अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचा विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी याप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर २० एप्रिल रोजी खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. खटल्याचा निकाल २८ एप्रिल रोजी देण्यात येईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. या खटल्याचा निकाल देताना शुक्रवारी न्यायालयाने पुराव्याअभावी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका केली. हे प्रकरण नेमके काय होते, ते एवढे चर्चेत का आले, याची माहिती घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिया खान मृत्यूप्रकरण नेमके काय होते?

मुंबईमधील जुहू परिसरातील आपल्या घरात जिया ३ जून २०१३ रोजी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी ती केवळ २५ वर्षांची होती. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसोबतच्या नात्याबाबत लिहिलेले पत्रही पोलिसांना सापडले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी सूरजला याप्रकरणी आरोपी केले होते. तसेच त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच आरोपांतर्गत सूरजवर खटला चालवण्यात आला. उच्च न्यायालयाने १ जुलै २०१३ रोजी सूरजची जामिनावर सुटका केली.

हेही वाचा : विश्लेषण: पछाडलेल्या वास्तू, भीती, आणि हेरिटेज वॉक! का? कशासाठी?

जियाच्या आईने सूरजवर कोणते गंभीर आरोप केले?

सूरजची जामिनावर सुटका झाल्यानंतर जियाची आई राबिया खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच जियाने आत्महत्या केली नसून सूरजने तिचा खून केल्याचा आरोप राबियाने केला. तसेच या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने २०१४मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली. दरम्यान, राबियाने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच जियाकडे अमेरिकी नागरिकत्व होते. त्यामुळे तिच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाचा तपास अमेरिकेच्या एफबीआयकडे सोपवण्याची मागणी तिने केली. उच्च न्यायालयाने मात्र तिची ही याचिका फेटाळून लावली होती.

जिया खान प्रकरण एवढे चर्चेत का आले?

जिया खान आत्महत्या प्रकरण थेट हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्या काळात जिया व तिचा तत्कालिन प्रियकर सूरज यांच्याकडे आगामी सुपरस्टार म्हणून पाहिले जात होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आदित्य पांचोलीचा सूरज मुलगा होता. जियानेही ‘नि:शब्द’, ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार यांच्यासोबत काम केले होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसह चाहत्यांसाठी तिचा मृत्यू हा मोठा धक्का होता. त्यात जियाच्या आईने सूरजवर थेट हत्येचा आरोप केल्यामुळे आणखी खळबळ उडाली. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले.

हेही वाचा : थायलंडमध्ये राजकीय पक्षाने सेक्स टॉइज कायदेशीर करण्याचे आश्वासन का दिले?

सीबीआयच्या तपासात काय निष्पन्न झाले?

सीबीआयकडे २०१४ मध्ये हे प्रकरण आले. त्यानंतर त्यांनीही याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. मुंबई पोलीस आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणांनी जियाची हत्या झाली नसून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र राबियाने तिच्या मुलीची हत्या केल्याचा दावा केला आणि जियाच्या अभिनेता प्रियकरावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा नव्हे तर हत्येचा खटला चालवावा अशी मागणी केली. पण सीबीआयच्या तपासानुसार हे प्रकरण आत्महत्याच असल्याचे निष्पन्न झाले. जियाच्या आईच्या आरोपांशिवाय सूरजविरोधात सीबीआयला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. तसेच पुरावा म्हणून जियाने सूरजला लिहिलेले एक पत्र सीबीआयच्या हाती लागले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is actress jiya khan suicide case her boyfriend sooraj pancholi print exp ssa
Show comments