लग्न ही संकल्पना प्रत्येक देशात सारखी आहे. मात्र, प्रत्येक देशात त्यांच्या त्यांच्या विधी आणि परंपरेनुसार लग्न केली जातात. परंतु, मृतात्म्यांची लग्न होताना आपण पाहिलं आहे का? हा प्रश्नच जरा विचित्र आहे, परंतु हा प्रकार प्रत्यक्षातदेखील घडत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘घोस्ट मॅरेज.’ ही चीनमधील प्राचीन प्रथा आहे. ही प्रथा जवळजवळ तीन हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते, यानुसार मृतदेहाशी लग्न केले जाते. ‘घोस्ट मॅरेज’ म्हणजे नक्की काय? ही प्रथा आजही का सुरू आहे? त्यामागील नेमका उद्देश काय असतो? त्याविषयी जाणून घेऊ.
‘घोस्ट मॅरेज’ म्हणजे काय?
‘घोस्ट मॅरेज’ म्हणजेच भूत विवाह ही प्रथा तीन हजार वर्षे जुनी एक प्राचीन प्रथा असल्याचे सांगितले जाते. या प्रथेनुसार मृत व्यक्तीचे लग्न दुसऱ्या मृत व्यक्तीशी किंवा काही प्रसंगी मृत व्यक्तीचे लग्न जिवंत असलेल्या व्यक्तीशीदेखील लावले जाते. सुरुवातीच्या काळात या प्रथेनुसार केवळ मृतदेहांचे लग्न केले जायचे, परंतु आता या प्रथेतदेखील अनेक बदल झाल्याचे दिसून आले आहे. अलीकडच्या काही प्रकरणांमध्ये जिवंत व्यक्तींनी मृत व्यक्तींशी लग्न केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
दोन मृत व्यक्तींच्या होणाऱ्या या लग्नात, वधूच्या कुटुंबाकडून हुंडादेखील दिला जातो. यामध्ये सामान्यतः दागिन्यांच्या कागदी प्रतिकृती, घर यांसारख्या प्रतीकात्मक वस्तू तयार केल्या जातात आणि मृतदेहांसमोर ठेवल्या जातात. हे लग्न एखाद्या सामान्य लग्नाप्रमाणेच केले जाते. मृतांचे वय आणि त्यांची कौटुंबिक परिस्थितीदेखील लग्नासाठी महत्त्वाची असते. लग्नात विविध खाद्य पदार्थ ठेवले जातात. तसेच वधू आणि वराच्या नावाचे फलकही लावले जातात. या प्रथेतील एक प्रमुख बाब म्हणजे वधूची कबर खोदून त्यातील हाडे बाहेर काढली जातात आणि त्यानंतर वराच्या कबरीत पुरली जातात.
‘घोस्ट मॅरेज’ करण्यामागील कारणे काय?
ही प्रथा चीनमधील उशांक्सी, शेडोंग आणि हेबेईमध्ये अतिशय सामान्य आहे. या भागात ‘घोस्ट मॅरेज’ दोन पद्धतीने केली जातात. एका प्रकारामध्ये लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर लगेचच मृत्युमुखी पडलेल्या जोडप्यांची लग्न केली जातात. त्यांच्यातील प्रेमामुळे त्यांचे कुटुंब लग्न समारंभ आयोजित करतात आणि त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात दिले आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये अशा व्यक्तींचा समावेश आहे, जी आयुष्यात कधीही भेटली नाहीत किंवा एकमेकांना कुठले वचन दिले नाही. अशा प्रकरणांमध्ये लग्नासाठी वर आणि वधूची जुळवणी केली जाते, म्हणजेच त्यांचे वय आणि इतर गोष्टी बघून लग्न केले जाते.
चीनमधील जी लोकं या परंपरेचे पालन करतात त्यांचा असा विश्वास आहे की, या प्रथेमुळे अविवाहित मृतांना एकाकी मृत्यूनंतरच्या जीवनातून वाचवले जाते. मृत्यूनंतर मृतांनी आपले आयुष्य सुरू ठेवावे, अशीही यामागील काहींची धारणा आहे. चीनमधील जुन्या पिढ्यांचा असादेखील विश्वास आहे की, लग्नासारखे जीवनाचे टप्पे गाठल्याशिवाय मृत व्यक्तींना आत्मशांती मिळू शकत नाही, त्यामुळे ते पुन्हा जिवंत व्यक्तींना त्रास देऊ शकतात. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही प्रथा चीनच्या पितृसत्ताक मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यांच्यानुसार आजही कुटुंबांचा वंश पुढे नेण्यासाठी लग्न आवश्यक मानले जाते.
अशी लग्न कशी आयोजित केली जातात?
मृत व्यक्तीचे कुटुंब योग्य जोडीदार शोधण्यासाठी फेंगशुई गुरुकडे जातात. फेंगशुई गुरुच्या सहाय्याने पालक त्यांच्या मृत मुलासाठी आदर्श जोडीदार शोधतात. या दरम्यान दुसऱ्या व्यक्तीचे वय, पार्श्वभूमी, व्यवसाय याबद्दल विचारणा केली जाते, त्याचा फोटो मागवला जातो. दोन्ही कुटुंबांना मान्य असल्यानंतर लग्न समारंभ आयोजित केला जातो. या दरम्यान पुरलेले मृतदेह बाहेर काढले जातात आणि पुन्हा कबर खोदून एकत्रित पुरले जातात. काही प्रकरणांमध्ये, लग्नातील एक व्यक्ती जिवंत असते. ही लग्न पारंपरिक पद्धतीने केली जातात. या लग्नात मृत व्यक्तीचे छायाचित्र आणि त्याचे कपडे ठेवले जातात आणि बाजूला जिवंत व्यक्तीला बसवले जाते. अशी लग्न चीनमध्ये बेकायदा मानली जातात, परंतु अनेक काळाच्या प्रथेमुळे आणि एकूणच लोकांच्या श्रद्धेमुळे अशी लग्ने आजही गुप्त पद्धतीने सुरू आहेत.
‘घोस्ट मॅरेज’ इतर कोणकोणत्या ठिकाणी होतात?
‘घोस्ट मॅरेज’ उत्तर आणि मध्य चीनमध्ये, विशेषतः शांक्सी आणि हेनानसारख्या प्रांतांमध्ये नोंदवली जातात. हाँगकाँगमधील फेंग शुई मास्टर झेटो फॅट-चिंग यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितले की, काही चिनी समुदायांमध्ये ही जुनी प्रथा आजही अस्तित्वात आहे. तैवानमध्येदेखील जर एखाद्या अविवाहित महिलेचा मृत्यू झाला तर त्या महिलेचे कुटुंब रोख रक्कम, पैसे, मृत महिलेची नखं असलेली पॅकेट सार्वजनिक ठिकाणी ठेवू शकतात आणि पॅकेट उचलणारा पहिला पुरुष त्या महिलेचा वर ठरतो.
मुख्य म्हणजे वरदेखील त्यांना नकार देऊ शकत नाही, कारण मृत वधूला नकार देणे दुर्दैवी असल्याचे मानले जाते. लग्नाच्या विधी पारंपरिक असतात, तैवानमधील प्रथा चीनपेक्षा वेगळ्या आहेत. वर या लग्नानंतर जिवंत व्यक्तीशी लग्न करू शकतो, परंतु त्याने दिवंगत पत्नीला प्राथमिक जोडीदार म्हणून मान द्यावा, अशी अटदेखील ठेवली जाते. मलेशियामध्ये गेल्या वर्षी यांग जिंगशान आणि ली झुयिंग या जोडप्याचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांच्या पालकांनी ‘घोस्ट मॅरेज’चे आयोजन केले होते.