सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. अशा संकटाच्या खाईत असतानाच इराण ५ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.६ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने आणखी एकदा हादरला आहे. सेमनानच्या नैर्ऋत्येस ४४ किलोमीटर अंतरावर जमिनीच्या १० किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्र असल्याचे युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC)ने सांगितले. सुमारे ११० किलोमीटर दूर तेहरानपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानतर थोड्या वेळाने इस्रायलमध्येही कमकुवत भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर सोशल मीडियावर असे प्रश्न उपस्थित होऊ लागले की, हा भूकंपच होता की इराणने केलेली आण्विक चाचणी. नक्की काय घडले? या रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय? त्याबाबत जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय घडलं?

सेमननचा प्रदेश भूकंपाचे केंद्र होता आणि हा प्रदेश इराणच्या प्रमुख आण्विक सुविधांसाठी प्रख्यात आहे. त्यामुळे इराणने गुप्त अणू चाचणी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या भूकंपाविषयी अनेक सिद्धांत मांडले. एका ‘एक्स’वरील वापरकर्त्याने लिहिले, “इराण काल ​​रात्रीपासून अण्वस्त्र चाचणी कार्ट आहे. त्यांनी रेडिएशन एक्स्पोजर सुनिश्चित करण्यासाठी सेमनानजवळच्या पृष्ठभागाच्या १० किलोमीटर खाली बॉम्बची चाचणी केली आहे.“ दुसरा वापरकर्ता म्हणाला, “त्या इराणी भूकंपाने इस्रायलला खरोखरच घाबरवले. ते इराणवर हल्ला करतील की नाही यावर त्यांची चर्चा सुरू आहे. असे दिसते की, इराणकडे गुप्त अण्वस्त्रे आहेत. कोणताही देश अणुऊर्जेच्या बाबतीत गोंधळणार नाही.” असे असले तरी इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव आणि भूकंपाची वेळ यांमुळे या संशयांना बळ मिळाले आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ले सुरू केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामधील ४२,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेल्याने दोन्ही देशांत अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळेच आता इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला वाव मिळण्यासारखी स्थिती तयार झाली आहे.

हेही वाचा : ‘हा’ देश समुद्राखाली साठविणार कार्बन डाय-ऑक्साइड; कारण काय?

अणू चाचणी आणि भूकंपाचा संबंध कसा?

भूगर्भातील आण्विक स्फोट भूकंपांप्रमाणेच भूकंपीय क्रियाकलाप निर्माण करू शकतात; परंतु यात फरकही आहेत. इराणची अण्वस्त्र स्थळे, जसे की नतान्झ, जमिनीखाली खोलवर स्थित आहे आणि भूकंपाचे केंद्र जमिनीखाली असल्यानेच प्रश्न निर्माण झाले आहेत. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या १० किलोमीटर खाली आहे. पृष्ठभागावरील परिस्थिती वा कार्यांत कोणताही व्यत्यय येऊ न देता भूमिगत अणुचाचणी करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भूकंप ४.६ तीव्रतेचा होता आणि त्यामुळे हा आण्विक स्फोटाचा परिणाम असू शकत नाही. नैसर्गिक भूकंपाची क्रिया आणि आण्विक चाचण्या यांतील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अफवा पसरल्या असल्या तरी कोणताही ठोस पुरावा या दाव्याला समर्थन देत नाही की, हा धक्का अणू चाचणीमुळे बसला असावा. वस्तुस्थिती अशी आहे की, इराणवर अणू कार्यक्रम वाढविल्याचाही आरोप पाश्चात्त्य राष्ट्रांकडून केला जात आहे.

भूगर्भातील आण्विक स्फोट भूकंपांप्रमाणेच भूकंपीय क्रियाकलाप निर्माण करू शकतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

इराणकडे आण्विक शस्त्रसाठा आहे का?

इराणची आण्विक क्षमता हा जागतिक स्तरावर बराच काळ वादाचा मुद्दा राहिला आहे. डिसेंबर २०२३ च्या निवेदनात इराणने ६० टक्के समृद्ध युरेनियमचे उत्पादन वाढविल्याबद्दल अमेरिका आणि युरोपियन देशांनी इराणचा निषेध केला. शस्त्रास्त्रीकरणासाठी ९० टक्के युरेनियमची आवश्यकता आहे आणि इराण त्यापासून काहीच पावले दूर आहे. जरी इराणने त्यांच्या अणू कार्यक्रमाविषयी करण्यात येणारे दावे फेटाळले असले तरी तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, इराण एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अणुबॉम्बसाठी पुरेसे शस्त्र-दर्जाचे युरेनियम तयार करू शकेल.

“जर इराणी नेतृत्वाने अण्वस्त्रे तयार करण्याचा निर्णय घेतला, तर पुरेशी सामग्री मिळण्यासाठी त्यांना फक्त काही आठवडे लागतील,” असे इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटीच्या अण्वस्त्र तज्ज्ञाने जानेवारीच्या एका लेखात म्हटले आहे. इराणने आता जरी आपल्या प्रयत्नांना वेग देण्याचे ठरवले, तर इराण पाच महिन्यांत १२ अण्वस्त्रे तयार करण्यास सक्षम आहे. परंतु, वितरित करण्यायोग्य आण्विक शस्त्रे मिळविण्यासाठी अतिरिक्त काम आवश्यक आहे. इराणकडे क्षेपणास्त्रासारखी वितरण प्रणाली असली तरी क्षेपणास्त्रावर बसवण्यास सक्षम वॉरहेड तयार करणे यासारख्या शस्त्रास्त्रीकरणातील अंतिम टप्पे हे आव्हान ठरतील.

वर्तमान परिस्थिती काय आहे?

भूकंप, नैसर्गिक असो वा नसो, हा भूकंप इस्त्रायल आणि इराण-समर्थित गट जसे की, हिजबुल आणि हमास यांच्यातील वाढत्या शत्रुत्वादरम्यान झाला. ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून, इस्रायलचे लष्करी हल्ले सातत्याने सुरू आहेत. गाझामध्ये ४२,००० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत; तर दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हिजबुलने इस्त्रायवर १३० रॉकेट्स डागली आणि विशेषतः हैफा शहराला लक्ष्य केले. त्यामुळे आता अनेकांना मोठा संघर्ष होण्याची भीती वाटत आहे.

हेही वाचा : जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?

खरेच हा भूकंप होता की अणू चाचणी?

५ ऑक्टोबरच्या भूकंपाची काही वैशिष्ट्ये आहेत, जी भूगर्भातील संभाव्य अणू चाचणी करण्यात आल्याचे सूचित करतात. इराणची आण्विक स्थळे भूगर्भात आहेत आणि भूकंपाची उथळ खोली पाहता, हा अणुस्फोट असावा, असा अंदाज आहे. मात्र, याचा कोणताही पुरावा नाही. इराणची वाढती युरेनियम संवर्धन पातळी, त्यांची क्षेपणास्त्र क्षमता व प्रगती पाहता, अण्वस्त्रधारी इराणकडून आण्विक हल्ला केला जाऊ शकतो, अशीही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is behind the mysterious tremors in iran rac