हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ, ऑस्कर २०२२च्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर त्याच्या जाऊन कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. हे दृश्य पाहून चाहत्यांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले. नेहमी शांत दिसणाऱ्या विल स्मिथने असे काहीतरी केले यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. येताच त्याने एक विनोद केला. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली. कारण क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली.

विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकेट स्मिथ आहे. जेडाला अ‍ॅलोपेसिया नावाचा आजार आहे, त्यामुळे तिच्या डोक्याचे केस गळत आहेत. तिने पहिल्यांदा २०१८ मध्ये याबद्दल भाष्य केले होते आणि तेव्हापासून तिने सोशल मीडियावर या स्थितीसह जगण्याच्या तिच्या आव्हानांबद्दल माहिती दिली आहे. आज आपण अ‍ॅलोपेसिया या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अ‍ॅलोपेसिया एरिटा म्हणजे काय?

अ‍ॅलोपेसिया एरिटा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लहान लहान पॅचमध्ये केस गळतात. या ऑटोइम्यून डिसऑर्डरमध्ये, रोगप्रतिकारक प्रणाली केसांच्या कूपांवर हल्ला करते, ज्यामुळे केस झपाट्याने तुटतात आणि टाळूवर पॅच दिसू लागतात. टाळू व्यतिरिक्त, काही लोकांना भुवया, पापण्या आणि चेहऱ्यावरही अशा प्रकारची समस्या उद्भवू लागते. या स्थितीत बनलेल्या पॅचमुळे केस परत येण्यास त्रास होतो.

ही समस्या का उद्भवते?

अ‍ॅलोपेसिया एरिटा का होतो याबद्दल संशोधकांना स्पष्ट कल्पना नाही. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती बाहेरील तत्त्वांऐवजी शरीराच्या पेशींवर हल्ला करू लागते तेव्हा ऑटोइम्यून स्थिती विकसित होते. अ‍ॅलोपेशिया एरियाटाची समस्या अशा लोकांमध्ये आढळते ज्यांना आधीच इतर काही ऑटोइम्यून समस्या आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला ही समस्या आहे. टाइप १ मधुमेह किंवा संधिवात असलेल्या लोकांना देखील या आजाराचा धोका असू शकतो.

अ‍ॅलोपेसिया एरिटा कसा ओळखावा?

अ‍ॅलोपेसिया एरिटा या आजारात केस गळणे सर्वात सामान्य आहे. केस सहसा टाळूवर लहान पॅचमध्ये गळतात. हे पॅच अनेकदा काही सेंटीमीटर मोठे असू शकतात. केस गळणे अचानक सुरू होऊ शकते किंवा हळूहळू विकसित होऊ शकते. पॅच पडलेल्या भागात खाज सुटणे किंवा जळजळ देखील होऊ शकते. अर्ध्याहून अधिक रुग्ण उपचारानंतर एका वर्षात बरे होतात, परंतु ही समस्या पुन्हा येऊ शकते.

अ‍ॅलोपेसिया एरिटासाठी उपचार काय आहे?

या समस्येवर सध्या कोणताही विशिष्ट उपचार नाही. उपचारात डॉक्टर काही औषधे देऊ शकतात ज्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. बहुतेक कॉर्टिकोस्टिरॉईड्स यासाठी वापरली जाऊ शकतात. उपचाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तीला स्वतःच्या पेशींना नुकसान होण्यापासून रोखण्याचा देखील प्रयत्न करतात. ही एक स्वयंप्रतिकार स्थिती असल्याने, ती पूर्णपणे बरी होणे कठीण होऊ शकते. दरम्यान, केसगळतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is alopecia areata know the symptoms pvp
Show comments