‘कोल्डप्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंद कंपूचा पुढील वर्षी जानेवारीत भारतात होणारा ‘म्युझिक ऑफ दि स्फीअर्स’ दौरा सध्या चर्चेत आला आहे, तो या दौऱ्यातील तीन कार्यक्रमांची दीड लाख तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपल्याच्या निमित्ताने. ‘कोल्डप्ले’ किंवा तत्सम कंपू वा इंग्रजी पॉप-रॉक प्रकारातील एकल गायक-गायिकांना भारतात एवढा मोठा प्रतिसाद अलीकडच्या काळात का मिळू लागला आहे, त्याचा हा उहापोह…

‘कोल्डप्ले’ काय आहे? या कंपूत कोण कोण कलाकार आहेत?

‘कोल्डप्ले’ हा ब्रिटिश वाद्यवृंद कंपू आहे. गायक आणि पियानोवादक ख्रिस मार्टिन, गिटार आणि कीबोर्डवादक जॉनी बुकलँड, बास गिटारिस्ट गाय बेरिमन, ड्रम्स आणि तालवाद्य वादक विल चॅम्पियन आणि व्यवस्थापक फिल हार्वे हे या कंपूचे प्रमुख सभासद. या कंपूच्या संगीतप्रवासाला सुरुवात झाली, १९९७ मध्ये. त्याआधी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे ख्रिस आणि जॉनी या दोघांनी १९९६ या वर्षात काही काळ एकत्र काम केले होते. पुढच्या वर्षी गाय बेरिमन त्यांच्या कंपूत सहभागी झाला. गाणी तयार करून त्याचा अखंड सराव करायचा आणि मग ती ध्वनिमुद्रित करायची, असा त्यांचा शिरस्ता. पण, या कंपूचा कायमस्वरूपी भाग होऊ शकेल, असा ड्रमर त्यांना गवसत नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या ड्रमरवर अवलंबून राहावे लागत असे. हा प्रश्न सोडवला विल चॅम्पियनने. या चौघांची योगायोगाने झालेली भेट नंतर दीर्घ काळची सोबत झाली. फिल हार्वे आधी व्यवस्थापक म्हणून, नंतर बराच काळ सर्जनात्मक दिग्दर्शक म्हणून आणि पुन्हा व्यवस्थापक म्हणून कंपूसोबत आहे.

‘कोल्डप्ले’चा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?

‘कोल्डप्ले’ची खऱ्या अर्थाने दखल घेतली जाऊ लागली, ती २००० मध्ये आलेल्या ‘पॅराशुट्स’ या त्यांच्या अल्बममुळे. याच नावाने त्यांनी काही दौरेही केले. त्यानंतरच्या काळात ए रश ऑफ ब्लड टू द हेड (२००२), एक्स अँड वाय (२००५), व्हिवा ला व्हिडा ऑर डेथ अँड ऑल हिज फ्रेंड्स (२००८), मायलो क्झायलोटो (२०११), घोस्ट स्टोरीज (२०१४), अ हेड फुल ऑफ ड्रीम्स (२०१५), एव्हरीडे लाइफ (२०१९), म्युझिक ऑफ स्फीअर्स (२०२१) आणि अलीकडे मून म्युझिक (२०२४) या अल्बम्समुळे हा कंपू अतिशय लोकप्रिय झाला. या कंपूने कार्यक्रम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचे सुरुवातीचे नाव ‘कोल्डप्ले’ नव्हते. तो ‘बिग फॅट नॉइजेस’ या नावाने कार्यक्रम करायचा. त्यानंतर त्याचे नामकरण ‘स्टारफिश’ असे झाले आणि अखेर ‘कोल्डप्ले’ हे नाव स्थिरावले.

हेही वाचा : पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?

‘कोल्डप्ले’ची लोकप्रियता कशात आहे?

सर्व पुरुष सभासद असलेला हा कंपू प्रचलित रॉक संगीताला पर्याय देऊ पाहतो. संगीतज्ज्ञांच्या मते, या कंपूने तयार केलेल्या गाण्यांत गीतलेखन तितकेसे प्रभावी नसले, तरी गीतांच्या चाली आणि त्याला वाद्यवृंदाने केलेली सजावट आकर्षक आहे. माधुर्य हा आणखी एक गुण. गीतांतून श्रोत्याला भावनाशील करण्याची ताकद त्यांच्या संगीतात आहे. त्यांचे संगीत पर्यायी किंवा अल्टरनेटिव्ह रॉक प्रकाराचे म्हणूनही ओळखले जाते. एरव्ही रॉक संगीत कंठाळी असते, ‘कोल्डप्ले’च्या गाण्यांमध्ये मात्र कर्कशता टाळण्याकडे कल असतो. असे असले, तरी रॉक संगीतातील बंडखोर वृत्ती ‘कोल्डप्ले’मध्ये दिसत नाही. आकाश, चांदण्या, देवदूत आदी स्वप्नाळू कल्पना मांडणारी त्यांची गीते असतात. ‘कोल्डप्ले’चा पहिला अल्बम २००० मध्ये आला आणि त्यानंतरचा २००२ ला. मधल्या काळात अमेरिकेत घडून गेलेल्या ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने पाश्चात्य जग हादरले होते. अशा विमनस्क मानसिकतेतील समाजाला सुखाच्या शोधाच्या प्रवासाला घेऊन जाणारी गाणी हे ‘कोल्डप्ले’चे कालसुसंगत्व आहे.

‘कोल्डप्ले’ची आणि एकूणच पाश्चात्य संगीताची भारतीयांवर भुरळ का आहे?

साधारण ९०च्या दशकानंतर आर्थिक उदारीकरणानंतर मध्यमवर्गीयांची वाढलेली क्रयशक्ती आणि त्यांना बाहेरच्या जगाची उघडलेली खिडकी त्यांच्या सांस्कृतिक जाणिवांवरही प्रभाव टाकत असल्याचे दिसते. या काळात मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात भौतिक सुखसोयींबरोबरच पाश्चात्य जगतातील सांस्कृतिक पायरवही उंचावलेले दिसतात. संगीत हे त्याचे एक मूर्त रूप. नव्वदच्या दशकाच्या मध्याला ग्रॅमी पारितोषिक वितरणाचे प्रक्षेपण दूरदर्शनवरून दाखवले गेले आणि फिल कॉलिन्सचे ‘पॅराडाइज’ गाणे भारतातील मध्यमवर्गीय संगीत चाहत्यांच्या मुखी सर्वतोपरी झाले. ‘साउंड ऑफ म्युझिक’ची भुरळ त्याआधीची असली, तरी त्याचा भारतातील चाहता श्रोता ठरावीक मर्यादेपलीकडे गेला नव्हता. ‘नथिंग’ज् गॉन्नू चेंज माय लव्ह फॉर यू’ आणि ‘पहला नशा, पहला ख़ुमार’शी थेटच साधर्म्य असल्याने ब्रायन ॲडॅम्सचे ‘एव्हरीथिंग आय डू’ आवडू लागले ते नव्वदच्या दशकात. इंग्रजी माध्यमात शिकलेला भारतातील एक बराच मोठा वर्ग शाळेतून बाहेर पडल्यानंतर नव्या शतकात या जाणिवा केवळ श्रवणापुरत्या नाही, तर मनाच्या तळापर्यंतही सांधा जोडू लागल्या. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर १९९६ चा मायकेल जॅक्सनचा मुंबईतील बहुचर्चित कार्यक्रम ते अलीकडच्या काळात जस्टीन बिबरपासून एड शिरानचे भारतात मुंबईसह इतरही ठिकाणी हाउसफुल होणारे ‘शो’ एवढा मोठा हा पैस आहे. ‘कोल्डप्ले’चे त्यात असणे त्यामुळे स्वाभाविकच.

हेही वाचा : पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘ISI’चे नवीन प्रमुख मुहम्मद असीम मलिक कोण आहेत? हे पद महत्त्वाचे का आहे?

‘कोल्डप्ले’चा भारतातील कार्यक्रम कधी आहे आणि तिकीटविक्रीची स्थिती काय आहे?

‘कोल्डप्ले’ १८ आणि १९ जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये कार्यक्रम सादर करणार, अशी घोषणा झाली होती. त्याची तिकीटविक्री २२ सप्टेंबरला सुरू झाल्यानंतर अक्षरश: अर्ध्या तासात एक लाख तिकिटे संपली. ऑनलाइन तिकीटे काढण्यासाठी अनेकांनी मोबाइल, लॅपटॉप, डेस्कटॉप सगळे सज्ज ठेवून वेळेत लॉग इन केल्यावरही, त्यांच्यापुढे काही लाख लोक ऑनलाइन रांगेत असल्याचे त्यांना दिसले. या कार्यक्रमांचे तिकीट काढण्यासाठी सुमारे एक कोटी ३० लाख लोकांनी प्रयत्न केल्याची माहिती आहे. सहा हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंतची तिकिटे उपलब्ध होती. प्रतिसाद बघून आयत्या वेळी २१ जानेवारीला आणखी एक कार्यक्रम करू, असे ‘कोल्डप्ले’ने जाहीर केले आणि त्याची ५० हजार तिकिटेही काही मिनिटांत संपली. तिकिटांसाठी जो आटापिटा झाला, त्यामुळे ‘बुक माय शो’ या ऑनलाइन तिकिटविक्री मंचाचे संकेतस्थळही काही काळ ताण येऊन बंद पडले होते.

इन्फिनिटी तिकिटे म्हणजे काय? ‘कोल्डप्ले’ आणखी एक कार्यक्रम करणार का?

जानेवारीतील कार्यक्रमांची गेल्या २२ सप्टेंबरला तिकिटे न मिळालेल्यांना नोव्हेंबरमध्ये आणखी एक संधी आहे, ती इन्फिनिटी तिकिटे मिळविण्याची. ही २००० रुपयांची तिकिटे २२ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजता ऑनलाइन उपलब्ध होतील. या तिकिटांची गंमत अशी, की ते मिळाले, तर कार्यक्रमस्थळी तुमची जागा अगदी मागेही असू शकते, किंवा नशीबवान असाल, तर पहिल्या रांगेतही जागा मिळू शकते. इन्फिनिटी तिकिटांसाठी आत्तापासूनच चाहत्यांनी फील्डिंग लावली आहे. तशातच ‘कोल्डप्ले’चे अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आणखी एक कार्यक्रम करण्याचे घाटते आहे. दरम्यान, नवी मुंबईत ‘कोल्डप्ले’च्या कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्या चाहत्यांना हॉटेल आरक्षण मिळवणे कठीण झाले आहे. १८ ते २१ जानेवारीदरम्यानच्या आरक्षणांसाठी हॉटेलांचे दर ३०० पटींनी वाढले आहेत. पण, ‘कोल्डप्ले’चे गारूड इतके मोठे आहे, की हा सर्व खर्च भागविण्यासाठी तरुणाई ‘एसआयपी’सारखे बचतीचे मार्गही अवलंबू पाहते आहे! एका बाजूला मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची चिंता भेडसावत असलेल्या भारतात ‘कोल्डप्ले’ त्यांच्या गाण्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे नक्की कोणासाठी स्वप्नाळू जग निर्माण करील, हा भाग अलाहिदा; पण त्यानिमित्ताने होणाऱ्या या वास्तवातल्या ‘सोल्डप्ले’ची दखल न घेणे म्हणजे विसंगतीतील विशाद टाळण्यासारखे होईल, इतकेच.
siddharth.kelkar@expressindia.com