ChatGPT Open AI System: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनी OpenAI ने ChatGPT या प्रणालीची निर्मिती केली आहे. आठवड्याभरात १ मिलियनहुन अधिक युजर्स असणाऱ्या चॅटजीपीटी या प्रणालीत आपल्याला संवादात्मक पद्धतीने इंटरनेटवरील माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क व ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एकत्र या कंपनीची स्थापना केली होती. काही अंशी मायक्रोसॉफ्टची सुद्धा यात गुंतवणूक आहे. पुढे मस्क यांनी राजीनामा दिला मात्र आर्थिक गुंतवणूक कायम ठेवली होती. या तंत्रज्ञानाची माहिती देताना स्वतः मस्क यांनी सुद्धा हे या कल्पनेचे कौतुक केले होते.
चॅटजीपीटी ही अगदी गूगलची सुधारित आवृत्ती असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे. गूगलवर बऱ्याचदा अधिक विस्तृत माहितीसाठा असल्याने नेमकं उत्तर शोधणं किंवा कल्पनात्मक प्रश्नावर उत्तर शोधणं शक्य होत नाही. अशावेळी चॅटजीपीटी हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुमचा प्रश्न समजून केवळ माहितीच नव्हे तर उदाहरणासहित उत्तर देऊ शकते. चॅटजीपीटीचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे यात तुम्हाला संवाद साधता येतो याचाच अर्थ तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावर सुद्धा आधारित प्रश्न करू शकता.
चॅटजीपीटी म्हणजे नेमकं काय?
ChatGPT हे GPT-3.5 वर आधारित आहे, ज्यात मानवासारखा मजकूर तयार करण्यासाठी सखोल शिक्षण व तंत्रज्ञान वापरले जाते. तुम्हाला नवनवीन संकल्पनांच्या माहितीवर आधारित उत्तर मिळवण्यासाठी चॅटजीपीटीचा उत्तम उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या प्रश्नावर तुम्हाला कविता स्वरूपात उत्तर हवे असल्यास आपण तशी विनंती करून चॅटजीपीटीच्या माध्यमातून काही सेकंदात उत्तर मिळवू शकता.
चॅटजीपीटीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मेमरी. तुमच्या सर्व बॉट संभाषणातील पूर्वीच्या कमेंट व प्रश्न लक्षात ठेवून चॅटजीपीटी आपल्याला उत्तरे शोधण्यात मदत करू शकते. आपण सोयीनुसार हा पर्याय न वापरण्याचा मार्ग निवडू शकता.
गूगल हे तुमच्यासाठी माहिती शोधण्याचं काम करतं पण GPT म्हणजे Generative Pre-trained Transformer. या नावाप्रमाणेच चॅट जीपीटी ही माहिती जनरेट म्हणजे निर्माण करण्यास सक्षम आहे. तुम्हाला इंटरेटवरील हजारो लेख वाचून त्यातून हवं असणारं अचूक उत्तर ही प्रणाली देऊ शकते. हे उत्तर पॅराग्राफ, लेख, कविता, कथा कोणत्याही स्वरूपात असू शकतं.
हे ही वाचा<< विश्लेषण: ‘Gaslighting’ ठरला Word Of The Year! अर्थ वाचून नक्कीच श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण येईल
आतापर्यंत, ओपनएआयने केवळ मूल्यमापन आणि बिटा चाचणीसाठी चॅटजीपीटी वापरण्यास उपलब्ध केले आहे. परंतु पुढील वर्षी ही सिस्टीम API वर उपलब्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. यानंतर विकसक त्यांच्या स्वतःच्या सॉफ्टवेअरमध्ये ChatGPT लागू करू शकतील.
गृहपाठ ते कोडिंग…
आतापर्यंत अनेकांनी चॅटजीपीटीचे कौतुक केले आहे. उदाहरणार्थ, युट्युबर लिव बोरी याने म्हंटले की मुलांनी गृहपाठावर तासंतास घालवण्याची आता गरजच वाटणार नाही कारण त्यांच्यासाठी ChatGPT हे काम करेल. तर सॉफ्टवेअर स्टार्ट-अपचे संस्थापक अमजद मसद यांनी कोडमधील त्रुटी शोधण्यासाठी चॅटजीपीटीची मदत घेतली होती. मसद म्हणतात की काही सेकंदातच या सिस्टीमने आपल्याला चुका दाखवून अचूक कोड बनवण्यास मदत केली होती.
चॅटजीपीटीच्या मर्यादा
दरम्यान सर्व तंत्रज्ञानाप्रमाणेच चॅटजीपीटीला सुद्धा मर्यादा आहेत. ChatGPT विस्तृत व नेमकी माहिती देऊ शकत असले तरीही या माहितीची सत्यता १०० टक्के योग्य असेल याची खात्री नाही. चॅटजीपीटी जितकी उत्तरे देऊ शकतात तितकेच या सिस्टीममध्ये प्रश्न नाकारले सुद्धा जाऊ शकतात. भविष्यात या सिस्टीममध्ये सुधारणा करून आणखीन प्रगती तंत्रज्ञान समोर येऊ शकते पण यामुळे बेरोजगारीची समस्या वाढण्याची शक्यताही तितकीच गंभीर आहे.