Beer Bathing बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळते. जीवनशैलीत सुधारणा व्हावी अन् आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक योगा क्लासेस, जिम येथे जाण्यासह ध्यानधारणाही करू लागले आहेत. परंतु, सध्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी बीअर बाथिंगचा एक नवा ट्रेंड आता चर्चेत आला आहे. त्याला बीअर स्पा, असेही नाव देण्यात आले आहे. अनेकांच्या आवडत्या पेयामध्ये बीअरचा समावेश असतो, परंतु प्यायलाच नव्हे, तर अंघोळीसाठीदेखील लोक बीअरचा वापर करत आहे. हा आधुनिक उपाय वाटत असला तरी बीअर बाथिंग शतकानुशतके सुरू आहे. काय आहे बीअर स्पा? त्याचा इतिहास काय? खरंच याचा आरोग्याला फायदा होतो का? याचे दुष्परिणाम काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
ही प्रथा शतकानुशतके सुरू आहे. विशेषत: पूर्व युरोपच्या इतिहासात याच्या नोंदी आढळून येतात. आता चेक प्रजासत्ताकचा भाग असणार्या ड्युक ऑफ बोहेमिया हे शहर बीअर बाथचा आनंद घेण्यासाठी ओळखले जात असे. ही प्रथा प्रागमध्ये लोकप्रिय आहे. आता याचा विस्तार ब्रिटन आणि अमेरिकेमध्येही झाला आहे. “युरोपियन परंपरेनुसार याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बीअर स्पादरम्यान शरीर आणि मन दोन्ही शांत करण्यासाठी एक प्रकारचे वातावरण तयार केले जाते,” असे ब्रिटनमध्ये नॉरफोक मीड या नुकत्याच सुरू झालेल्या हॉटेलच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Union Budget 2024: रोजगार, कौशल्यविकासाच्या तीन गेमचेंजर योजनांची घोषणा; कोणाला होणार फायदा?
बीअर बाथिंगचे फायदे काय?
बीअर बाथिंग त्वचेसह एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. कोपलमन अॅस्थेटिक सर्जरीच्या डॉ. हन्ना कोपेलमन यांनी वूमन्स वर्ल्ड मासिकाला सांगितले, “बीअरमध्ये आढळणाऱ्या काही घटकांमुळे बीअर बाथपासून त्वचेला अनेक फायदे मिळतात.” त्यांनी पुढे सांगितले, “बिअरमध्ये हॉप्स हा घटक असतो. हॉप्समध्ये झँथोहुमल व ह्युमुलोन मोठ्या प्रमाणात असतात. हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट घटक आहेत; ज्यामुळे शरीरातील तणाव दूर होतो आणि शरीराची छिद्रेही मोकळी होतात. परिणामी, त्वचेचे आरोग्य सुधारू शकते. त्यातील बी जीवनसत्त्वयुक्त यीस्ट हा आणखी एक महत्त्वाचा घटक त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो. हे घटक कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले, “काही समर्थकांचा असाही दावा आहे की, बीअरमधील अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करू शकते. संभाव्यत: मुरमे किंवा इसब यांच्या व्यवस्थापनात मदत होते.” त्वचेच्या फायद्यांव्यतिरिक्त याचे इतरही अनेक फायदे आहेत. बीअरमध्ये भिजल्याने तणाव कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू दुखणे व वेदनादेखील कमी होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बीअर बाथ घेतल्यानंतर त्वचेचे सौंदर्य आणखी उजळते, असे सांगितले जाते.
घरीही बीअर बाथ करणे शक्य?
स्पेशलाइज्ड स्पाच्या दुकानात न जाता, घरीही सहजपणे बीअर बाथिंग करता येऊ शकते. परंतु, त्वचेची जळजळ होऊ नये म्हणून आठवड्यातून केवळ एकदाच बीअर बथिंगचा सल्ला दिला जातो. “घरी बीअर बाथ घेताना, खोलीच्या तापमानाशी समन्वय साधणाऱ्या बीअरचा वापर करा आणि गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते,” असा सल्ला त्यांनी दिला. बीअर निवडण्याच्या निकषांबाबत कोपलमन यांनी अमेरिकन साप्ताहिकाला सांगितले, “कोणत्याही प्रकारची बीअर वापरली जाऊ शकते; परंतु हॉप हा घटक जास्त असल्यास जास्त फायदे मिळू शकतात.” तुमचे संपूर्ण शरीर बीअरमध्ये बुडविण्याआधी तुमची त्वचा कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी तुमच्या हातावर ‘स्किन पॅच टेस्ट’ करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तुम्हाला घरीच बीअर बाथ घ्यायचा असल्यास कोमट पाण्याच्या टबमध्ये ४५० मिलिलिटरपेक्षा जास्त बीअर घाला. त्यात २० मिनिटे शरीराला ठेवा. या प्रक्रियेत आंघोळीनंतरची काळजी महत्त्वाची आहे. या बीअर बाथनंतर स्वच्छ आंघोळ करून मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
हेही वाचा : US Election 2024: मिशेल ओबामा राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार? निवडणूक लढवण्याची शक्यता किती?
बीअर बाथचे संभाव्य दुष्परिणाम
बीअर बाथची कल्पना आकर्षक असली तरी त्याचे अनेक धोकेही आहेत. कोपेलमन याबाबत सावधगिरीचा सल्ला देतात, “संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना किंवा बीअरमधील कोणत्याही घटकांची अॅलर्जी, जसे की हॉप किंवा यीस्टची अॅलर्जी असू शकते. बीअरमध्ये आढळणाऱ्या अशा घटकांमुळे चिडचिड किंवा अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. तसेच बीअरमध्ये आढळणारे घटक अनेकांची त्वचा कोरडीही करू शकतात आणि त्यामुळेही अनेकांना चिडचिडीचा त्रास होऊ शकतो.” याव्यतिरिक्त कोपलमन सांगतात, “हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या घटकांमध्ये फायदेशीर गुणधर्म आहेत. तसेच विशेषतः त्वचेशी संबंधित बाबींवरील उपचारांसाठी बीअर बाथच्या परिणामकारकतेचे समर्थन करणारे मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत.” बीअर बाथऐवजी कोपेलमन एप्सम सॉल्ट बाथचा पर्यायही सुचवतात. ही प्रक्रिया त्वचेच्या समस्यांवरील उपचारासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.