-शैलजा तिवले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात करोनाचा प्रसार वाढत असताना प्राण्यांचे करोनापासून रक्षण करण्यासाठी भारतातील पहिल्या लशीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अनॅकोव्हॅक्स’ (What is Anocovax) ही प्राण्यांसाठीची करोना प्रतिबंधात्मक लस भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या हरियाणा येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राने तयार केली आहे. घोड्यांसह ही लस कुत्रे, उंदीर, ससे, बिबट्या आणि सिंह यांच्यासाठीही सुरक्षित आहे.

प्राण्यांसाठी लस का?

मानवाप्रमाणे कुत्रे, मांजर, वाघ यासह काही प्राण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. करोनापासून प्रतिबंध करण्यासाठी मानवी शरीरासाठी काही लशी विकसित केल्या आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांनाही करोनाची बाधा होऊ नये यासाठी ही लस तयार करण्यात आली आहे.

ही लस कशी काम करते?

प्राण्यांसाठी तयार केलेल्या अनॅकोव्हॅक्स या लशीमध्ये करोनातील संपूर्ण विषाणू घटकांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये हे विषाणू दुबळे किंवा निष्क्रिय करून त्याचा वापर केलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये करोनाच्या डेल्टा स्वरूपाच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही लस डेल्टा आणि ओमायक्रॉन अशा दोन्ही स्वरूपाच्या करोना विषाणूपासून संरक्षण करू शकते. लशीचा प्रभावीपणा  आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अलहॅड्रोजेलचा वापरही यात करण्यात आला आहे.

या लशीचे फायदे काय?

घोड्यांसह कुत्रे, उंदीर, ससे, बिबट्या, सिंह या प्राण्यांचे करोनापासून संरक्षण करण्यासाठी ही लस फायदेशीर आहे. तसेच मानवापासून प्राण्यांना लागण होणाऱ्या करोना संसर्गापासूनही या लशीमुळे संरक्षण मिळेल. प्राण्यांपासून मानवामध्ये करोनाचा प्रसार होण्याचा धोका तुलनेने अत्यल्प असल्याचे आढळले आहे. या लशीचा मुख्य उद्देश प्राण्यांमध्ये होणारा करोना प्रसार रोखणे हा आहे. विशेषत: प्राणी संग्रहालयातील किंवा नामशेष होणाऱ्या प्रजातींचे करोनापासून संरक्षण करण्यास या लशीचा फायदा होईल.

जगभरात प्राण्यांना करोना झाल्याचे कधी आढळले?

फेब्रुवारी २०२० मध्ये हाँगकाँगमध्ये कुत्र्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळले. जानेवारी २०२१ मध्ये सॅन डिआगो सफारी पार्क या प्राणिसंग्रहालयातील एका माकडाला करोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. जगभरात प्रथमच माकडाला करोनाची बाधा झाल्याचे या वेळी निदर्शनास आले होते आणि संग्रहालयातील आठ गोरिलांना लागण झाली होती. अमेरिकेतील नेब्रस्का येथील प्राणिसंग्रहालयातील दोन हिमबिबट्यांचा नोव्हेंबर २०२१ मध्ये करोनामुळे मृत्यू झाला. जगभरात वाघ, सिंह,मिंक,हिम बिबट्या, जंगली मांजर, फेरेट, कुत्रा आणि मांजर या प्राण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे.

प्राण्यांना करोनाबाधा झाल्याचे भारतात आढळले आहे का?

मे २०२१ मध्ये हैद्राबादमधील प्राणिसंग्रहालायातील आठ सिंहांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. गुजरातमध्ये कुत्रे, गाई आणि म्हशींना करोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. जून २०२१ मध्ये चेन्नईमधील प्राणिसंग्रहालयातील दोन सिंहांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. प्राण्यांमध्ये प्रामुख्याने खोकला आणि भूक मरणे व त्यामुळे अन्नभक्षण सोडणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून आली आहेत.

प्राण्यांसाठी आणखी काही लशी उपलब्ध आहेत का?

एप्रिल २०२१ मध्ये रशियाने प्राण्यांसाठी करोना प्रतिबंधात्मक लस तयार केली होती. ही प्राण्यांसाठीची जगातील पहिली लस होती. ही लस कुत्रे, मांजर, कोल्हा आणि मिंक यांसाठी लस प्रभावशाली असल्याचे आढळले होते. जगभरात प्रथम हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये कुत्र्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यानंतर अमेरिकेतील झोयेटिस या औषध कंपनीने कुत्रा आणि मांजरासाठी करोना प्रतिबंधात्मक लशीची निर्मिती केली. झायोटिसने तयार केलेली लस अमेरिका, कॅनडासह १३ देशांमधील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात आली आहे. ‘अनॅकोव्हॅक्स’ ही प्राण्यांसाठीची भारतातील पहिली करोना प्रतिबंधात्मक लस आहे.

कुत्रा, मांजर किंवा तत्सम प्राण्यांसाठी प्रतिजन चाचणी संच म्हणजे काय?

लशीव्यतिरिक्त कृषी संशोधन परिषदेने कुत्रा, मांजर अशा प्राण्यांमध्ये करोना विरोधात लढणारी प्रतिपिंडे तयार झाली आहेत का याचे निदान करण्यासाठी ‘कॅन-सीओव्ही२-एलायझा’ हा चाचणी संच तयार केला आहे. ही चाचणी भारताने विकसित केली असून बाजारात प्राण्यांमधील प्रतिपिंडांची पडताळणी करण्यासाठी सध्या इतर कोणत्याही चाचण्या उपलब्ध नाहीत. याचे स्वामित्व हक्क घेण्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is anocovax india first covid 19 vaccine for animals print exp scsg