-मोहन अटाळकर

विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्‍या चिखलदरा येथे सुमारे ४०७ मीटर लांबीचा काचेचा पूल (स्‍कायवॉक) उभारला जात आहे. या प्रकल्‍पाचे ७० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जगात स्वित्झर्लंड तसेच चीनमध्ये स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. मात्र भारतातील हा स्कायवॉक सर्वाधिक लांबीचा असणार आहे. सिडकोच्‍या चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण असणार आहे. या प्रकल्‍पाला राज्‍य वन्‍यजीव मंडळाची मंजूरी मिळाली असली, तरी केंद्रीय वन्‍यजीव मंडळाच्या मान्‍यतेची प्रतीक्षा आहे. या स्‍कायवॉकच्‍या मार्गात अनेक अडथळे आले आहेत, त्‍यामुळेच हा प्रकल्‍प केव्‍हा पूर्णत्‍वास जाणार असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

Supreme Court comments on green spaces in Mumbai Navi Mumbai
मुंबई, नवी मुंबईतील ‘हरित फुप्फुसे’ जपायला हवीत; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; राज्य सरकारला फटकारले
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Indices Sensex and Nifty decline to highs print eco news
नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची २६४ अंशांनी गाळण
Nagpur airport marathi news
नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…
Sensex Nifty high index print eco news
सेन्सेक्स-निफ्टीचे उच्चांकी शिखर
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
mmrda to do structural audit of 3 flyover on santacruz chembur link road
सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यावरील तीन पुलांची संरचनात्मक तपासणी होणार, बारा वर्षातच संरचनात्मक तपासणीची वेळ
women consume max amount of alcohol
सर्वात जास्त मद्यपान करतात ‘या’ ७ राज्यातील महिला, पाहा यादी

चिखलदरा स्‍कायवॉकची वैशिष्‍ट्ये काय?

चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणाऱ्या या प्रकल्‍पाला २०१८मध्‍ये राज्‍य सरकारने परवानगी दिली होती. यासाठी ३४.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा जगातील पहिला काचेचा सिंगल केबल रोप सस्‍पेन्‍शन पूल ठरणार आहे. जगातील हा तिसरा काचेचा स्‍कायवॉक असला, तरी हा सर्वाधिक लांबीचा आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येईल. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. उंचीवरून मेळघाटचे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवण्याची संधी या निमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.

प्रकल्‍पाच्‍या मार्गात कोणते अडथळे आले?

सिडकोने या प्रकल्‍पाच्‍या कामाला सुरूवात केल्‍यानंतर जुलै २०२१मध्ये केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने काही त्रुटी काढून परवानगी नाकारली होती. त्‍यानंतर या प्रकल्‍पाचे काम थांबले. केंद्रीय वन्‍यजीव मंडळाच्‍या परवानगीअभावी सध्‍या या प्रकल्‍पाचे काम रखडले आहे. चिखलदरा विकास आराखड्यानुसार मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील १११ हेक्‍टर क्षेत्र चिखलदरा नगर परिषद क्षेत्रात येते. मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पाला जैवविविधतेमुळे वन्‍यजीव संवर्धनाच्‍या बाबतीत महत्त्‍वाचे स्‍थान आहे. या प्रकल्‍पासाठी ०.९२ हेक्‍टर वनजमीन लागणार आहे. चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी नवीन योजना प्रस्‍तावित असल्‍या, तरी त्‍याचा परिणाम वन्‍यजीवांवर होण्‍याची शक्‍यता केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्‍या अभ्‍यास अहवालात वर्तवण्‍यात आली होती.

मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पाचे महत्त्‍व काय?

देशात व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत १९७३-७४ मध्‍ये अधिसूचित करण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या नऊ प्रकल्‍पांपैकी एक असलेला मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍प चिखलदरा आणि धारणी तालुक्‍यात आहे. ९०० हून अधिक वनस्पती, ३५ प्रकारचे सस्तन प्राणी २९५ प्रजातींचे पक्षी आणि ना-ना विविधतेने नटलेला हा परिसर आहे. व्याघ्रप्रकल्प योजनेत विशेष संरक्षण मिळाल्यामुळे तेथील जैवविविधता टिकून राहण्यास मोलाची मदत झाली आहे. वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्‍यासाठी या भागात प्रयत्‍न केले जात असताना पर्यटनाच्‍या संधीही उपलब्‍ध करून देण्‍यासाठी हालचाली सुरू आहेत.

स्‍कायवॉकसमोरील आव्‍हाने काय आहेत?

स्‍कायवॉक प्रकल्‍पांमुळे चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी वाढून पर्यटन व्‍यवसायाला चालना मिळेल, असे सांगितले जात असले, तरी गर्दीचे नियंत्रण, व्‍यवस्‍थापन करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्‍हान असणार आहे. लोकांच्‍या बेफिकीर वृत्‍तीमुळे जंगलात आगीच्‍या घटना घडतात, त्‍यामुळे मौल्‍यवान वनसंपत्तीचा मोठा भाग नष्‍ट होऊ शकतो. त्‍यामुळे अग्निसुरक्षेचे कडक उपाययोजना आखणे आवश्‍यक ठरणार आहे. थंड हवेच्‍या ठिकाणी माकडांचा वाढलेला वावर हा जटील प्रश्‍न होत चाललेला आहे. या ठिकाणी माकडांचा उपद्रव रोखण्‍यासाठी देखील उपाययोजना करावी लागणार आहे. माकडांना खायला न घालण्‍याबाबत लोकांना जागरूक करणे आवश्‍यक आहे. प्‍लास्टिकच्‍या कचऱ्याची मोठी समस्‍या भेडसावत असताना स्कायवॉक परिसरात तो रोखण्‍याचे प्रयत्‍न करावे लागतील, असे अभ्‍यास अहवालात म्‍हटले आहे.

प्रकल्‍पाची सद्यःस्थिती काय आहे?

स्‍कायवॉक प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच राखीव वन क्षेत्रात विकसित करण्यात येत आहे. वन (संवर्धन) अधिनियम, १९८० आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत सिडकोने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय वन मंत्रालयाने काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली होती. या प्रकल्पाला सिडकोकडून वित्तपुरवठा करण्यात येत असून स्कायवॉकचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्कायवॉकला राज्‍य वन्‍यजीव मंडळाने मान्‍यता दिली आहे. केंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्‍यमंत्री आणि अमरावती जिल्‍ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्‍या महिन्‍यात झालेल्‍या आढावा बैठकीत सांगितले होते.

चिखलदरा पर्यटनवाढीसाठी अजून काय वाव आहे?

दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ता, वातावरणातील गारवा, हाड गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदऱ्याचे सौंदर्य पावसात आणखी फुलले असते. साधारणत: जून-जुलै महिन्यापासून चिखलदरामधील पर्यटन हे सुरू होत असते. चिखलदरा येथे अनेक प्रेक्षणीय स्‍थळे आहेत. सोबतच मेळघाटची जंगल सफारी हेही आकर्षण आहे. स्‍कायवॉक प्रकल्‍प पुढील वर्षी पूर्ण होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या प्रकल्‍पामुळे पर्यटनाच्‍या वाढीला चालना मिळेल आणि स्‍थानिकांना रोजगारांच्‍या संधी उपलब्‍ध होऊ शकतील, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.