnified Force च्या सहाय्याने पृष्ठभागाचे नियंत्रण करते. जरी विमान वैमानिक उडवत असेल किंवा ते ऑटोपायलट मोडवर असेल तरीही Actuators द्वारे हायड्रॉलिक सिस्टिम कार्यान्वयित केली जाते.

अनेक छोट्या विमानांमध्ये हायड्रॉलिक प्रणालीवर चालणारे घटक नसतात किंवा काही विमानात अशंतः व मर्यादित स्वरुपात हायड्रॉलिक प्रणालीचा वापर होतो. मात्र सर्व मोठ्या प्रवासी विमानांमध्ये हायड्रॉलिक प्रणालीवर चालणारे घटक असतात, ज्याचे नियंत्रण करुन विमानाचे संतुलन राखले जाते.

हायड्रॉलिक स्टिटिममध्ये बिघाड झाला तर?

विविध कारणांमुळे जर विमानातील हायड्रॉलिक सिस्टिममधील द्रवाचा दाब कमी झाल्यास जसे की, गळती, अधिक गरम झाल्यास किंवा सदोष व जुने घटक असल्यास हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड उद्भवू शकतो. विमानाच्या सुरक्षेसाठी आधुनिक विमानांमध्ये हायड्रॉलिक स्टिटिम बसविण्यात आलेली आहे. एखादी प्रणाली अपयशी ठरल्यास लगेचच त्याला बॅकअप असतो. तसेच एकाचवेळी सर्व यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता खूप कमी असते. काही विमानांमध्ये वैमानिक स्वतः सर्व सिस्टिम चालवू शकतो. जसे की, हायड्रॉलिक स्टिटिममध्ये बिघाड झाल्यास गुरुत्वाकर्षणाचा वापर करत लँडिग गिअर ही प्रणाली वापरली जाते.

हे वाचा >> विमानात ऑक्सिजन कसा मिळतो? जाणून घ्या

हायड्रॉलिक इंजिनिअरिंगमध्ये जसे जसे नवीन बदल होत आहेत, तसे तसे आपत्तीजनक बिघाड आता अभावानेच होत आहेत. पण जेव्हा एखादा बिघाड होतो, तेव्हा वैमानिक उपलब्ध प्रणालीचे विश्लेषण करुन सद्यस्थितीत सुरु असलेल्या हायड्रॉलिक सिस्टिमचा वापर करुन विमान जवळच्या धावपट्टीवर उतरवू शकतो. प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या जीविताच्यादृष्टीने वैमानिक हा मार्ग अवलंबतात.

हायड्रॉलिक बिघाडामुळे मोठे विमान अपघात झाले आहेत का?

याबाबतीत युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट २३२ चे प्रकरण अभ्यासले जाते. १९ जुलै १९८९ रोजी मॅकडोनेल डग्लस DC-10 या विमानाने डेन्व्हरहून शिकोगाकडे प्रस्थान केले. विमानात २९६ प्रवाशी आणि क्रू सदस्य होते. DC-10 मध्ये तीन स्वतंत्र हायड्रॉलिक सिस्टिम होत्या. परंतु विमान ३७ हजार फूट उंचीवर असताना मागच्या बाजूच्या इंजिनमधील फॅन डिस्क हवेतच तुटली. ज्यामुळे इंजिन निकामी झाले. त्यामुळे तीनही हायड्रॉलिक सिस्टिम बिघडल्या. त्याचा परिणाम असा झाला की, कॅप्टन अल हेन्स आणि फर्स्ट ऑफिसर विल्यम रेकॉर्डस यांचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान उजवीकडे कलले. यावेळी सुदैवाने फ्लाइट इंजिनिअर डडली ड्वोरॅक आणि डेनिस फिच हे प्रवासी म्हणून त्याच विमानात होते. त्यांनी लागलीच कॉकपिटमध्ये धाव घेतली आणि क्रू सदस्यांची मदत केली.

कॅप्टन हेन्स यांनी इतर दोन कार्यरत इंजिनचा वापर करुन विमानाची दिशा नियंत्रणात आणली. त्यानंतर लोवा येथील विमानतळावर विमान उतरण्यासाठी सज्ज केले. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच उजव्या पंखाचा भाग जमिनीला घासल्यामुळे विमानाचे कार्टव्हिल तुटले आणि स्फोट झाला. या दुर्घटनेत १११ प्रवाशी मृत्यूमुखी पडले. तर १८४ प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना विमान इतिहासात आपत्कालीन परिस्थितीमधील टीमवर्कसाठी ओळखली जाते.

तसेच कॅप्टन चेस्ली सुली सुलेनबर्गर यांनी केलेला चमत्कार सर्वांनाच परिचित आहे. या घटनेवर सुली नामक टॉम हँक्स यांचा चित्रपट देखील आलेला आहे. २००९ मध्ये न्यूयॉर्क शहरातील एका नदीवर कॅप्टन सुली यांनी विमान उतरवले होते. विमानाचे दोन्ही इंजिन पक्ष्यांच्या धडकेने निकामी झाले होते. ही एकप्रकारची अतिशय दुर्मिळ अशी आणीबाणी होती. यासाठी कोणतेही प्रशिक्षण, चेकलिस्ट तयार नव्हती. तसेच तीनही हायड्रॉलिक सिस्टिम एकाचवेळी बंद पडण्याची ही अब्जावधीमधील एक घटना होती. कॅप्टन सुली यांनी त्यांच्या ‘हायेस्ट ड्युटी’ या पुस्तकात विमानाचे नदीवर यशस्वी लँडींग करण्याचा थरार विशद केला आहे.

Story img Loader