बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ‘स्टॉकहोम वर्ल्ड वॉटर वीक २०२२’ च्या कार्यक्रमात ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’चे महासंचालक अशोककुमार यांनी भाषण केलं आहे. आभासी बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांना संबोधित करतना अशोककुमार यांनी ‘अर्थ गंगा मॉडेल’बद्दल (Arth Ganga model) माहिती दिली. त्यांनी अर्थ गंगा मॉडेल नेमकं काय आहे? आणि ते कशाप्रकारे काम करते? याची माहिती दिली.
खरं तर, १९९१ पासून ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट’ या संस्थेमार्फत दरवर्षी जागतिक जलविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘जागतिक जल सप्ताह’चे आयोजन करते. यावर्षी
२४ ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने ही बैठक पार पडली.
‘अर्थ गंगा मॉडेल’ नेमकं काय आहे?
२०१९ मध्ये कानपूरमधील पहिल्या राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘अर्थ गंगा मॉडेल’ची संकल्पना मांडली होती. त्यांनी गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रमुख प्रकल्प असलेल्या ‘नमामी गंगे’ प्रकल्पाकडून ‘अर्थ गंगा मॉडेल’कडे वळवण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने गंगा नदीसह आसपासच्या क्षेत्राच्या शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित केलं. नदीवर अवलंबून असणाऱ्या अर्थकारणावर त्यांनी जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा– विश्लेषण : युरोपमध्ये ५०० वर्षांमधील सर्वात भयंकर दुष्काळ, ४७ टक्के जमीन वाळवंट बनण्याच्या वाटेवर?
अर्थ गंगा मॉडेलच्या माध्यमातून गंगा नदीवर अधारित अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. भारताच्या एकूण जीडीपीच्या तीन टक्के जीडीपी गंगा नदीच्या खोऱ्यातून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी माहिती अशोककुमार यांनी आपल्या भाषणातून दिली. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचं पालन करत भारताकडून अर्थ गंगा प्रकल्प राबवला जात आहे, असंही अशोककुमार म्हणाले.
अर्थ गंगा प्रकल्पाची उद्दिष्टे
अर्थ गंगा प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारचे एकूण सहा प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्टं म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती, ज्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूला १० किमी अंतरापर्यंत रसायनेमुक्त शेती करणे. गोबरधन योजनेद्वारे शेणखताला खत म्हणून प्रोत्साहन देणे. दुसरं म्हणजे गाळ व सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे. या सांडपाण्याचा वापर उद्योग आणि सिंचनासाठी करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महसूल निर्मितीसाठी नवा मार्ग तयार करणे.
हेही वाचा- विश्लेषण : घर खरेदी करावं की भाड्याने राहावं? कोणती बाब ठरेल फायदेशीर? जाणून घ्या आर्थिक गणितं
तिसरं उद्दिष्टे म्हणजे अर्थ गंगा मॉडेलच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवणे. लोकांना स्थानिक उत्पादने, औषधी वनस्पती आणि आयुर्वेदीक बाबी विकता याव्यात, यासाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ निर्माण करणे. चौथे उद्दिष्टे म्हणजे नदीशी संबंधित लोकांमध्ये समन्वय वाढवणे. नदीच्या सभोवतालचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि पर्यटनाचा प्रचार करणे.त्यासाठी बोट सफारी, साहसी खेळ आणि योग यासारख्या सुविधा उपलब्ध करणे, हे पाचवं उद्दिष्टे आहे. तर शेवटचं उद्दिष्टे म्हणजे या मॉडेलच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाला सक्षम करणे आणि संस्थात्मक बांधणीला चालना देण्याचा प्रयत्न करणे.