‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ‘केजीएफ’सारख्या चित्रपाटाने याने कमाईच्या आकड्यात मागे टाकलं असून आता हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या दोन्ही भाषेत प्रदर्शित केला आहे. सगळीकडूनच याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणाऱ्या सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. याबरोबरच कर्नाटकतील प्रथा परंपरा याचं अचूक चित्रण यात केलेलं आहे. या चित्रपटात कर्नाटकातील ‘कोला’ या उत्सवाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. हा उत्सव आणि ‘भूता कोला’ ही प्रथा नेमकी आहे तरी काय ते आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूता कोला हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कलाप्रकार म्हणून चांगलाच प्रचलित आहे. दक्षिण कर्नाटकातील भूता कलाप्रकार आणि केरळमधील ‘थय्यम’ यामध्ये आपल्याला बरंच साम्य आढळून येईल. थोडक्यात या प्रथेत त्या भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे.

आणखी वाचा : Kantara Movie Review : आपल्या परंपरेला आणि लोककलेला अभिमानाने जगासमोर सादर करणारा ‘कांतारा’

ही लोककला सादर करणारे कलावंत एका विशिष्ट समाजातील विशिष्ट कुटुंबातील असतात. वाड वडिलांपासून या समाजात एखादे कुटुंब ही कला सादर करत आते. बऱ्याचदा या उत्सवाला आणि लोककलेला काही लोकं विरोध करतात आणि हे थोतांड आहे असं म्हणतात, पण त्यावेळी मात्र त्या देवतेचा प्रकोप होतो असं इथले गावकरी मानतात. जी व्यक्ती ही कला सादर करते ती वाद्यांच्या तालावर नृत्य करीत असते आणि यादरम्यान त्या व्यक्तीमध्ये देवाचा वास असतो असं मानलं जातं. हे एक प्रकारचे विधीनाट्य असते, ज्यात देवता प्रसन्न होवून आशीर्वाद देते. देवतेची रंगभूषा आणि वेशभूषा आकर्षक असते. महाराष्ट्रातील गावात होणारा ‘वाघ्या मुरळी’ हा प्रकारदेखील याच पठडीतल्या लोककलेसारखा आहे.

कर्नाटकतील काही गावात आजही हा उत्सव साजरा केला जातो. इथल्या गावातील बरेच लोक कामानिमित्त आता मुंबईत किंवा इतर मोठ्या शहरात स्थायिक झाले असल्याने या लोककलेला व्यावसायिक रूप प्राप्त झालं आहे. पण आजही इथले बरेच गावकरी ही प्रथा नित्यनेमाने पाळतात आणि त्यांचा यावर पूर्ण विश्वास आहे. जी व्यक्ती ‘कोला’ सादर करते तिला संपूर्ण गावात एक विशेष सन्मान दिला जातो.

कांतारा या चित्रपटामुळे कर्नाटकातील ही लोककला जगासमोर आली आहे. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा असा सवालही काही लोकांनी केला आहे. आपल्या देशात विविध खेड्यात, गावात अशा वेगवेगळ्या लोककला अस्तित्त्वात आहेत ज्या हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. त्यापैकी एका परंपरेला आणि लोककलेला जगासमोर सादर करायचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is bhuta kola a form of folk art from karnataka shown in kannada film kantara avn