भारतातील ई-कॉमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चा प्राइम डे सेल २० जुलै रोजी सुरू झाला. ज्या ग्राहकांकडे अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यत्व आहे त्यांना अनेक वस्तूंवर सवलती आणि वेगवेगळ्या डील मिळाल्या. ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनी ‘प्राइम डे’पासून झालेल्या कमाईचे आकडे जाहीर करत नाही, मात्र ‘अ‍ॅडोब अ‍ॅनालिटिक्स’ने दिलेल्या महितीनुसार, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये प्राइम डे असताना ग्राहकांनी मागील मंगळवारी आणि बुधवारी १४.२ अब्ज डॉलर खर्च केले. यावर्षी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, जपान, सौदी अरेबिया आणि सिंगापूरसह २० देशांमधील ग्राहकांना प्राइम डे सेलचा लाभ घेता आला. कंपनीने आठ वर्षांपूर्वी ‘प्राइम डे’ कार्यक्रम लाँच केला होता. या संकल्पनेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला? यातून कंपनीला किती फायदा होतो? खरंच वस्तूंच्या किमती कमी असतात का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅमेझॉन प्राइम डे म्हणजे काय?

प्रत्येक उन्हाळ्यात मर्यादित एक किंवा दोन दिवसांच्या कालावधीसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप धारकांसाठी प्राइम डे सेल आयोजित केला जातो. सदस्यत्वाची किंमत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी असते आणि सदस्यांना इतर लाभांबरोबरच मोफत आणि जलद डिलिव्हरीचाही पर्याय मिळतो. २०२३ मध्ये भारतात प्राइम डे सुरू असताना एका मिनिटात २२,१९० ऑर्डर्स देण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी दोन दिवसांच्या प्राइम डेमध्ये, प्राइम सदस्यांनी जगभरात ३७५ दशलक्षपेक्षा जास्त वस्तू खरेदी केल्या; ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्राइम डे कार्यक्रम ठरला.

हेही वाचा : ‘बैजूज’च्या संस्थापकांची १७,५४५ कोटींची संपत्ती शून्यावर कशी आली? स्वत:च्या कंपनीतला अधिकार का गमावला?

‘अ‍ॅमेझॉन’ने प्राइम डे कार्यक्रम का लाँच केला?

‘अ‍ॅमेझॉन’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त १५ जुलै २०१५ रोजी अमेरिकेत पहिला प्राइम डे आयोजित करण्यात आला होता. भारतात जुलै २०१७ मध्ये पहिल्यांदा प्राइम डेचे आयोजन करण्यात आले होते. ‘असोसिएटेड प्रेस’च्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये उन्हाळ्यात वस्तू खरेदीचा वेग मंदावतो असे मानले जाते. त्या काळात तेथील लोक फिरण्यावर आणि रेस्टॉरंट्सवर जास्त खर्च करतात. परिणामी, विक्रीला चालना मिळावी म्हणून कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळे ऑफर्स घेऊन येतात. अलीबाबासारख्या चिनी ई-कॉमर्स कंपन्यांनीही त्यांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी ही रणनीती आखली आहे.

उदाहरणार्थ, २००९ मध्ये अलीबाबाने ११ नोव्हेंबरला ‘सिंगल्स डे’ सेलचे आयोजन केले होते. ‘व्हॅलेंटाईन डे’ला पर्याय म्हणून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करून या सेलचे आयोजन करण्यात आले होते. ‘अलीबाबा’ या चिनी ई-कॉमर्स कंपनीच्या या संकल्पनेला इतका प्रतिसाद मिळाला की, आता दरवर्षी ‘सिंगल्स डे’ सेलचे आयोजन केले जाते. २०१९ मध्ये अलीबाबाने चार तासांचा लाईव्ह शोदेखील आयोजित केला होता, ज्यामध्ये टेलर स्विफ्टसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश होता. त्याच वर्षी ‘अ‍ॅमेझॉन’ने त्यांच्या प्राइम सदस्यांसाठी एक लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता; ज्यात टेलर स्विफ्ट आणि दुआ लिपा यांच्या लाईव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते.

‘प्राइम डे’ केवळ कंपनीच्या फायद्याचा?

इतर वेळीही ग्राहकांना विविध उत्पादन श्रेणींवर डिल्स मिळतच असतात. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला असे आढळून आले की यावर्षी ‘अ‍ॅमेझॉन’वर अ‍ॅपल, सॅमसंग आणि वन प्लस उत्पादनांसाठी जास्त सूट मिळणार आहे. परंतु, न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘वायरकटर’ या वेबसाइटने म्हटले आहे की, अमेरिकेमध्ये या कार्यक्रमांमध्ये भरीव बचतीऐवजी केवळ हाइप म्हणून म्हणजेच इतर लोक सहभागी होत आहे म्हणून लोक या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे वेबसाइटचे सांगणे आहे.

२०१७ च्या ब्लूमबर्ग ओपिनियन आर्टिकलमध्ये पत्रकार शिरा ओव्हिडने लिहिले, “जर प्राइम डे हा ‘अ‍ॅमेझॉन’साठी एक महत्त्वाचा आर्थिक कार्यक्रम असेल आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून राबवला जात नसेल, तर याविषयी कंपनीला गुंतवणूकदारांना सांगावे लागेल. मागील वर्षीच्या तिमाहीत ‘अ‍ॅमेझॉन’च्या कमाईच्या अहवालात प्राइम डेचा एकदाही उल्लेख केला गेला नाही.” त्यांनी असेही लिहिले की, प्राईम डे सामान्य विक्रीचा वेग वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. लोगान कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक प्राचार्य स्टीफन ली यांनी या वर्षी ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले की, प्राईम डे हा पूर्वीपेक्षा कमी प्रभावी ठरत आहे. ब्लूमबर्गने असाही अंदाज वर्तवला आहे की, अमेरिकेमध्ये सतत होणारी चलनवाढ ही विक्री कमी होण्याचे एक कारण असू शकते. वॉलमार्ट आणि टार्गेट यांसारख्या इतर मेगा-ब्रँड्सनीही ‘प्राइम डेज’सारखी सवलत देण्यास सुरुवात केली आहे.

‘प्राइम डे’साठी कामगारांचा जीव संकटात?

प्राइम डे इतर कारणांमुळेदेखील प्रकाश झोतात आला आहे. ‘सिनेटर बर्नी सँडर्स’च्या नेतृत्वाखालील ‘यूएस सिनेट’च्या अहवालात एप्रिलमध्ये असे आढळून आले की, वस्तू पॅक करणाऱ्या गोदाम कामगारांसाठी हे दिवस जोखमीचे असतात. “कंपनीने गेल्या वर्षी ३६ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला असूनही आणि गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या सीईओने २७५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान भरपाई देऊनही, अ‍ॅमेझॉन आपल्या कामगारांना पगारवाढ देत नाही, तसेच ‘अ‍ॅमेझॉन’कडून त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा पूर्णपणे अवमान केला जातो. हे अस्वीकार्य आहे आणि हे बदलले पाहिजे,” असेही सँडर्स म्हणाले.

हेही वाचा : देशातील १६ लाख लहान मुलं लसीकरणापासून वंचित, ‘डब्लूएचओ’ची धक्कादायक माहिती; कारण काय?

पर्यावरणीय दृष्टिकोनातूनदेखील प्राइम डेला चुकीचे मानले जाते, कारण अशा सेल्समुळे अनावश्यक वस्तूंच्या वापरास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळू शकते. डिलिव्हरीमुळे इंधन उत्सर्जन होते, पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकसह रीसायकल करणे कठीण असलेल्या इतर सामग्रीचा वापर होतो. अतिवापरामुळे मोठ्या प्रमाणात कचराही तयार होतो; ज्यामुळे प्रदूषण होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is amazon prime day sale rac
Show comments