CBSE बोर्डाने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०: ३०: ३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार आहे. नक्की काय आहे हे मूल्यमापनाचं गणित…समजून घ्या!
मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.
ही टक्केवारी कशी गणली जाईल?
४० टक्के गुण हे बारावीतल्या गुणात्मक कामगिरीवर आधारित असतील. यासाठी विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा किंवा Prelim परीक्षा यामधल्या गुणात्मक कामगिरीवर आधारित ही टक्केवारी असेल. प्रत्येक शाळेतली निकाल समिती याबाबतचा निर्णय घेईल. या निकाल समितीमध्ये शाळेचे प्राचार्य, शाळेतले दोन वरिष्ठ शिक्षक आणि शेजारच्या शाळेत बारावीला शिकवणारे दोन शिक्षक असतील. म्हणजे जर या समितीने ठरवलं की फक्त Prelim परिक्षेच्या आधारे मूल्यमापन करणार तर ते केवळ त्याच परिक्षेतले विद्यार्थ्यांचे गुण विचारात घेतील.
३० टक्क्यांसाठी इयत्ता ११वी मधल्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार केला जाईल. यामध्ये ११ वीच्या अंतिम परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा विचार केला जाईल.
तर उरलेले ३० टक्के हे इयत्ता १०वीतल्या कामगिरीचा विचार करुन देण्यात येतील. यासाठी दहावीच्या विषयांपैकी ज्या तीन विषयांमध्ये विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळाले आहेत त्या गुणांचा विचार केला जाईल. म्हणजे इथे बेस्ट ऑफ ३ हे सूत्र वापरलं जाईल.
या आकडेवारीच्या आधारावर सरासरी काढण्यात येईल आणि मूल्यमापन केलं जाईल.
हे झाले थिअरी परिक्षेबाबत. प्रात्यक्षिक परीक्षा जवळपास सगळ्या शाळांच्या झालेल्या आहेत. त्या परिक्षांचे गुणही यामध्ये समाविष्ट करण्यात येतील. ज्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन अजून झालेलं नसेल त्यांना उरलेल्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास सांगितलं जाईल.
अंतिमतः गुणांचं वाटप काहीसं अशा पद्धतीने केलं जाईलः
जर एखाद्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळाले नाहीत तर?
ज्या विद्यार्थ्यांचे एका विषयातले गुण कमी पडत आहेत, त्यांचा समावेश Compartment या कॅटेगरीत करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा निकालानंतर पुन्हा घेण्यात येईल आणि त्यांना उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल.
ज्यांना एकापेक्षा अधिक विषयांमध्ये कमी गुण आहेत त्यांना मात्र Essential Repeat या कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
मूल्यांकनाबाबत विद्यार्थी असंतुष्ट असतील तर?
ज्या विद्यार्थ्यांना हे मूल्यमापन मान्य नसेल, जे मूल्यमापनाबद्दल असंतुष्ट असतील त्यांना पुन्हा एकदा लेखी परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. ज्यावेळी परिस्थिती सुधारेल, त्यावेळी त्यांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेमध्ये त्यांना जे गुण मिळतील, तेच गुण अंतिम म्हणून ग्राह्य धरले जातील