आधार कार्ड ही लोकांची ओळख बनली आहे. सरकारी योजनांपासून इतर महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत त्याचा वापर आवश्यक झाला आहे. भारतात राष्ट्रीय स्तरावर व्यक्तीची ओळख म्हणून ज्या ओळखपत्राला महत्त्व दिले जाते ते आधार कार्ड म्हणून ओळखले जाते. आधार कार्ड हा व्यक्तीच्या ओळखीचा आधार आहे. भारतात ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. आता लहान मुलांचे आधार कार्ड लहान मुलांचे ओळखपत्र म्हणून बनवता येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, १ वर्षापेक्षा जास्त वयाची मुले आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. पण हे बाल आधारकार्ड लहान मुलांसाठी का महत्वाचं आहे? याचा नेमका फायदा काय होईल, जाणून घेऊया.
काय आहे बाल आधारकार्ड?
शून्य ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधार कार्ड बनवले जाते. देशात सुरू असलेल्या बाल आधार मोहिमेअंतर्गत ही कार्डे बनवली जातात. या आधार कार्डच्या माध्यमातून मुलांना आणि त्यांच्या पालकांना अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. मुलांसाठी बनवलेल्या बाल आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील घेतलेला नाही. मुलांचे आधार कार्ड पालकांच्या आधारशी लिंक केले जाते. मूल ५ वर्षांचे झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक्स अपडेट प्रथमच घेतले जातात. मुलांची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा बायोमेट्रिक्स घेतले जातात. बाल आधार कार्डचा रंग निळा आहे. मुलाच्या आधार कार्डवर ‘मुलाच्या वयाच्या ५ वर्षांपर्यंत त्याची वैधता’ असे लिहिलेले असते.
हेही वाचा- विश्लेषण : आपण खूप विचार केल्यानंतर थकवा का येतो? नेमकं घडतं काय? अभ्यासातून समोर आली नवी माहिती!
बाल आधारकार्ड बनवण्याचा फायदा काय आहे?
आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे विविध कामांसाठी वापरले जाते. आता केंद्र आणि राज्याच्या अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची गरज असते. याशिवाय बँकांमध्ये कोणतेही काम आधार कार्डशिवाय होत नाही. आता सरकारने मुलांसाठी बाल आधार कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. देशातील जनतेला या योजनेअंतर्गत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बाल आधार कार्ड बनवावे लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलांनाही शासकीय योजना आणि सेवांचा लाभ दिला जाणार आहे. या माध्यमातून मुलांना शाळांमध्ये प्रवेश घेणेही सोपे होणार आहे.
आत्तापर्यंत किती मुलांनी बनवली बाल आधार कार्ड
UIDAI नुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत, जन्मापासून ते ५ वर्षे वयोगटातील २.६४ कोटी मुलाचे आधार कार्ड बनवण्यात आली आहे. जुलै २०२२ पर्यंत हा आकडा ३.४३ कोटी झाला आहे. देशात बाल आधारची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये जन्मापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या ७० टक्के मुलांचे आधार कार्ड बनवण्यात आले आहे.
हेही वाचा- विश्लेषण : जगात कापूसटंचाई होईल?
बाल आधार कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
बाल आधार कार्डसाठी सरकारी रुग्णालयात जन्मानंतर आई आणि बाळाचा जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज स्लिप आवश्यक आहे. तसेच मुलाच्या पालकांपैकी दोघांच्या किंवा एकाच्या आधार कार्डची प्रत द्यावी लागते. तसेच पाच वर्षांखालील मुलांच्या पालकांना मुलाचे आधार बनवण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागेल.
मुलांचा आधार कार्ड बनवायला किती खर्च येतो
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार कार्ड पूर्णपणे मोफत असून त्याचा खर्च सरकार उचलते. मुलाच्या आधार कार्डसाठी पालकांचे बायोमेट्रिक तपशील घेण्यासाठी ₹ ३० भरावे लागतील. मुलाचे वय ५ ते १५ वर्षे होईपर्यंत बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी ₹ ३० भरावे लागतील.
बाल आधार कार्ड किती काळ वैध आहे?
बाल आधार कार्ड हे ५ वर्षांखालील मुलांसाठी बनवले जाते. जसजशी मुलं वयाची १८ वर्षे ओलांडतात. त्यानंतर मुलांच्या आधार कार्डची ओळख पूर्ण होते. त्यामुळे पालकाने बायोमेट्रिक तपशील सबमिट करून दुसऱ्या आधार कार्डसाठी अर्ज करावा.
वरील कागदपत्रांच्या अनुपस्थितीत, खालील कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात
जर वरील कागदपत्रे उपलब्ध नसतील तर मुलाचे छायाचित्र असलेल्या लेटरहेडवर खासदार किंवा आमदार/राजपत्रित अधिकारी/तहसीलदार यांनी दिलेले पत्त्याचे प्रमाणपत्र दिले तरी चालते. तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत प्रमुख किंवा त्याच्या समतुल्य प्राधिकरणाने जारी केलेले पत्त्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. आई किंवा वडिलांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे.
हेही वाचा- विश्लेषण : अमूलने दुधाचे दर का वाढवले? भविष्यात भाव आणखी वाढतील का?
बाल आधारसाठी नोंदणी कशी करावी
जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट दिल्यानंतर तिथे बाल आधार कार्डसाठी वेगळा अर्ज मिळतो. तो अर्ज भरून त्याला पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि मुलाच्या जन्माचा दाखला जोडावा. अर्जामध्ये आधार कार्ड तपशील आणि पालकांचा मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर ६० दिवसांच्या आत पालकांच्या मोबाइलवर मजकूर संदेशाद्वारे अपडेट्स येतील. यानंतर मुलाचे आधार कार्ड पोस्टाद्वारे घरच्या पत्त्यावर पाठवले जाते.
पालकांनी कृपया लक्षात ठेवा की बाल आधार कार्ड फक्त १ वर्ष ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बनवले जाईल. त्यामुळे जर तुम्ही ५ वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड बनवत असाल तर त्या आधार कार्डचा रंग निळा असेल. मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यावर पालकाला पुन्हा आधार केंद्राशी संपर्क साधावा लागेल. आणि बाल आधार कार्डवरून तुम्हाला सामान्य आधार कार्डसाठी अर्ज करावा लागेल.