Arangetram : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची होणारी सून राधिका मर्चेंट हिचा अरंगेत्रम सोहळा नुकताच पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे नृत्यांगना राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अरंगेत्रम सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यानंतर राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम सोहळ्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे. पण अरंगेत्रम म्हणजे काय? त्यात नेमकं काय करतात? याचा फायदा काय असतो? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चला तर जाणून घेऊया.
अरंगेत्रम म्हणजे काय?
अरंगेत्रम हा प्रकार भरतनाट्यम शिकणाऱ्या नर्तक किंवा नृत्यांगनेशी संबंधित आहे. भरतनाट्यम हा भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारातील सर्वात प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. याची सुरुवात तामिळनाडू राज्यापासून झाली होती. हा नृत्यप्रकार भारतातील सर्वात जुन्या शास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी एक मानला जातो. भरतनाट्यम हे जवळपास २००० वर्षे जुने असल्याचेही बोललं जाते. या नृत्यात नर्तक विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी हात आणि डोळ्यांच्या नजाकतीचा वापर करतात.
अरंगेत्रम हा भरतनाट्यम करणाऱ्या नृत्यांगनेच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्वाचा क्षण मानला जातो. यासाठी अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि मेहनत आवश्यक असते. या नृत्यशैलीत पारंगत होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. अरंगेत्रम म्हणजे एखाद्या नर्तकाने शास्त्रीय नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण पूर्ण करत त्यानंतर त्याचे रंगमंचावर एकट्याने सादरीकरण करणे.
अरंगेत्रम शब्दाचा अर्थ काय?
तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत अरंगू म्हणजे मंच आणि एत्रम म्हणजे एखाद्या गोष्टीचं सादरीकरण करणं. म्हणजेच मंचावर जाऊन आपल्या कलेचं सादरीकरण करणं या अर्थाने दोन शब्दांमधून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे.
अरंगेत्रम हा शब्द तामिळ भाषेतील आहे. याचा अर्थ औपचारिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नर्तकाने मंचावर जाऊन सादरीकरण करणे असा होतो. भरतनाट्यम कलेत पारंगत झालेला नर्तक किंवा नृत्यांगना ही त्यात पुढे जाऊ शकते आणि याचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांना ती कला शिकवू शकतो, असाही त्याचा अर्थ होतो.
अरंगेत्रम सादर करण्याची परंपरा फार पूर्वीपासून
अरंगेत्रम सादर करणे ही फार जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. याद्वारे एखादी नृत्यांगना एकट्याने सादर करण्यासाठी किंवा इतर नर्तकांना प्रशिक्षण देण्यासाठी सक्षम होते. या नृत्यांगनेला शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या अनेक पैलूंची माहिती असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण आणि मेहनत आवश्यक
जेव्हा भरतनाट्यम शिकवणाऱ्या गुरुला शिष्याच्या नृत्याबद्दल खात्री पटते, त्यानंतरच अरंगेत्रमची घोषणा केली जाते. यानुसार तो शिष्य एकटा नृत्य करण्यास सज्ज झाला आहे, असे समजले जाते. यासाठी अनेक वर्ष प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. अरंगेत्रम हा एखाद्या पदवीदान सभारंभाप्रमाणेच असतो. याद्वारे तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट कौशल्यांची प्राप्ती होते.