जगातल्या प्रत्येक देशाची, प्रदेशाची संस्कृती वेगळी आहे. लोकांची राहण्याची, खाण्याची पद्धत वेगळी असते. याच कारणामुळे प्रदेशानुसार सण आणि उत्सवही बदलतात. काही सण आणि उत्सव तर एवढे निराळे असतात की, त्यांच्याबद्दल माहिती होताच आपण आश्चर्यचकित होतो. सध्या अमेरिकेतील ‘बर्निंग मॅन’ नावाच्या उत्सवाची जगभरात चर्चा होत आहे. अमेरिकेतील नेवादा प्रांतातील वाळवंटी प्रदेशात या महोत्सवाचे आयोजन केले जाते. करोना महासाथीमुळे तीन वर्षांनंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी या महोत्सवाची सांगता झाली. दरम्यान, या महोत्सवाला आलेले साधारण ७० हजार लोक पाऊस आणि वादळामुळे अडकून पडले होते. याच पार्श्वभूमीवर बर्निंग मॅन महोत्सव काय आहे? या महोत्सवात नेमके काय केले जाते? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महोत्सव कोठे आयोजित केला जातो?

बर्निंग मॅन महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार अमेरिकेतील नेवादा येथील प्लाया नावाच्या वाळवंटी प्रदेशात या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवासाठी ब्लॅक रॉक नावाने तात्पुरते शहर उभारले जाते. प्रत्येक उन्हाळ्याच्या शेवटी या उत्सवाचे आयोजन केले जाते.

बर्निंग मॅन महोत्सवाचे स्वरूप काय असते?

हा महोत्सव एकूण नऊ दिवसांचा असतो. वेगवेगळ्या संस्कृतीचे, देशाचे लोक या महोत्सवात सहभागी होतात. महोत्सवादरम्यान येथे गीत, संगीत सादर केले जाते. तसेच वेगवेगळ्या कला, संस्कृतीचेही प्रदर्शन होते. ‘बर्निंग मॅन प्रोजेक्ट’ नावाच्या ना नफा-ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेकडून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवाच्या नऊ दिवसांत समविचारी लोक एकत्र येतात. खूप मौज-मजा करतात. तसेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मानवाची प्रतिकृती असलेल्या एका पुतळ्याला येथे जाळले जाते. हा पुतळा जाळल्यानंतर बर्निंग मॅन उत्सवाची सांगता होते.

बर्निंग मॅन महोत्सवाच्या अटी काय?

बर्निंग मॅन महोत्सवात नव्या विचारांचा स्वीकार करणारे लोक उत्साहाने सहभाग नोंदवतात. या महोत्सवात कोणीही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी कुठलीही अट नाही. तसेच महोत्सवात सहभागी होऊन एकमेकांना भेटवस्तू देता येतात. तसेच उत्सव संपल्यानंतर त्यामध्ये सहभागी झाल्याची कोणतीही आठवण किंवा चिन्हे कायम न ठेवण्यावर भर दिला जातो. उत्सवादरम्यान लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून पैसे खर्च केले जात नाहीत. उलट प्रत्येकाने समोर येऊन कोणतीही फिस न घेता मोफत सादरीकरण करावे, अशी अपेक्षा असते. लोक वाळवंटात स्कुटर किंवा सायकलवर फिरतात. ठिकठिकाणी जेवण तयार करतात, गाणे गातात, मद्यप्राशन करतात. म्हणजेच जीवनाचा मुक्तपणे आनंद लुटतात. यासह या उत्सवादरम्यान वाईन टेस्टिंग, मसाज, झीप लाईनिंग, टॅटो काढणे अशा वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. विशेष म्हणजे या सर्व सेवा विनामूल्य असतात. या महोत्सवादरम्यान अनेक लोक विवाहदेखील करतात.

प्रत्येक वर्षी या महोत्सवाला किती लोक येतात?

मिळालेल्या माहितीनुसार नऊ दिवसांच्या या महोत्सवात जगभरातून हजारो लोक सहभागी होतात. २०१८ साली या महोत्सवासाठी तिकिटांची किंमत ४२५ ते १२०० डॉलरपर्यंत होती. २०१७ साली या महोत्सवाला साधारण ७० हजार लोकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सेलिब्रिटी, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स, टेक कंपन्यांच्या सीईओंचा समावेश होता. या महोत्सवासाठीच्या तिकिटांची विक्री फार लवकर होते.

यावर्षी ७० हजार लोक का अडकले होते?

मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी आयोजित केलेल्या बर्निंग मॅन महोत्सवात साधारण ७० हजार लोक अडकून पडले होते. कारण या भागातील वाळवंटात फार मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळ आले होते. पाऊस आणि वादळामुळे हा महोत्सव काही काळासाठी थांबवण्यात आला होता. तसेच सहभागी झालेल्या लोकांना अन्न साठवून ठेवण्याचा, पाणी जपून वापरण्याचा, तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is burning man festival of america know detail information prd
Show comments