गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स समूहाचे ‘वनतारा’ संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पुन्हा चर्चेत आले. ‘वनतारा’ हे प्राणीसंग्रहालय आहे की पुनर्वसन व बचाव केंद्र, असा प्रश्न असला तरीही केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाच्या उल्लंघनाचीदेखील चर्चा सुरू झाली आहे.
प्राणीसंग्रहालय, पुनर्वसन व बचाव केंद्र आणि संक्रमण केंद्रातील फरक काय?
प्राणीसंग्रहालय आणि पुनर्वसन व बचाव केंद्र हे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या अखत्यारित येतात. प्राधिकरणाचे सर्व नियम त्यांना लागू असतात. तर संक्रमण केंद्र म्हणजेच ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र प्राधिकरणाच्या अखत्यारित येत नाही. प्राणीसंग्रहालयात वन्यप्राणी प्रदर्शित करता येतात. म्हणजेच पर्यटकांना प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राणी पाहण्याची मुभा असते. मात्र, त्यांना हात लावता येत नाही. पुनर्वसन व बचाव केंद्रात मानव-वन्यजीव संघर्षात जेरबंद केलेले, रस्ते अपघातात वा इतर काही कारणांमुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन केले जाते. मात्र, या केंद्रातील प्राणी प्रदर्शित करता येत नाहीत किंवा या केंद्रात बाहेरची कोणतीही व्यक्ती आत येऊ शकत नाहीत. संक्रमण म्हणजेच ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात वन्यप्राण्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. याठिकाणी पर्यटन करता येत नाही. मात्र, शैक्षणिकदृष्ट्या माहिती मिळावी म्हणून (वन्यप्राण्यांपासून दूर राहात) या ठिकाणी प्रवेश दिला जातो.
‘वनतारा’ प्राणीसंग्रहालय की पुनर्वसन केंद्र?
गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’चे अधिकृत नाव ‘ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ असे आहे. मात्र ते ‘वनतारा’ म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ ‘जंगलाचा तारा’ असा होतो. सुमारे तीन हजार एकरवर पसरलेल्या या खासगी वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन सुविधा असलेल्या केंद्रात जगभरातील ४३ प्रजाती आहेत. ‘वनतारा’ हे पुनर्वसन व बचाव केंद्र असल्याने याठिकाणी प्राणी प्रदर्शित करता येत नाहीत. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, काळजीवाहू याव्यतिरिक्त इतरांना वन्यप्राणी हाताळणे तर दूरच, पण याठिकाणी प्रवेश दिला जाऊ शकत नाही. हे प्राणीसंग्रहालय नसल्यामुळे याठिकाणी पर्यटनदेखील करता येत नाही.
प्राण्यांच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह का?
‘वनतारा’मध्ये येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या स्रोतांवर अनेक वन्यजीव तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या विविध भागातून या पुनर्वसन व बचाव केंद्रात प्राणी आणले आहेत. भारतातूनच नाही तर बाहेरूनदेखील वन्यप्राणी आणले आहेत. त्यामुळे हे सर्वच वन्यप्राणी कायदेशिररित्या वाचवले गेले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आसाम राज्यातून २१ हत्तींना पशुरुग्णवाहिकेतून या केंद्रात हलवण्यात आले. तर महाराष्ट्रातूनदेखील काही हत्ती या ठिकाणी पाठवण्यात आले. महाराष्ट्रातील गोरेवाडा बचाव केंद्रातून १५ वाघ ‘वनतारा’त स्थलांतरित करण्यात आले. गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने बिबटे पाठवले होते. तर विदेशातून देखील याठिकाणी प्राणी आणले गेले. मात्र, प्राण्यांचे स्थलांतरण करताना केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून स्थलांतरणाची परवानगी तसेच वन्यप्राण्यांची वाहतूक करताना ‘वाहतूक परवाना’ घ्यावा लागतो. गुजरातमधील जामनगरच्या या केंद्रात प्राणी स्थलांतरित करताना प्राधिकरणाकडून परवानगी व वाहतूक परवाना घेतला होता का, असा प्रश्न वन्यजीव तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
वन्यप्राणी हाताळणीचे नियम काय?
प्राणीसंग्रहालय, पुनर्वसन व बचाव केंद्र तसेच संक्रमण केंद्रात तेथील पशुवैद्यकीय अधिकारी, त्या केंद्राचे काळजीवाहक यांच्याव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना वन्यप्राणी हाताळता येत नाहीत. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार तो गुन्हा ठरतो. राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब थोरात नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी महाराजबाग प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. १५ ऑगस्ट २००९ ला ते या प्राणीसंग्रहालयात आले आणि त्यांनी वाघाच्या बछड्याच्या पाठीवर थोपटले. त्यांचे हे छायाचित्र सर्व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आणि खळबळ उडाली. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. अखेर दिल्लीत त्यांनी या घडलेल्या प्रकाराची माफी मागितली आणि प्रकरण निवळले. २०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील वाघिणीच्या बछड्यावर हात फिरवण्याचा मोह तत्कालीन महापौर व सभापतींना आवरला नाही. त्याचेही छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे तेदेखील अडचणीत आले. आता नुकतेच जागतिक वन्यजीव दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जामनगरच्या पुनर्वसन व बचाव केंद्रात प्राणी हाताळले आणि सिंहांच्या पिल्लांना दूध व अन्न दिले. त्यामुळे यावरदेखील वन्यजीव तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, प्रत्यक्षात समोर येऊन कुणीही यावर भाष्य करणे टाळले.
प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे अधिकार काय?
संक्रमण केंद्र वगळता प्राणीसंग्रहालय, पुनर्वसन व बचाव केंद्र हे केंद्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. त्यामुळे त्याच्या मान्यतेपासून तर वन्यप्राण्यांच्या व्यवस्थेवर प्राधिकरणाची नजर असते. यात वन्यजीव संरक्षण कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर कार्यवाही करण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांचे प्राण्यांसाठी अनाथालय आहे. त्यांची अनेक छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसिद्ध होत होत्या. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे तक्रार झाल्यानंतर तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यावेळी पद्मश्री परत करण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई थांबली. तर वर्ध्यातील पीपल्स फॉर ॲनिमल्स या मनेका गांधी यांच्या संस्थेच्या अनाथालयावर काही वर्षांपूर्वी नियम आणि कायद्याचे उल्लंघनावरून तत्कालीन उपवनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी कारवाईचा बडगा उगारला होता.