काही दिवसांपूर्वीच विंडोजने आपल्या लॅपटॉपमध्ये एआरएम आधारित एसओसी/चिप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच एक्सडीए डेव्हलपर्सने नुकत्याच केलेल्या एका चाचणीत, इंटेलच्या १४ जनरेशन मेटिअर लेक प्रोसेसरपेक्षा क्वालकॉमचे एआरएम आधारित स्नॅपड्रायगन एक्स इलाईट एसओसी/चिप सरस ठरल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच क्वालकॉमच्या प्रोसेसरने सिंगल-कोर, मल्टी-कोर आणि ग्राफिक्समध्येही इंटेलला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे अॅपल २०२० पासून आपल्या एम १ मॅकबुकमध्ये हे प्रोसेसर वापरत आहे, त्यामुळे या चाचणीनंतर विंडोज ॲपलला टक्कर देणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, हे एआरएम आधारित एसओसी/चिप नेमकी काय आहे? आणि ही चिप विडोंज लॅपटॉपसाठी क्रांतिकारी ठरणार का? याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा – अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा; महात्मा गांधींच्या नजरेतून ‘रामराज्य’ म्हणजे काय? जाणून घ्या….
एआरएम नेमकं काय आहे?
एआरएम समजून घेण्यापूर्वी एसओसी अर्थात ‘सिस्टम ऑन अ चिप’ म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झाल्यास, साधारणतः सीपीयूमध्ये प्रोसेसर चिप, रॅम, स्टोरेज हे घटक स्वतंत्र बसवले जातात. मात्र, एसओसी ही एकप्रकारे सर्वसमावेशक चिप आहे. यामध्ये संगणकाच्या सीपीयूसाठी आवश्यक असलेले सर्वच घटक एकाच चिपमध्ये बसवले जातात.
एआरएम म्हणजेच ‘Advanced RISC Machine’ हा एकप्रकारे सीपीयूच आहे. महत्त्वाचे म्हणजे एआरएम आधारित एसओसी चिप ही काही नवीन संकल्पना नाही. ही चिप मागील काही वर्षांपासून मोबाइलमध्ये वापण्यात येत आहे. ही चिप इंटेलच्या X-86 आणि X-64 प्रोसेसरच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. २०२० पर्यंत या चिप केवळ मोबाइलपुरत्याच मर्यादित होत्या. मात्र, २०२० ला ॲपलने पहिल्यांदा एम १ मॅकबुकमध्ये या चिपचा वापर केला. ॲपलने त्याचे नाव ‘ॲपल सिलीकॉन’ असे ठेवले होते.
ॲपलचे एम १ मॅकबुक क्रांतिकारी का ठरले?
एआरएम आधारित एसओसी/चिपमुळे ॲपलच्या लॅपटॉपमधील बॅटरी आणि प्रोसेसरची कार्यक्षमता वाढली. तसेच ऑपरेटिंग सिस्टम वेगाने काम करू लागली. ॲपलने या चिपचा वापर त्यांच्या एम १ मॅकबुकमध्ये पहिल्यांदा केला होता. आता मात्र ॲपलने एम ३ सीरिज बाजारात आणली आहे. यादरम्यान ॲपलने यात बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. ॲपलने केलेल्या दाव्यानुसार, एम ३ मॅकबुकमधील चिप ही एम २ मॅकबुकमधील चिपपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक कार्यक्षम आहे.
एआरएम आधारित चिप वापरण्यास विंडोज समोरील आव्हाने कोणती?
खरं तर विंडोजने एआरएम आधारित चिप वापरण्यास २०१६ मध्ये सुरुवात केली होती. मात्र, या चिपचा वापर विंडोजच्या मोजक्याच लॅपटॉपमध्ये करण्यात येत होता. ज्यावेळी ॲपलने सिलीकॉन चिप वापरण्यास सुरुवात केली, त्यापूर्वी ॲप्सच्या संख्येमुळे ॲपलच्या अभियंत्यांना यावर बराच वेळही घालवावा लागला. तसेच यावरील प्रोग्राम ऑप्टिमाईज करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.
विंडोजलाही आता अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. विंडोजमध्ये सध्या एमएस ऑफिस, पॉवरपॉईंट आणि एक्सेलसारखे ॲप्स व्यवस्थित चालतात. मात्र, इतर ॲप्सची कार्यक्षमता अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे या ॲप्सचे प्रोग्राम ऑप्टिमाईज करण्यासाठी विंडोजला बरीच मेहनत घ्यावी लागेल.
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir अयोद्धेतील राममंदिर: रामरायाच्या ‘त्या’ दोन मूर्तींचे काय होणार?
पुढे काय?
विंडोजने नुकतेच त्यांच्या इतर लॅपटॉपमध्ये स्नॅपड्रॅगन एक्स इलाईट एसओसी/चिप हे प्रोसेसर वापरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विंडोज ॲपलच्या एम ३ सीरिजला टक्कर देईल, अशी अपेक्षा विंडोजच्या वापरकर्त्यांना आहे. सुरुवातीच्या काही चाचण्यांमध्ये विंडोजला मिळालेल्या यशानंतर आता या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.