पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई दौर्यावर असताना त्यांनी संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथील पहिले हिंदू मंदिर असलेल्या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराचे उद्घाटन केले. त्याचबरोबर भारतातील लघु उद्योजक आणि व्यापार्यांसाठी गोदाम सुविधा असलेल्या ‘भारत मार्ट’चेदेखील उद्घाटन केले. छोट्या व्यावसायिकांसह कामगारवर्गाला ‘भारत मार्ट’चा मोठा फायदा होणार आहे; तर चीनच्या ड्रॅगन मार्टला भारत मार्टचा मोठा फटका बसणार आहे. भारत मार्ट काय आहे? आणि याचा देशाला कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
‘भारत मार्ट’ म्हणजे नक्की काय?
भारत मार्ट ही एक गोदाम सुविधा आहे; जी संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे व्यापार आणि विविध उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत मार्टमध्ये शोरूम, गोदामे, कार्यालये आणि इतर सहायक सुविधा असतील. त्यात जड मशिनरीपासून ते किरकोळ वस्तूंपर्यंत सर्व श्रेणीतील वस्तूंचा समावेश असेल. मुख्य म्हणजे ‘भारत मार्ट’ विविध श्रेणींच्या भारतीय उत्पादनांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून काम करेल. याचा अर्थ असा की, इथे एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध असतील.
संयुक्त अरब अमिरात (यूएई)- भारत यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचा एक भाग म्हणून ऑगस्ट २०२२ मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या करारात दोन्ही देशांदरम्यान २०३० पर्यंत पेट्रोलियम वगळता इतर व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचादेखील समावेश आहे. या घोषणेच्या एका वर्षानंतर दुबईतील भारताचे तत्कालीन महावाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी ‘खलीज टाइम्स’ला सांगितले, “आम्ही अशा प्रकल्पाची वाट पाहत आहोत, जिथे एक ‘भारत मार्ट’ असेल. जिथे भारतीय निर्यातदारांना आपली उत्पादने प्रदर्शित करता येतील.”
२०२३ मध्ये ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात असे म्हटले होते की, डीपी वर्ल्डच्या जेबेल अली फ्री झोन ऑथॉरिटी (जेएएफझेडए)मध्ये ही सुविधा एक लाख चौरस मीटरमध्ये आहे. ही जागा गोदाम, रिटेल व हॉस्पिटॅलिटी युनिट्स अशा सर्व गोष्टींसाठी असणार आहे. डीपी वर्ल्ड जीसीसीमधील पार्क्स आणि झोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अल हाश्मी यांनी संगितले, “भारत मार्ट ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांची जगभरात निर्यात करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.” टाटा मोटर्स च्या जग्वार, लँड रोव्हरसह अनेक कंपन्या भारत मार्टचा एक भाग होण्यासाठी फार पूर्वीपासून इच्छुक असल्याचे डीपी वर्ल्ड यूएई आणि जेबेल अली फ्री झोन अथॉरिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांनी संगितले. त्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची योजनादेखील समाविष्ट असणार आहे. त्यामुळे जागतिक खरेदीदार सुलभ आणि सोईस्कर पद्धतीने वस्तू खरेदी करू शकतील.
‘भारत मार्ट’चे फायदे
‘भारत मार्ट’सारखी सुविधा भारतासाठी, तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील व्यापारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत मार्ट भारतीय कंपन्यांना आफ्रिका आणि युरोपसह युनायटेड स्टेट्समध्ये व्यापाराचा विस्तार करण्यास मदत करेल. या सुविधेमुळे भारत आणि उर्वरित जगामध्ये माल पाठविण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्चदेखील कमी होईल. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, भारत मार्टमुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने प्रदर्शित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भारत-यूएई व्यापार संबंधदेखील मजबूत होतील. ‘न्यूज१८’ने दिलेल्या वृत्तानुसार २०२२-२३ पर्यंत संयुक्त अरब अमिरात (यूएई )सोबतचा भारताचा व्यापार ८५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. भारतात ३.५ बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसह थेट परकिय गुंतवणुकी(एफडीआय)मध्ये संयुक्त अरब अमिरात चौथ्या क्रमांकाचा देश व भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदारदेखील आहे.
चीनच्या ड्रॅगन मार्टला टक्कर
जेबेल अली फ्री झोन ऑथॉरिटी येथे तयार होत असलेले भारत मार्ट हे चीनच्या ड्रॅगन मार्टसारखेच आहे. ड्रॅगन मार्ट सर्वांत मोठे चिनी व्यापार केंद्र आहे; जिथे सुमारे ४,००० चिनी मालकीची दुकाने आहेत. त्यांमधून विविध प्रकारच्या उत्पादित वस्तूंची विक्री केली जाते. कपडे आणि दागिन्यांपासून फर्निचरपर्यंत सर्व वस्तू येथे एकाच ठिकाणी मिळतात. ड्रॅगन मार्टचा पहिला मॉल २००४ मध्ये बांधण्यात आला. २०१५ मध्ये याच्याच बाजूला दुसरी इमारत तयार करण्यात आली. ड्रॅगन मार्टमध्ये सिनेमासह जगभरातील भोजनालयांचाही समावेश आहे.
यूएईमध्ये भारत मार्टचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि यूएईचे उपाध्यक्ष व दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतौम यांनी केले. छोट्या व्यावसायिकांना ‘भारत मार्ट’द्वारे जागतिक पातळीवर वस्तूंची विक्री करता येणार आहे. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम पाहायला मिळेल. २०२५ पर्यंत ‘भारत मार्ट’ पूर्ण क्षमतेने सुरू होईल.