सध्या तंत्रज्ञानाच्या जगात रोजच नवनवी प्रगती होत आहे. आपल्या हातातील मोबाइलवर जगातील कोणतेही काम करता येते; पण याच मोबाईलच्या माध्यमातून अनेकांची फसवणूकदेखील होते. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करून आतापर्यंत लाखोंची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, सध्या ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’ची चर्चा होत आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यांची, तसेच इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कॉल फॉरवर्डिंग स्कॅम काय आहे? अशा प्रकारच्या स्कॅमपासून कसे सुरक्षित राहायचे? हे जाणून घेऊ.
कॉल फॉरवर्डिंग स्कॅम
दूरसंचार विभागाने नुकताच देशातील जनतेला कॉल फॉरवर्डिंग स्कॅमपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अनोळखी फोन कॉल्स किंवा मेसेजला उत्तर देताना काळजी घ्या, असे दूरसंचार विभागाने सांगितले आहे. कॉल फॉरवर्डिंग स्कॅम ही अशी फसवणूक आहे; ज्यामध्ये अनोळखी नंबरवरून कॉल येतो. या कॉलमध्ये *४०१# क्रमांक डायल करण्यास सांगितले जाते. *४०१# या अंकानंतर एखादा अनोळखी मोबाईल नंबर डायल करण्यास सांगितले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीची आर्थिक, तसेच इतर पद्धतीने फसवणूक केली जाते.
*४०१# क्रमांकाचे गूढ
“एखाद्या व्यक्तीने *४०१# हा क्रमांक डायल करून, समोरच्या व्यक्तीने सांगितलेले मोबाइल क्रमांक टाकल्यास संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर कॉल फॉरवर्डिंगची सेवा आपोआप सुरू होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला आलेले सर्व फोन कॉल्स हे अन्य अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर पाठवले जातात. प्राप्त झालेल्या फोन कॉल्सच्या मदतीने संबंधिताची फसवणूक केली जाऊ शकते,” असे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.
ही फसवणूक नेमकी कशी केली जाते?
दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार- आरोपी आम्ही टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपनीचे ग्राहक सेवा प्रतिनिधी किंवा तांत्रिक सेवा देणारे कर्मचारी असल्याचे सांगतात. एकदा विश्वास संपादन केल्यावर या आरोपींकडून लोकांची फसवणूक केली जाते. तुमच्या मोबाईलमधील सिम कार्ड खराब झालेले आहे किंवा तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कची काही अडचण आहे, असे लोकांना सांगितले जाते. त्यानंतर फोनवरील चर्चेदरम्यान आरोपी लोकांना त्यांच्या मोबाईलवर *४०१# यासारखे विशिष्ट कोड नंबर डायल करायला सांगतात. हा कोड नंबर डायल केल्यास तुमच्या मोबाईलमधील अडचण दूर होईल, असे सांगितले जाते. हा विशिष्ट कोड साधारणपणे *४०१# या आकड्याने सुरू होतो. त्यानंतर ग्राहकांना एक मोबाईल क्रमांक टाकायला सांगितले जाते.
… येथूनच खऱ्या फसवणुकीला सुरुवात
वर उल्लेख केलेला विशिष्ट कोड, तसेच अनोळखी मोबाईल क्रमांक डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर कॉल फॉरवर्डिंगची सेवा आपोआप सुरू होते. विशेष म्हणजे याबाबत मोबाईलच्या मालकाला कसलीही कल्पना नसते आणि येथूनच खऱ्या फसवणुकीला सुरुवात होते. संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर फोन कॉल्स येणे बंद होतात. मोबाईलवर कॉल फॉरवर्डिंगची सेवा चालू असल्यामुळे आलेले फोन कॉल्स थेट फसवणूक करणाऱ्यांकडे जातात.
मेसेजिंग अॅप्सची माहिती केली जाते संकलित
कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून आलेल्या फोन कॉल्सच्या मदतीने संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. त्यात बँक खात्याचा तपशील, व्हॉट्सअॅप यांसारखे मोबाईलमध्ये असलेले मेसेजिंग अॅप्स यांची माहिती संकलित केली जाते. तसेच व्हॉइस ओटीपीचाही अॅक्सेस घेतला जातो.
सावध राहण्याचा लोकांना सल्ला
गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात एअरटेल, जिओ या टेलिकॉम कंपन्या, तसेच ट्रू कॉलर अशा अॅप्सनी या फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भारताच्या दूरसंचार विभागानेही अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असा सल्ला लोकांना दिला आहे.
नेमकी काय काळजी घ्यावी?
दूरसंचार विभागाने सर्व नागरिकांना आपल्या फोनमधील सेटिंग्समध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंगची सुविधा बंद करावी, असे आवाहन केले आहे. “स्वत:च्या फोनचे कसे संरक्षण करायचे, याबाबत आम्ही सातत्याने ग्राहकांना माहिती देत आहोत. दूरसंचार सुविधा देणारी कोणतीही कंपनी ग्राहकांना *४०१# हा क्रमांक डायल करण्यास सांगत नाही. सर्वांनी आपापले मोबाईल पुन्हा एकदा तपासावेत. सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुरू असेल तर ते बंद करावे. जेव्हा गरज असेल तेव्हाच ही सेवा सुरू करावी,” असे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.
कोणताही कोड डायल करू नये
दरम्यान, ग्राहकदेखील आपापल्या पद्धतीने प्रतिबंधक उपाय म्हणून काही खबरदारी घेऊ शकतात. अशा प्रकारचा कोणताही कोड डायल करू नये. तसेच कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून अशा प्रकारचा क्रमांक डायल करण्याची विचारणा झाल्यास, त्याकडे दुर्लक्ष करावे. मोबाईलमध्ये पासकोड, बायोमेट्रिक सुरक्षा व्यवस्था अशा सुरक्षा सुविधांचा वापर सुरू करावा.
बँक खात्याचा तपशील अन् घरचा पत्ता सांगू नये
अशा प्रकारच्या एखादा कॉल आल्यास कोणताही ओटीपी शेअर करू नये. तसेच बँक खात्याचा तपशील, घरचा पत्ता अनोळखी व्यक्तीस सांगू नये. संशयास्पद मोबाईल क्रमांकावरून एखादा मेसेज किंवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नये. अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमचा सर्व तपशील समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो.
तुम्हाला कॉलवर बोलत असलेल्या व्यक्तीची ओळख पटत नसेल किंवा तुम्हाला काही शंका येत असेल, तर लगेच फोन कॉल कट करा आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या तुमच्या कंपनीला याबाबत सांगा.