भारतीय शास्त्रज्ञांनी ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वा त्याहून अधिक वेगाने मार्गक्रमण करणारे लघु पल्ल्याचे बीएम – ०४ हे नवीन हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. या अतिवेगवान शस्त्राने शत्रूला बचावाची फारशी संधी न देता जलद व अचूक प्रहार करणे दृष्टीपथास येणार आहे.

लघु की मध्यम पल्ल्याचे?

हैदराबादमध्ये आयोजित ‘विज्ञान वैभव २०२५’ प्रदर्शनात बीएम – ०४ या क्षेपणास्त्राची प्रतिकृती माहितीसह सादर करण्यात आली. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास प्रतिष्ठानने (डीआरडीओ) विकसित केलेले हे एक कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ‘एसआरबीएम’ (शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाइल) वर्गीकृत असूनही त्याचा पल्ला ४०० ते १५०० किलोमीटर आहे, जो मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राइतका होतो. परंतु, ते कमी पल्ल्याचेच क्षेपणास्त्र असल्याचे डीआरडीओचे म्हणणे आहे.

रचना, क्षमता…

बीएम – ०४ ची एकंदर रचना अग्नी – १ या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासारखी आहे. त्याचा विलक्षण वेग आणि क्षमता त्याला बहुउपयोगी घातक शस्त्र म्हणून शस्त्रागारात स्थान मिळवून देईल. १०.२ मीटर लांबीच्या क्षेपणास्त्राचे वजन ११ हजार ५०० किलो आहे. क्षेपणास्त्रांच्या वेगाची स्पष्टता झालेली नाही. परंतु, दोन टप्प्यातील हे क्षेपणास्त्र ‘बुस्ट ग्लाईड व्हेईकल’ असेल. म्हणजे बीएम – ०४ हायपरसॉनिक (माक – पाच आणि त्याहून अधिक ) वेगाने मार्गक्रमण करू शकते. घन इंधनावर ते आधारित आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली व जीपीएसचा वापर करेल. ५०० किलो स्फोटके (वॉरहेड्स) ते वाहून नेईल. अचूकतेच्या मापदंडातदेखील ते सरस ठरले. वाहनावरून ते डागता येईल. अवघ्या काही मिनिटांत ते लक्ष्यभेद करू शकते.

धोरणात्मक फायदे

आधुनिक युद्धात वेळ व अनुकूलता महत्त्वाची असते. असा आयाम लाभलेली शस्त्रे मौल्यवान संपत्ती ठरतात. बीएम – ०४ क्षेपणास्त्र त्याच गटात समाविष्ट होईल. कारण त्यातून महत्त्वाच्या लक्ष्यांवर जलद आणि अचूक मारा करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध होईल. ध्वनीच्या वेगापेक्षा लक्षणीयरीत्या वेगवान प्रवास करण्यासाठी रचनाबद्ध केलेल्या वाहनामुळे (हायपरसॉनिक ग्लाईड बॉडी) उड्डाणादरम्यान उच्च गती राखते. ज्यामुळे ते रोखणे कठीण होते. रडार व क्षेपणास्त्राचे धोके टळतात. यामुळे चीन वा पाकिस्तानसारख्या शेजारील देशांनी विशिष्ट क्षेत्रात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी आणि लढाऊ क्षेत्रात क्षमता मर्यादित करण्यासाठी तैनात केलेल्या प्रणालीविरोधात ते प्रभावी ठरते. एक हजार किलोमीटरच्या परिघातील शत्रूची ठिकाणे, क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारा समूह अथवा नौदल जहाजांना लक्ष्य करण्याची क्षमता यामुळे भारतीय सशस्त्र दलांची प्रतिकारशक्ती विस्तारणार आहे.

निवडक देशांच्या पंक्तीत

जगात अमेरिका, रशिया आणि चीन अशा काही निवडक देशांकडेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. बीएम – ०४ क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. गतवर्षी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीतून भारताने अत्यंत प्रगत व उपयुक्त लष्करी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या समूहात स्थान मिळवले. विश्लेषकांच्या मते बीएम – ०४ ची रचना दृश्य स्वरुपात अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक डार्क ईगल सारखी (एलआरएचडब्ल्यू) आहे. तथापि, बीएम – ०४ प्रक्षेपित करण्यासाठी वापरला जाणारा गोलाकार कंटेनर अर्थात कॅनिस्टर आणि उड्डाण व्यवस्थेची जुळवणी वेगळी आहे. ‘एलआरएचडब्ल्यू’च्या तुलनेत त्याची कार्यक्षमता कमी आहे. चीन व अमेरिका समान शस्त्र विकसित करत आहे. भारताने स्क्रॅमजेट आणि ग्लाईड तंत्रज्ञानात वेगळा मापदंड प्रस्थापित केला. अत्यंत उष्ण तापमानाला तोंड देण्यासाठी विशेष उष्णता प्रतिरोधक साहित्य समाविष्ट केले. त्यामुळे उड्डाणादरम्यान ते अग्निगोलात बदलणार नाही याची शाश्वती मिळते.

प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा विकास…

डीआरडीओने नोव्हेंबर २०२४ च्या अखेरीस डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेतली होती. त्याचा पल्ला दीड हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. विविध प्रकारची स्फोटके, गुप्तचर उपकरणे आणि अन्य युद्धसामग्री ते वाहून नेऊ शकते, असे म्हटले होते. बीएम – ०४ अन्य हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारख्या विद्यमान क्षेपणास्त्र प्रणालींना पूरक ठरू शकते. या निमित्ताने डीआरडीओ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्षेपणास्त्र प्रणालीला चकवा देणाऱ्या आणि वाढीव प्रहार क्षमतेच्या स्वदेशी अर्ध-बॅलिस्टिक प्रलय सामरिक क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिनी सादर झाले होते. भारताच्या आकारास येणाऱ्या क्षेपणास्त्र दलाच्या घातक शस्त्रागारात बीएम – ०४ ची भर पडेल. प्रगत शस्त्रास्त्र विकासातून परकीय अवलंबित्व कमी होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यास बळ मिळणार आहे.

Story img Loader