एके काळी सहारा इंडिया परिवार या कंपनीचा प्रचंड दबदबा होता. देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला म्हणून सहारा इंडिया परिवाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात डांबले. सर्वात प्रभावशील उद्योगपती म्हणून २०१२ मध्ये इंडिया टुडेने त्यांना गौरविले होते. देशभरात पाच हजारांहून अधिक आस्थापनांतून सुमारे १२ लाख कर्मचारी असा लवाजामा बाळगणाऱ्या रॉय यांनी लोणावळ्याजवळ ‘ॲम्बी व्हॅली’ या आलिशान शहराची स्थापना केली होती. याच ‘ॲम्बी व्हॅली’ शेजारील सुमारे सातशे एकर भूखंडावर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणल्याने आता पुन्हा एकदा ‘ॲम्बी व्हॅली’ची चर्चा सुरु झाली आहे. काय आहे हे आलिशान शहर, आता सद्यःस्थिती काय आहे, याचा हा आढावा
‘ॲम्बी व्हॅली’ची निर्मिती…
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत लोणावळ्यापासून २३ किलोमीटर अंतरावर सुमारे १० हजार ६०० एकर भूखंडावर संपूर्ण मानवनिर्मित ‘ॲम्बी व्हॅली’ची निर्मिती करण्यात आली. विशिष्ट प्रकारच्या स्थानिक आंब्यांची भरपूर झाडे असलेले खोरे म्हणूनच या परिसराचे नाव तेव्हा ‘ॲम्बी व्हॅली’ ठेवले गेले. ग्रुएन- बॉबी मुखर्जी असोसिएट्स या विख्यात वास्तुरचनाकाराच्या संकल्पनेतून संपूर्णपणे एक आलिशान छोटेखानी शहर उभे करण्यात आले. तीन कृत्रिम तलावांची निर्मिती करतानाच वाराणसी येथील घाटाची प्रतिकृती, ३५६ एकरात पसरलेला विस्तीर्ण गोल्फ क्लब, हेलिपॅड, बहुउद्देशीय व्यापारी संकुल, सागापासून बनविलेली वेगवेगळ्या परदेशी पद्धतीची आलिशान कॉटेजेस, वेगवेगळ्या देशांतील खाद्यसंस्कृतीची अनेक रेस्तराँ तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक धाडसी क्रीडा प्रकार ते पाच ते २० कोटी रुपये किमतीचे आलिशान ५०० ते ६०० बंगले हे ‘ॲम्बी व्हॅली’चे वैशिष्ट्य. राज्यासह देशांतील अनेक राजकीय तसेच नामवंत मंडळींचे बंगले येथे असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सेबीने कारवाई सुरू केली तेव्हा राज्य शासनाने करचुकवेगिरीबद्दल ‘ॲम्बी व्हॅली’वर कारवाई केली होती. परंतु ही कारवाई नंतर मागे घेण्यात आली. २०१६ मध्ये हेलिपॅड आणि गोल्फ कोर्स बंद झाला होता. परंतु आता पुन्हा ‘ॲम्बी व्हॅली’ सुरू आहे. गर्भश्रीमंत व उच्चभ्रूंनाच परवडेल असे आलिशान विवाह सोहळे, चित्रपटांचे चित्रीकरण, पुरस्कार सोहळ्यांची या ठिकाणी रेलचेल असते. ‘ॲम्बी व्हॅली’मुळे आम्हाला रोजगार मिळाले हे स्थानिक मान्य करतात. मात्र हा परिसर इतका मोठा आहे की, नोंदणीशिवाय चिटपाखरूही आत शिरू शकत नाही, अशी सुरक्षा व्यवस्था आहे. आताही आठवड्याच्या शेवटी ‘ॲम्बी व्हॅली’च्या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. पोलिसांचा बंदोबस्त असला तर कुणीतरी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याची माहिती होते. सुब्रतो रॉयसह अनेक बडी मंडळी हेलिकॉप्टरने यायची. आता क्वचितच हेलिकॉप्टर दिसते, असेही स्थानिकांनी सांगितले.

सहारा इंडिया परिवार काय आहे?

भारतीय रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी म्हणून सहारा इंडिया परिवाराचे नाव घेतले जाते. वयाच्या तिसाव्या वर्षांपर्यंत गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे स्कूटरवरून खाद्यपदार्थ विकणारे सुब्रतो रॉय ६८ हजार कोटींचे मालक होतात आणि कर्मचाऱ्यांची संख्या १२ लाख इतकी होते. सहारा एअरलाईन्स, (जी नंतर बुडीत गेलेल्या जेट एअरवेजने खरेदी केली होती), लखनऊ येथील सहारा सिटी, या सिटीतील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊसची प्रतिकृती असलेला सुब्रतो रॉय यांचा बंगला, लोणावळ्यातील गर्भश्रीमंतांना परवडणारी ॲम्बी व्हॅली, मुंबई विमानतळजवळचे सहारा स्टार हॉटेल आदी कितीतरी मालमत्तांचे मालक असलेले सुब्रतो रॉय आपली कपंनी सार्वजनिक करायला गेले आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या (सेबी) जाळ्यात अडकले. तीन कोटी गुंतवणूकदारांचे सुमारे २४ हजार कोटी रुपये परत केले नसल्याचा आरोप थेट सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होतो आणि सुब्रतो रॉय यांना तुरुंगाची हवा खाली लागते. २०१६ मध्ये पॅरोलवर सुटलेल्या रॉय यांच्यावर ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचा दबाव आणला जातो. आतापर्यंत २२ हजार ५८९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. संबंधित गुंतवणूकदारांना ही रक्कम परत करण्यासाठी केंद्र सरकारने पोर्टल सुरू केले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये रॉय यांचे निधन झाले. आजही सहारा समूह कार्यरत आहे.

काय होता घोटाळा?

गोरखपूरमध्ये असताना सर्व छोटे व्यवसाय करून थकलेल्या सुब्रतो रॉय यांनी सुरुवातील फक्त ४८ गुंतवणूकदारांना दुप्पट पैशांचे आमीष दाखवून गावागावात दहा लाख एजंट आणि नंतर २९०० शाखांचे जाळे उभे करून चीट फंड चालविला. सुरुवातील एजंटमार्फत व नंतर कार्यालयात येऊन गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. कार्यालयात येऊन गुंतवणूक न करणाऱ्यांचे आधी भरलेले पैसे जप्त करण्यात येतील, अशा नोटिसा पाठविल्या. मजूर वा तळागाळातील गरजूंना जोपर्यंत एजंट होते तोपर्यंत रोज गुंतवणूक करता येत होती, परंतु शहरात जाऊन गुंतवणूक करणे शक्य न झाल्याने त्यांना पैशावर पाणी सोडावे लागले. या काळात कंपनीकडून मात्र मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत मालमत्ता घेतल्या जात होत्या. त्यापैकीच एक म्हणजे ॲम्बी व्हॉलीचा प्रकल्प. जेव्हा आपली कंपनी सार्वजनिक करण्यासाठी सेबीकडे नोंदणी केली तेव्हा सादर केलेल्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने सेबीने चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान तीन कोटी गुंतवणूकदारांच्या २४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मुद्दा पुढे आला. परंतु प्रत्यक्षात चौकशीत जेव्हा कंपनीने १२७ ट्रक भरून कागदपत्रे पाठविली, त्यापैकी २० हजार गुंतवणूकदारांना नोटिसा पाठविल्या, तेव्हा केवळ ६८ गुंतवणूकदारांनी उत्तरे दिली. उर्वरित नोटिसा परत आल्या. गुंतवणूकदार बोगस असल्याचे निष्पन्न झाले. मग हे गुंतणूकदार कोण, असा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. राजकीय मंडळी वा सिनेतारकांचा हा काळा पैसा तर नव्हता ना, असाही प्रश्न उपस्थित झाला असून तो अद्याप अनुत्तरित आहे.

सक्तवसुली संचालनालयाची कारवाई…

सहारा समूहाच्या विविध पॉन्झी योजनांतून गोळा करण्यात आलेल्या पैशातून बेनामी मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा सक्तवसुली संचालनाच्या कोलकता युनिटचा संशय होता. त्यातूनच ‘ॲम्बी व्हॅली’तील सुमारे ७०७ एकर बेनामी भूखंडाची माहिती मिळाली. हे भूखंड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावे होते. परंतु यापैकी एक भूखंड विकण्याचा एका कर्मचाऱ्याने प्रयत्न केला तेव्हा सहारा समूहाने त्यास आक्षेप घेतला. त्यामुळेच ते भूखंड सहारा समूहाचे असल्याची संचालनालयाची खात्री पटली. त्यामुळे ‘ॲम्बी व्हॅली’तील ७०७ एकर भूखंडावर टाच आणण्यात आली. हे भूखंड विविध कर्मचाऱ्यांच्या नावे असले तरी ते सहारा समूहाचेच बेनामी भूखंड आहेत, असे संचालनालयाचे म्हणणे आहे.

पुढे काय?

सहारा समूहामार्फतच आजही ‘ॲम्बी व्हॅली’चे व्यवस्थापन पाहिले जात आहे. सक्तवसुली संचालनालयाने फक्त ७०७ एकर भूखंडावर टाच आणली आहे. तो या ‘ॲम्बी व्हॅली’चा भागही नाही. ही तात्पुरती कारवाई आहे. त्याबाबत कंपनीकडून योग्य ते स्पष्टीकरण दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. अर्थात अधिकृतपणे काहीही सांगण्यास प्रवक्त्याने नकार दिला. मात्र सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे ‘ॲम्बी व्हॅली’ पुन्हा प्रकाशझोतात आली हे मात्र निश्चित.
nishant.sarvankar@expressindia.com