देशातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने विकसित केलेले ‘भारतपोल’ पोर्टल लॉंच केले आहे. सुरुवातीला, ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केंद्रीय अन्वेषण एजन्सीद्वारे केला जात असे. परंतु, ते आता राज्य पोलिस दलांसह सर्व एजन्सींसाठी उपलब्ध असणार आहे. सायबर गुन्ह्यांपासून ते अगदी परदेशातील गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत या पोर्टलचा फायदा होणार आहे. पण, हे पोर्टल नक्की काय आहे आणि देशाच्या पोलिस विभागांना याचा कसा फायदा होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
भारतपोल म्हणजे काय?
भारतपोल हे आंतरराष्ट्रीय पोलिस सहकार्याद्वारे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरुद्ध कारवाई करण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेले पोर्टल आहे. या पोर्टलमुळे केंद्र आणि राज्य तपास यंत्रणांना इंटरपोलशी जोडण्यास सक्षम करते आणि त्यामुळे तपासाला गती मिळण्यास मदत होते. नॅशनल सेंट्रल ब्युरो फॉर इंटरपोल इन इंडिया (एनसीबी-नवी दिल्ली) म्हणून, सीबीआय देशभरातील विविध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांबरोबर गुन्हेगारी प्रकरणांवर आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी जबाबदार आहे. या समन्वयामध्ये केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरांचा समावेश होतो आणि यात इंटरपोल संपर्क अधिकारी (आयएलओ) कार्यरत असतात.
हेही वाचा : इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. व्ही. नारायणन कोण आहेत?
इंटरपोल संपर्क अधिकारी युनिट ऑफिसर्स (यूओ) बरोबर काम करतात, जे विशेषत: पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त किंवा त्यांच्या संस्थेतील शाखाप्रमुख असतात. सध्या सीबीआय, आयएलओ आणि यूओमधील संवाद हा पारंपरिक पद्धतीने होतो. जसे की, पत्र, ईमेल आणि फॅक्स आणि त्यामुळे गंभीर प्रकरणांचा निवाडा करण्यासाठी विलंब होऊ शकतो. सायबर क्राइम, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी यांसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने, जलद आणि अधिक कार्यक्षम आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे.
इथेच भारतपोल महत्त्वाची भूमिका बजावते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, भारतपोलमुळे भारतातील प्रत्येक यंत्रणा आणि पोलिस दलाला तपासाला गती मिळते आणि इंटरपोलशी सहज संपर्क साधण्यास मदत होते. हे पोर्टल राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय यंत्रणांमधील पोलिस दलांना परदेशात फरार किंवा इतर गंभीर प्रकरणांच्या माहितीसाठी इंटरपोलला त्वरित विनंती पाठविण्यास सक्षम करेल. २०२४ मध्ये भारताने परदेशात राहणाऱ्या २६ फरार गुन्हेगारांना इंटरपोलद्वारे यशस्वीरित्या परत आणले. २०२१ पासून जवळपास १०० गुन्हेगारांचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. नवीन प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट परदेशात असलेल्या गुन्हेगारांचा समावेश असलेल्या खटल्यांचा वेग वाढवणे आहे.
भारतपोलचे प्रमुख वैशिष्ट्य – रिअल-टाइम इंटरफेस
गृहमंत्र्यांच्या मते, पोर्टलचा रिअल-टाइम इंटरफेस हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, जे यंत्रणांमध्ये अखंड आणि प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करते. ते म्हणाले की, प्लॅटफॉर्म विशेषत: रीअल-टाइम डेटा सामायिकरणासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विनंत्यांना प्रतिसाद देईल. यामध्ये जागतिक नेटवर्कद्वारे रेड कॉर्नर नोटीस आणि इतर अलर्ट जारी करणे समाविष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे भारतात गुन्हे करणारे आणि इतर देशांमध्ये पळून जाणारे गुन्हेगार भारतीय कायदे टाळण्यात यशस्वी झाले आहेत. “भारतपोलसारख्या आधुनिक यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे अशा गुन्हेगारांना आता न्यायाच्या कक्षेत आणता येईल,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारतपोलचे पाच प्रमुख मॉड्यूल
मंगळवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे बोलताना अमित शाह यांनी भारतपोलच्या पाच प्रमुख मॉड्यूल्सकडे लक्ष वेधले: कनेक्ट, इंटरपोल नोटीस, संदर्भ, प्रसारण आणि संसाधने. हे मॉड्यूल सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना समर्थन देण्यासाठी एक तांत्रिक फ्रेमवर्क प्रदान करतात.
कनेक्ट : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना इंटरपोलच्या नॅशनल सेंट्रल ब्युरो (NCB-नवी दिल्ली) चा विस्तार म्हणून काम करण्याची परवानगी देते.
इंटरपोल नोटीस : १९५ देशांमधील तपासासाठी आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करते.
ब्रॉडकास्ट : १९५ देशांकडून सहाय्य विनंत्यांची त्वरित उपलब्धता सुनिश्चित करते.
रिसोर्सेस : दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि व्यवस्थापन सुलभ करते.
तपासात आंतरराष्ट्रीय सहकार्य जलद आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे व्यासपीठ विकसित केले गेले आहे.
अमित शाह या पोर्टलच्या लॉन्चिंगप्रसंगी काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतपोल पोर्टलचे कौतुक केले आणि सांगितले की, ते भारतीय पोलिस विभागांना विविध जागतिक गुन्ह्यांचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यास मदत करेल आणि प्रतिबंधात्मक फ्रेमवर्क तयार करण्यास सक्षम करेल. “याद्वारे आम्ही अंतर भरून काढू शकू, भरपूर माहिती मिळवू आणि विविध प्रकारच्या जागतिक गुन्ह्यांचे अचूक विश्लेषण करू शकू; ज्यामुळे आम्हाला हे गुन्हे आपल्या देशात घडण्यापूर्वी रोखण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करता येईल,” असे ते म्हणाले.
या पोर्टलमुळे केवळ परदेशात भारतीय गुन्हेगारांचा माग काढण्यातच मदत होणार नाही, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना भारतात शोधण्यासाठी एक यंत्रणाही स्थापन होईल, असे शाह यांनी नमूद केले. “भारतपोलच्या माध्यमातून आम्ही गुन्हेगारांना शोधण्यात सक्षम होऊ आणि जगभरातील गुन्हेगारांना भारतात शोधण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रणालीदेखील स्थापित करू. याव्यतिरिक्त, इंटरपोलच्या साह्याने १९५ देशांचा समावेश आहे. इंटरपोल चॅनेलद्वारे तपासासाठी आंतरराष्ट्रीय सहाय्य प्रदान करणे आणि प्राप्त करणे अधिक सोपे होईल,” असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
भारतपोलच्या अंमलबजावणीसाठी सीबीआयने नेतृत्व करावे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. “यामुळे न्यायव्यवस्था मजबूत होईल, पारदर्शकता वाढेल आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नांची एकूण कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारेल,” असे ते म्हणाले. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात शाह यांनी ३५ पुरस्कार विजेत्या सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिस पदकेही प्रदान केली. यामध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी गृहमंत्री पदक यांचा समावेश आहे.