संदीप नलावडे

हिजाब सक्तीविरोधात आवाज उठवल्याने अटक करण्यात आलेल्या माहसा अमिनी या तरुणीचा इराणमधील कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून गेल्या पंधरवड्यापासून इराणमध्ये तरुणाई एकवटली असून त्यांनी सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन थोपवण्यासाठी ‘बासिज’ ही निमलष्करी स्वयंसेवकांची संघटना कार्यरत आहे. काळी जाकिटे घातलेले पुरुष शहरांत मोटारसायकलवर फिरत असून त्यांच्या हातात बंदुका किंवा दंडुके आहेत. सरकारविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी बासिज स्वयंसेवक लाठीमार करत आहेत, तर वेळप्रसंगी गोळीबारही करत आहेत. ‘बासिज’ या इराणी सरकारच्या निमलष्करी संघटनेविषयी जाणून घेऊ या…

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

बासिजची स्थापना कधी आणि कोणी केली?

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला रोहुल्ला खामेनी यांनी १९७९मध्ये इराण-इराक युद्धात सहभागी होण्याचे आवाहन इराणी तरुणांना केले. त्यानंतर ३० एप्रिल १९८० रोजी बासिज या निमलष्करी स्वयंसेवक संघटनेची स्थापना केली, ज्यात अधिकाधिक तरुणांना सहभागी करून घेतले. सुरुवातीला या संघटनेत अगदी किशोरवयीन मुलांपासून ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.

इराण-इराक युद्धात बासिज संघटनेत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. बासिजने सद्दाम हुसेनच्या इराकी सैन्याविरोधात जोरदार हल्ले केले, ज्यामध्ये लष्करी प्रशिक्षण न झालेले कमकुवत पण सशस्त्र सैनिक होते. त्यापैकी अनेक किशोरवयीन होते, जे खाणींमध्ये आणि तोफखान्याच्या गोळीबारात मारले गेले.

विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धाचा असाही परिणाम; जगभरात ‘टॉयलेट पेपर’चा तुटवडा, किमती गगनाला भिडल्या!

बासिजची सध्याची स्थिती?

१९९०नंतर विद्यार्थ्यांमध्ये विद्रोह घडवून त्यांना बासिज संघटनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. इराणी समाजाचे इस्लामीकरण आणि देशांतर्गत शत्रूंचा सामना करण्याचे काम या संघटनेकडून केले जाते. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या आदेशाखाली बासिज काम करतात. सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी अत्यंत निष्ठावान ही संघटना असून ‘इस्लामिक प्रजासत्ताकाचा आधारस्तंभ’ अशी प्रशंसा खामेनी यांच्याकडून नेहमीच बासिजची केली जाते. बासिज या निमलष्करी संघटनेच्या देशभर शाखा आहेत. अनेक विद्यार्थी संघटना, व्यापारी संघ, वैद्यकीय विद्याशाखा त्यांनी स्थापन केल्या आहेत. बासिजच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये सशस्त्र ब्रिगेड, दंगलविरोधी दले आणि हेरगिरी करणाऱ्या गुप्तचरांचे मोठे नेटवर्क समाविष्ट आहे. बासिजद्वारे गुप्तपणे चालवल्या जाणाऱ्या व्यवसायाचे अब्जावधी डॉलरचे नेटवर्क असल्याचे अमेरिकी अर्थखात्याने म्हटले असून या नेटवर्कवर निर्बंध लादण्यात आले आहे.

किती सदस्य?

टेनेसी विद्यापीठातील एक इराणी विद्वान सईद गोल्कार यांनी बासिज संघटनेवर एक पुस्तक लिहिले असून, त्यांच्या मते या संघटनेची सदस्यसंख्या अंदाजे १० लाख असून सुरक्षा दलांची संख्या हजाराच्या घरात आहे. ‘‘हे गणवेश नसलेले सामान्य इराणी नागरिक असून इस्लामिक प्रजासत्ताक त्यांचा गौरव ‘सरकार समर्थक’ असे करते. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा सामना बासिज करते आणि त्यापैकी बहुतेकांना इराण सरकारकडून पगारही मिळतो,’’ असे गोल्कार सांगतात.

विश्लेषण : चीनमध्ये पुन्हा करोनाचे नवे प्रकार?

बासिज संघटना आंदोलकांवर हल्ले का करते?

तज्ज्ञांच्या मते अनेक तरुण केवळ आर्थिक संधीमुळे बासिजमध्ये सहभागी होतात. सदस्यत्वामुळे विद्यापीठात प्रवेश सुलभ होतो आणि सार्वजनिक क्षेत्रांतील रोजगारही प्राप्त होतो. मात्र बासिजमध्ये सहभागी झाल्यानंतर ४५ दिवसांचे लष्करी आणि कट्टरतावादी विचारांचे प्रशिक्षण दिले जाते. या सदस्यांचे प्रबोधन केले जाते आणि त्यांना शिकवले जाते की इस्लामिक क्रांती हा अन्यायाविरुद्धचा ईश्वरी संघर्ष आहे. इस्लामिक क्रांतीला असंख्य शत्रूंकडून म्हणजे अमेरिका, इस्रायलपासून अनिवासी इराणींचा इराणी राजवटविरोधी गट आणि पाश्चात्य संस्कृतीपासून धोका आहे, अशी शिकवण दिली जाते. बासिजच्या मते इस्लामिक हिजाब निकोप भिन्नलिंगी सार्वजनिक जीवन, व्यभिचार आणि भ्रष्टाचाराविरोधात बळकटीसाठी महत्त्वाचे असून ते काढून टाकणे हे अधोगती पाश्चात्य संस्कृतीचे लक्षण आहे. त्यामुळे हिजाबला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर बासिजकडून हल्ले केले जात आहेत.

इराणी सैन्याने निदर्शने कशी रोखली?

इराणमधील आंदोलनकर्त्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली आणि ही सर्व कामे बासिजच्या मदतीने करण्यात आली. बहुतेक सार्वजनिक संस्थांमध्ये बासिजचे सदस्य असतात. बासिजचा एक सायबर विभाग आहे, जो शत्रूंना ऑनलाइन हॅक करण्यासाठी वापरला जातो. आंदोलकांना थोपवण्यासाठी विविध रणनीती आखल्या जातात. जेव्हा आंदोलन सुरू होते, त्यावेळी काळे किंवा कमांडो कपडे घातलेले बासिज मोटारसायकलवरून येतात आणि आंदोलकांना पांगवण्याचे आदेश देतात. मात्र तरीही आंदोलन सुरू ठेवल्यास लाठीमार किंवा प्रसंगी गोळीबारही केला जातो. सध्याचे आंदोलन थोपवण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केला जात आहे. आंदोलकांचा पाठलाग करणे, घेरणे, मारहाण करणे, त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यासाठी व्हॅनमध्ये फेकून देणे, प्रसंगी गोळ्या घालणे अशा अनेक मार्गांचा अवलंब बासिजकडून केला जात आहे. विशेष म्हणजे बासिज आंदोलकामध्येही सहभागी होतात आणि माहिती देणारे सूत्रधार शोधून काढतात. गेल्या महिन्यात आंदोलकांमध्ये सामील झालेल्या चार बासिज सदस्यांना सुरक्षा दलांनी चुकून गोळ्या घालून ठार केले होते, असे ॲन्मेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल सांगतो.

विश्लेषण : तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा?

सध्याचे आंदोलन शमवण्यात इराण यशस्वी होईल?

गेल्या दशकभरापासून इराणमध्ये सामान्य जनांकडून अनेक आंदोलने झाली. २००९मध्ये वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुकीनंतर लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. ‘ग्रीन मूव्हमेंट’ म्हणून हे आंदोलन ओळखले जाते. २०१९मध्ये इराणमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटाविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सुरक्षा दलांच्या गोळीबारात शेकडो ठार झाले. ही सर्व आंदोलने थोपवण्यास बासिजची भूमिका महत्त्वाची होती. मात्र सध्याचे आंदोलन वेगळे असून ही निषेधाची भावना विझवणे कठीण होऊ शकते. देशाच्या पुराणमतवादी इस्लामिक पोशाखसंहितेच्या वाढत्या कठोर अंमलबजावणीमुळे कंटाळलेल्या तरुणी आंदोलनाचे नेतृत्व करतात. त्याशिवाय त्यांना वांशिक अल्पसंख्याक आणि इराणच्या महत्त्वपूर्ण तेल उद्योगातील काही कामगारांसह समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. निषेधाच्या अनेक चित्रफितींमध्ये इराणी तरुणी हिजाब हवेत फिरवताना आणि केस कापताना दाखविले जात आहेत. जेव्हा बासिज येतात, तेव्हा ही तरुणाई त्यांच्याशी प्राणपणाने लढताना दिसून येत आहे. काही ठिकाणी तर त्यांना पळवून लावण्यातही यश आले आहे. मात्र इराणी अधिकारी मागे हटतील, अशी अपेक्षा करता येणार नाही. हा निषेध क्षीण करण्यात आणि दडपशाहीची क्षमता वाढविण्यात इराणी सत्ताधीश यशस्वी होतील काय हे पाहावे लागेल.