– पावलस मुगुटमल
यंदाच्या हंगामात जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हंगाम संपता-संपता दीर्घकाळ थंडी अवतरली. थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यातही कडाक्याची आणि दीर्घकाळ थंडी पडली नव्हती. तिच्या वाटेत पावसाळी वातावरणाचे अडथळे सातत्याने निर्माण झाले. पण, शेवटच्या टप्प्यात हवामानाची सर्व गणिते जुळून आल्याने तिने बाजी मारली. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तर थंडीची लाटच अवतरली. मुंबई परिसर आणि कोकणातही थंडीचा कडाका वाढला होता. हंगामात पहिल्यांदाच सलग आठवडाभर राज्याच्या बहुतांश भागातील रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली राहिले. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांत किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली अगदी ६ ते ७ अंशांपर्यंत गेले.
थंडीच्या वाटेतील अडथळे कोणते?
भारतीय ऋतुचक्रानुसार सप्टेंबरअखेर मोसमी पावसाचा हंगाम संपतो आणि ऑक्टोबरला थंडीचा हंगाम सुरू होतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडीला पोषक वातावरण निर्माण होत असते. याच महिन्यात थंडीच्या लाटा आणि गोठवून टाकणारी थंडी पडत असल्याचेे जुनी-जाणती माणसे सांगतात. पण, गेल्या काही वर्षांत आणि यंदाही याच महिन्यांत हवामान बदलांच्या परिणामांनी थंडीला डोके वर काढू दिले नाही. हिंद महासागराचे वाढत जाणारे तापमान आणि हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांची झळ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. तिची प्रखरता यंदाही दिसून आली. एकापाठोपाठ एक निर्माण होणारे पश्चिमी चक्रवात, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे आणि कमी दाबाचे पट्टे, हे पावसासाठी कारणीभूत असलेले घटक आता सातत्याने निर्माण होत आहेत. मूळ हंगामातील कालावधी वाढवून थंडीच्या कालावधीवर पाऊस अतिक्रमण करतो आहे आणि इतर कोणत्याही ऋतूमध्ये त्याची हजेरी असते. जानेवारी महिन्यातही अगदी थंडी अवतरण्याच्या तोंडावर पाऊस झाला.
राज्यातील थंडीचे कारण
अमूक एका ऋतूमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतात किंवा वाहतील, यावर प्रामुख्याने त्या-त्या ऋतूमधील हवामानासंबंधी आडाखे बांधले जातात. महाराष्ट्रातील थंडीसाठी मुख्यत: उत्तरेकडील राज्यांतून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कारणीभूत असतात. हिमालयीन विभागात बर्फवृष्टी होते. त्याचवेळेला उत्तरेकडील राज्यात कोरडे हवामान राहिल्यास ही राज्ये गोठतात. या कालावधीत उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारे वाहू लागल्यास थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात. त्या वेळेला समुद्रातून बाष्प येत नसल्यास हवामान कोरडे राहते आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढतो. त्यातून आपल्याकडेही कडाक्याची थंडी अवतरते. जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात हवामानाची ही सर्व गणिते जुळून आल्याने राज्याच्या किनारपट्टीच्या भागापासून विदर्भापर्यंतच्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीची अनुभूती मिळाली.
थंडीची लाट कशी ठरते?
जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात दीर्घकाळ अवतरलेल्या थंडीच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट अवतरली होती. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश आदी राज्यांत थंडीची तीव्र लाट होती. तेथून थंड वारे दक्षिणेच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे थेट गुजरात, मध्य प्रदेशातही थंडीची लाट आली. त्यामुळे त्यालगतच्या राज्यातील भागातही थंडीची लाट निर्माण झाली. १९८१ ते २०१० या कालावधीत प्रत्येक दिवशी प्रत्येक विभागात तापमान किती होते, त्यानुसार तापमानाची सरासरी काढली जाते. हवामान विभागाच्या निकषांनुसार रात्रीचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत आल्यास आणि ते सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी उणे असल्यास त्या भागात थंडीची लाट आल्याचे जाहीर केले जाते. सरासरीपेक्षा ६.५ अंशांपेक्षा तापमान कमी झाल्यास ती तीव्र लाट असते. मुंबईसह कोकण विभागासारख्या किनारपट्टीच्या भागात हा निकष तापमान १५ अंश आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांनी कमी असल्यास थंडीची लाट समजली जाते. या निकषांनुसार प्रजासत्ताक दिनाला मुंबईसह रत्नागिरी थंडीच्या लाटेच्या अगदी जवळ होती. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी थंडीची लाट होती. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हंगामातील नीचांकी तापमान आणि थंडीचा तीव्र कडाका अनुभवला.
दिवसाचा थंडावा कशामुळे?
राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडी अवतरली होती. पण, याच कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानातही मोठी घट होती. जवळपास सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. काही भागांत ते २३ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. उत्तर भारतात आणि गुजरात, मध्य प्रदेशमध्ये या काळात थंडीची लाट तीव्र होती. या भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट होत असल्याने तेथे थंड दिवसांची स्थिती होती. त्यामुळे महाराष्ट्रातही कमाल तापमानात घट होऊन दिवसाही थंडावा जाणवत होता.
आता अंदाज काय?
हिमालयीन विभागात होणारी बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याची थंडी अनुभवली. जानेवारीच्या २८ तारखेला मध्य भारतात चक्रीय वारे निर्माण झाल्याने काही काळ तापमानात किंचित वाढ झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी उत्तरेकडील वारे पुन्हा प्रभावीपणे सक्रिय झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा थंडीची लाट अवतरली. राज्याचे हवामान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
pavlas.mugutmal@expressindia.com