‘अॅपल’ या तंत्रज्ञान जगतातील मोठ्या कंपनीने नुकतेच भारतात आपले पहिले स्टोअर सुरू केले आहे. मुंबईतील बीकेसी या भागात या स्टोअरची सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच अॅपल दिल्लीतही नव्या स्टोअरचे उद्घाटन केले जाणार आहे. असे असतानाच आता अॅपलने जारी केलेल्या बचत खात्याची चर्चा जगभरात होत आहे. या बचत खात्याच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर ४.१५ टक्का व्याज मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर अॅपलने नव्याने आणलेले बचत खाते काय आहे? त्याचा सामान्य ग्राहकांना काय उपयोग होणार आहे? हे जाणून घेऊ या…
‘अॅपल’ने या उपक्रमासाठी ‘गोल्डमॅन सॅच’ या बँकिंग क्षेत्रातील कंपनीसोबत करार केला आहे. ‘अॅपल’चे बचत खाते उघडण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. यासह खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवण्याचीही गरज नाही.
हेही वाचा >> अॅपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन, खुद्द CEO टीम कुक यांनी लावली हजेरी; जाणून घ्या मुंबईतील स्टोअरची विशेषता काय?
‘अॅपल’ने जारी केलेले बचत खाते नेमके काय आहे?
अॅपल व्हॅलेट अॅपमध्ये बचत खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांनी एकदा बचत खाते उघडल्यानंतर त्यांना कॅशबॅकच्या माध्यमांतून रोज पैसे मिळू शकतात. मिळालेली ही रक्कम अॅपल कार्डमध्ये जमा होईल. अॅपल कार्डचा वापर केल्यानंतर रोज पैसे मिळू शकतात. अॅपलने सांगितल्याप्रमाणे तुम्ही अॅपल कार्डचा वापर करून एखादी वस्तू खरेदी केल्यास, त्या वस्तूच्या किमतीच्या काही टक्के भाग तुमच्या खात्यावर डेली कॅशच्या रुपात परत जमा होईल. एका दिवसात किती खरेदी करावयाची, याला काहीही मर्यादा नाही. एखाद्या ग्राहकाला रोज मिळणारे पैसे त्याला अॅपल बचत खात्यात नको असतील तर, हे पैसे त्याला अन्य बँकेच्या बचत खात्यातही पाठवता येऊ शकतात. तसेच अॅपल बचत खात्यात पैसेदेखील जमा करता येऊ शकतात. “ग्राहक आपली बचत वाढवण्यासाठी बचत खात्यात अन्य खात्यांच्या माध्यमातून पैसे जमा करू शकतात,” असे अॅपलने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: बिल्कीस बानू प्रकरणातील आरोपींची सुटका कायदेशीर आहे का? गुजरात व केंद्र सरकार काय दडवू पाहते?
पैसे पाठवणे, पैसे खर्च करणे, रोज रोख रक्कम जमा करणे सोपे होणार…
अॅपल पे आणि अॅपल व्हॅलेटच्या उपाध्यक्षा जेनिफर बेली यांनी अॅपलच्या बचत खात्याविषयी अधिक माहिती दिली आहे. “आर्थिक सुरक्षा वाढावी तसेच आर्थिक व्यवहार वाढावेत म्हणून वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देणे, हे आमचे कर्तव्य आहे. अॅपल कार्डच्या व्हॅलेटमुळे नागरिकांना पैसे पाठवणे, पैसे खर्च करणे, रोज रोख रक्कम जमा करणे, हे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे ती सर्व प्रकिया एका छताखाली पार पडेल,” असे जेनिफर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?
अॅपल बचत खात्यावर देते ४.१५ टक्के व्याज!
अॅपल बचत खात्यावर ग्राहकांना ४.१५ टक्के व्याज देत आहे. हा दर इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे. सीएनबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या डेटानुसार अमेरिकेत बचत खात्यावर सरासरी व्याज ०.३५ टक्के दिले जाते.