देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (सीएक्युएम) यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा (ग्रेप-४) लागू केला आहे; ज्या अंतर्गत कारखाने, बांधकामे, वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रदूषणाची पातळी इतकी आहे की, याचा लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यासाठी दिल्ली सरकार अनेक उपाययोजना करत आहेत. नुकतंच वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा पर्याय सुचविण्यात आला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) केंद्राला पत्र लिहून प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी मागितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संदर्भात आयआयटी कानपूर आणि केंद्र सरकारच्या एजन्सीमधील तज्ज्ञांबरोबर बैठक बोलावण्याचे आवाहनही त्यांनी केंद्राला केले. मंगळवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सरासरी ४९२ वर होता. अलीपूर, आनंद विहार, बवाना, नरेला, पुसा आणि सोनिया विहारमधील AQI ५०० वर पोहोचला. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा चौथा टप्पा सोमवारी (१८ नोव्हेंबर) सुरू झाला असतानाही या प्रदेशात गुदमरणारे वायू प्रदूषण कायम आहे. कृत्रिम पाऊस दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारू शकेल का? याचे पर्यावरणावर काही गंभीर परिणाम होऊ शकतात का? कृत्रिम पाऊस नक्की कसा तयार होतो? त्याविषयी जाणून घेऊ.

देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पुतिन यांची अणुयुद्धाची तयारी? अण्वस्त्र धोरणात केला बदल; याचा अर्थ काय?

कृत्रिम पाऊस किंवा क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंग हे एक अत्याधुनिक तंत्र आहे. यामध्ये ढगात मोठ्या आकाराचे बीजारोपण करून नैसर्गिकरीत्या पडणार्‍या पावसाची प्रक्रिया केली जाते. पाण्याची वाफ लहान कणांभोवती घनरूप होऊन ढग बनवणारे थेंब तयार करतात. क्लाउड सीडिंग प्रक्रियेत हायग्रोस्कोपिक फ्लेअर्स असलेली विमाने ढगांमध्ये पाठवली जातात. मिठाच्या स्वरूपाचे हे फ्लेअर्स ठरलेल्या ढगांमध्ये टाकले जातात. विमानाद्वारे ढगांमध्ये फवारलेले कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषून घेतल्यामुळे पाण्याचे थेंब एकत्र होतात आणि ढगातून पाऊस पडू लागतो. क्लाउड सीडिंगसाठी ढगांमध्ये सहसा सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम क्लोराईडसारखे क्षार टाकले जाते. “हे बियाणे क्लाउड मायक्रोफिजिकल प्रक्रियांना गती देते. याचाच अर्थ असा की या प्रक्रियेने ढगात पाण्याचे मोठे थेंब तयार होतात आणि जमिनीवर पडेपर्यंत त्याचे बाष्पीभवन होत नाही,” असे आयआयटी कानपूर येथील प्राध्यापक आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या सुकाणू समिती सदस्य सच्चिदानंद त्रिपाठी यांनी २०२३ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) केंद्राला पत्र लिहून प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी मागितली. (छायाचित्र-रॉयटर्स)

क्लाउड सीडिंगसाठी लागणारे अनुकूल हवामान

मुख्य म्हणजे या प्रक्रियेसाठी ढगांचे आवरण आणि विशिष्ट प्रकारचे ढग आवश्यक आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते की, “क्लाउड सीडिंग तेव्हाच होऊ शकते जेव्हा या ढगांची पुरेशी संख्या आणि विशिष्ट खोली असेल. आत ढगांच्या थेंबांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे. ढगांच्या थेंबांची त्रिज्या वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग केले जाते, जेणेकरून ते मोठे होतील आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते पर्जन्यमान म्हणून खाली येतील. पण, स्वच्छ आकाशात तुम्ही ते करू शकत नाही.” हिवाळ्यात दिल्लीवर ढग तयार होतात. ही वादळे आहेत जी, कॅस्पियन किंवा भूमध्य समुद्रात उगम पावतात आणि वायव्य भारतात मोसमी पाऊस पाडतात. “हिवाळ्यात आपणास बियाण्यासाठी आवश्यक असलेले ढग दिसत नाहीत आणि वातावरणीय बदलामुळे ढग असले तरी त्यांची उंची किती आहे, त्यांच्यातील द्रव पाण्याचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे असते,” असे त्रिपाठी म्हणाले होते. रडारद्वारे ढग तयार होण्याची शक्यता आधीच ठरवता येत असली तरी ज्या दिवशी पेरणी होण्याची शक्यता असेल त्या दिवशी इतर परिस्थितींचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते.

हेही वाचा : रॅगिंगमुळे मेडिकल कॉलेजच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रकरण काय? भारतातील रॅगिंगविरोधी कायदा काय?

क्लाउड सीडिंगचा विपरीत परिणाम?

क्लाउड सीडिंगवर अनेक वर्षांचे संशोधन असूनही त्याच्या प्रभावाचे पुरावे स्पष्ट नाहीत. २००३ मध्ये अमेरिकेतील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अभ्यासात क्लाउड सीडिंगच्या परिणामकारकतेबद्दल मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आढळून आली. क्लाउड सीडिंग केवळ वायू प्रदूषणापासून तात्पुरती मुक्तता देऊ शकते, असे एरोसोल शास्त्रज्ञ शहजाद गनी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस २०२३’ च्या त्यांच्या लेखात लिहिले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, PM2.5 आणि PM10 सारखी प्रदूषके दीर्घकाळ पडणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. परंतु, ओझोन आणि सल्फर डाय ऑक्साइडसारख्या इतर प्रदूषकांवर याचा परिणाम होत नाही. याशिवाय क्लाउड सीडिंग किंवा कृत्रिम पाऊस पर्यावरणावर गंभीर परिणाम करू शकतो. उदाहरणार्थ, या प्रक्रियेत वापरलेली रसायने, जसे की सिल्व्हर आयोडाइड माती आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात साचले तर ते शेतीवर आणि परिसंस्थेवर विपरित परिणाम करू शकतात. या रसायनांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे शास्त्रज्ञांना अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. गनी यांच्या मते, क्लाउड सीडिंगबाबत नैतिक चिंतादेखील आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is artificial rain or cloud seeding in delhi pollution rac