३० जुलै रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि गुवाहाटी या चार ठिकाणांहून जप्त केलेले ३० हजार किलो ड्रग्स नष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आभासी उपस्थितीत एनसीबीनं ही कारवाई केली आहे.‘आझादी का अमृत महोत्सवा’चा भाग म्हणून १ जूनपासून अमली पदार्थ निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
जप्त केलेले ड्रग्स नष्ट करण्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे?
नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, १९८५ च्या कलम ५२ (अ) नुसार, तपास यंत्रणा जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावू शकतात. पण तत्पूर्वी तपास अधिकाऱ्यांना नष्ट करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची तपशीलवार यादी तयार करावी लागते.
याबाबत अधिक माहिती देताना एनसीबी चंदीगडचे वकील कैलाश चंदर म्हणाले की, “जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्यापूर्वी संबंधित क्षेत्राचे एसएसपी, संचालक / अधीक्षक किंवा एनसीबीचे प्रतिनिधी, स्थानिक दंडाधिकारी आणि कायद्याशी संबंधित दोन व्यक्तींचा समावेश असलेली पाच सदस्यीय समिती स्थापन करावी लागते. त्यानंतर समितीच्या समक्ष जप्त केलेले ड्रग्स नष्ट केले जातात. हे ड्रग्स पूर्णपणे नष्ट करावे लागतात. या कारवाईत कणभर ड्रग्सही मागे राहता कामा नये, असा नियम आहे.”
ड्रग्स नष्ट करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे?
जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी एजन्सी सर्वप्रथम स्थानिक न्यायालयाकडून परवानगी घेते. त्यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवून हे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी ठरवून दिलेल्या ठिकाणी नेले जातात. संबंधित ठिकाणी गेल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याकडून घटनास्थळी आणलेल्या अमली पदार्थांची मोजणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली जाते.
त्यानंतर एकामागून एक अमली पदार्थांचे सर्व पॅकेट्स/गोनी किंवा पिशव्या आगीत (भट्टीत) टाकल्या जातात. नियमानुसार, जप्त केलेले सर्व अमली पदार्थ नष्ट होईपर्यंत समिती सदस्यांना घटनास्थळावरून कुठेही जाता येत नाही.
कोणत्या तपास यंत्रणांना ड्रग्स नष्ट करण्याचे अधिकार आहेत?
ज्या तपास यंत्रणांना ड्रग्स जप्त करण्याचे अधिकार आहेत, त्या प्रत्येक एजन्सीला स्थानिक दंडाधिकार्यांच्या पूर्वपरवानगीने जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्याचा अधिकार आहे. यामध्ये राज्य पोलीस दलासह सीबीआय आणि एनसीबी यांचा समावेश होतो.
जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट का केले जातात?
अमली पदार्थांचं घातक स्वरूप, जप्त केलेले ड्रग्स चोरीला जाण्याची शक्यता, ड्रग्स साठवून ठेवण्यासाठी असलेली जागेची कमतरता, आदी कारणांमुळे तपास यंत्रणा जप्त केलेले ड्रग्स तातडीने नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तपास यंत्रणा किंवा पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्स चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जप्त केलेले ड्रग्स तातडीने नष्ट करण्यावर तपास यंत्रणांचा भर असतो.