जगातील प्रत्येक धर्मात मृत्यूपश्चात अंत्यसंस्काराच्या विधीबद्दल काही ना काही तरी चालीरीती सांगितलेल्या आहेत. हिंदू धर्मात दहन करण्याची पद्धत आहे. हल्ली स्मशानभूमीत लोक विद्युतदाहिनीचाही वापर करतात. तर इतर काही धर्मांत मूठमाती देणे किंवा दफन करण्याची पद्धत प्रचलित आहे. अमेरिकेत मात्र मानवी देहाच्या अंतिम प्रवासासाठी एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. ‘सर्वांना शेवटी मातीतच जायचे आहे,’ असे वाक्य थोरामोठ्यांच्या तोंडून आपण अनेकदा ऐकले असेल. या वाक्याप्रमाणेच अमेरिकेत मानवी देहाची खरीखुरी माती करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ही माती साधीसुधी नसून ती कम्पोस्ट खताच्या तुलनेत जमिनीसाठी पोषक असल्याचे सांगितले जाते. Human Composting किंवा Green Death या नावांनी हा प्रकार ओळखळा जातो. सध्या अमेरिकेतील सहा राज्यांमध्ये ही पद्धत अवलंबली जात असून जगाच्या इतर देशांमध्येही प्रदूषण रोखणे आणि दफनासाठी असलेली जागेची मर्यादा लक्षात घेता, मानवी देहाचे कम्पोस्ट खत करण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे. मरणानंतरही इको फ्रेंडली असलेली ही पद्धत कशी पुढे आली? कम्पोस्ट कसे तयार होते? ते कुठे टाकले जाते? या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

दफनविधीला पर्याय देणाऱ्या मानवी कम्पोस्टिंग या पद्धतीला मान्यता देणारे न्यू यॉर्क हे सहावे राज्य बनले आहे. २०१९ मध्ये वॉशिंग्टनने या पद्धतीला सर्वात आधी मान्यता दिली होती. त्यानंतर कोलोरॅडो, ओरेगॉन, वर्माऊंट आणि कॅलिफॉर्नियाने हाच कित्ता गिरवला होता. या पद्धतीला Natural Organic Reduction असेही म्हटले जाते. मानवी कम्पोस्टिंग म्हणजे सोप्या भाषेत मानवी शरीराला पोषणसमृद्ध मातीत परिवर्तित करणे. मृत्यूपश्चात आपल्या मृतदेहाची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लागावी, अशी अनेकांची इच्छा असते. मागच्या काही वर्षांत ही पद्धत लोकप्रिय होत आहे. विशेषतः तरुणांचा याला चांगला पाठिंबा मिळत आहे.

दहन आणि दफन विधीमुळे प्रदूषण वाढते?

जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना मृतदेह पुरणे किंवा जाळणे या पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत आहे. सीएनएनने केलेल्या संशोधनानुसार, एक मृतदेह जाळल्यानंतर १९० किलो कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. ७५६ किलोमीटर गाडी चालवल्यानंतर जेवढा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो, तेवढाच एका मृतदेहाला जाळल्यानंतर तयार होतो. जाळण्यापेक्षा मृतदेह पुरणे पर्यावरणपूरक वाटत असेल. पण मृतदेह पुरण्याचेही धोके तेवढेच आहेत. मृतदेह पुरण्यासाठी जमीन कमी पडत आहे. तर मृतदेह पुरल्यानंतर मातीत विषारी घटक मिसळण्याचा धोका वाढतो.

पर्यावरणाच्या धोक्यासहितच याचा आर्थिक भारही लोकांना उचलावा लागतो. संशोधनावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या वॉक्सने (Vox) दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत अंत्यसंस्काराचा सरासरी खर्च सात ते दहा हजार डॉलर्सच्या घरात जातो. अनेकांना हा खर्च न परवडण्याजोगा असतो.

तर मानवी कम्पोस्टिंग ही प्रक्रिया अंत्यसंस्कारासहित ५,५०० डॉलर्समध्ये पार पडते. तसेच दहन करण्यापेक्षा या पद्धतीत ऊर्जादेखील कमी वापरली जाते. आपल्या जवळच्या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी ही पद्धत स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे अनेक जण याचा स्वीकार करत आहे. या पद्धतीतून जे मातीसदृश खत निर्माण होते, ते बागकाम, स्मारके आणि जंगल संरक्षण क्षेत्रासाठी दिले जाते.

या प्रक्रियेबाबत रिकम्पोज (Recompose) या कंपनीच्या सीईओ कॅटरिना स्पेड यांनी सीएनएन वृत्तवाहिनीशी बातचीत केली. सिएटलस्थित असलेल्या रिकम्पोज कंपनीला अशा प्रकारचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली आहे. त्या म्हणाल्या, “आपल्या देहाचे कम्पोस्टिंग होत असताना आपल्या शरीरातील अवयव कार्बन स्वरूपात मातीशी एकरूप होऊन जातात. दहनाच्या माध्यमातून हवेत कार्बन डायऑक्साईड सोडण्यापेक्षा आपला देह मातीच्या स्वरूपात पुन्हा पृथ्वीला प्रदान करणे कधीही चांगले.”

कम्पोस्टिंगची प्रक्रिया कशी होते?

मृतदेहाचे कम्पोस्टिंग करण्यासाठी रिकम्पोजने एक प्लांट उभा केला आहे. जिथे अत्यंसस्काराचे विधी पार पाडले जातात आणि मग देहाचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्याआधी मृतदेह स्वच्छ धुतला जाऊन बायोडिग्रेडेबल कव्हरमध्ये गुंडाळला जातो. आप्तेष्टांनी शेवटचा निरोप दिल्यानंतर मृतदेहाला एका पेटीत बंद केले जाते. या पेटीची लांबी आठ फूट आणि रुंदी चार फूट एवढी असते. मृतदेहासोबत अल्फाल्फा नावाची गवतसदृश वनस्पती, स्ट्रॉ (वाळलेले गवत) आणि सॉ-डस्ट (लाकडाचा भुसा) या वस्तू बंद पेटीत भरल्या जातात.

recompose body
रिकम्पोजर कंपनीतर्फे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार केले जात आहेत.

वनस्पती आणि भुशासहित नैसर्गिक पद्धतीने मृतदेहाचे विघटन (कुजण्याची प्रक्रिया) होण्यासाठी ३० दिवस पेटीत मृतदेह ठेवतात. कुजण्याच्या किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी बंद पेटीत ऑक्सिजन सोडला जातो. ज्यामुळे सूक्ष्म जिवाणू ही प्रक्रिया जैविक पद्धतीने आणि जलदगतीने पार पाडतात. दरम्यान या काळात बंद पेटीचे (container) तापमान ५५ अंश सेल्सियसपर्यंत ठेवले जाते. ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका पूर्णपणे टळतो. ३० दिवसांनंतर ॲरोबिक डायजेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन मृतदेह पोषकद्रव्य, हाडे आणि वैद्यकीय घटकांनी युक्त ढिगामध्ये परिवर्तित होतो. बंद पेटीतील ढीग यंत्राद्वारे जमिनीवर अंथरून त्यातील हाडांचा चुरा करण्यात येतो. त्यानंतर हा ढीग पुन्हा एकदा ३० दिवसांसाठी बद पेटीत ठेवला. सूक्ष्म जीव पुन्हा आपले काम करतात आणि या वेळी ढिगाऱ्याचे मातीमध्ये रूपांतर होते. या पूर्ण प्रक्रियेत एका मृतदेहापासून १८१ किलो एवढी माती तयार होते. जी मृताच्या नातेवाईकांना दिली जाते.

मानवी खत होण्याच्या प्रक्रियेला विरोध का होत आहे?

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या या पद्धतीला तरुणांमध्ये लोकप्रियता मिळत असली तरी कॅथॉलिक चर्चने याला विरोध दर्शविला आहे. कॅलिफॉर्नियाने मागच्या वर्षी या पद्धतीला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर चर्चने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ही पद्धत मृत व्यक्तीला आध्यात्मिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर आप्तेष्टांपासून लांब नेणारी आहे. एका चर्चचे प्रवक्ते स्टीव्ह पेहनीच यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आत्म्याच्या मुक्तीसाठी अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. देहाचे रूपांतर करणे हे भावनिक अंतर निर्माण करणारे आहे. मृत्यूपश्चात देहाचा सन्मान होणे आवश्यक आहे, तरच आत्मा अमर राहील.

Recompose after death
आपल्या जवळच्या व्यक्तिला बंद पेटीत टाकून अखेरचा निरोप दिला जातो.

अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणेच मानवी कम्पोस्टिंगलाही पाच ते सात हजार डॉलरचा खर्च येतो. ज्यामुळे ही पद्धत अंत्यसंस्काराला फार स्वस्त पर्याय म्हणून स्वीकारली जाण्याची शक्यता कमी वाटते.