Concussion Substitute: भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पुणे इथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात बदली खेळाडूच्या समावेशाने वादंग निर्माण झाला आहे. अष्टपैलू शिवम दुबेऐवजी वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या समावेशावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर नाराज झाला आहे. काय आहे काँकशन सबस्टिट्यूटचा नियम? कुठल्या परिस्थितीत बदली खेळाडू घेता येतो? इंग्लंडचा संघ नाराज का आहे? हे सगळं समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं?

भारताच्या डावादरम्यान २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेम्स ओव्हर्टनचा उसळता चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. हेल्मेटवर चेंडू आदळल्याने भारतीय संघाचा फिजिओ मैदानात आला. त्याने काँकशन टेस्ट केली. दुबेला खूप त्रास होत नव्हता आणि डावातला शेवटचा चेंडू बाकी होता. त्यामुळे फिजिओने त्याला खेळण्याची परवानगी दिली. शेवटच्या चेंडूवर दुबे धावबाद झाला. त्याने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. डाव संपल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये दुबेची पुन्हा काँकशन चाचणी घेण्यात आली. बाऊन्सरमुळे दुखापत झाल्याने दुबे उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. भारतीय संघव्यवस्थापनाने सामनाधिकाऱ्यांकडे दुबेऐवजी हर्षित राणाला खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. सामनाधिकाऱ्यांनी विनंती मान्य केली.

हर्षित राणाचं पदार्पण

अनपेक्षित परिस्थितीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळाली. आधीच्या तीन टी२० मालिकेसाठी हर्षित राणाची संघात निवड झाली होती पण अंतिम अकरात त्याला संधी मिळाली नव्हती. दुबे दुखापतग्रस्त झाल्याने राणाला संघात घेण्यात आलं. हर्षितने ४ षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स पटकावल्या. राणाने लायम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हर्टन यांना बाद करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राणाने कसोटी पदार्पण केलं होतं.

सामन्याचा निकाल?

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांची मजल मारली. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी ५३ धावांची खेळी केली. हार्दिकने ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह तडाखेबंद खेळी केली. इंग्लंडतर्फे साकीब महमूदने ३ तर जेमी ओव्हर्टनने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव १६६ धावांतच आटोपला. हॅरी ब्रूकने ५१ धावांची खेळी केली. बेन डकेटने ३९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे रवी बिश्नोई, हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ तर वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या. दुखापतग्रस्त झालेल्या दुबेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा सामना जिंकत भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

इंग्लंडचा संघ का नाराज?

शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करू शकणारा फलंदाज ही त्याची ओळख आहे. दुबेने ५३ धावांची खेळी करत फलंदाजीत योगदान दिलं. दुबे गोलंदाजी करतो पण कामचलाऊ स्वरुपाची. प्रत्येक सामन्या तो गोलंदाजी करतोच असं नाही. मुख्य गोलंदाजांना विश्रांती म्हणून त्याला गोलंदाजी दिली जाते. मात्र काही सामन्यात मध्यमगती गोलंदाज म्हणून तो चारही षटकं टाकतो. दुबेच्या जागी काँकशन सबस्टिट्यूट म्हणून संधी मिळालेला हर्षित राणा हा प्रामुख्याने वेगवान गोलंदाज आहे. तो दुबेइतका चांगला फलंदाज नाही. फलंदाजाच्या जागी गोलंदाजाला खेळण्याची परवानगी दिल्याने इंग्लंडचा संघ नाराज झाला. दुबेने फलंदाजीत त्याचं काम केलं होतं. त्याच्या जागी विशेषज्ञ गोलंदाजाला खेळण्याची संधी दिल्याने भारताला सहावा गोलंदाज मिळाला. चार षटकं टाकत हर्षितने प्रमुख गोलंदाज म्हणून चोख काम केलं. हर्षितच्या समावेशामुळे हार्दिक पंड्याने केवळ एकच षटक टाकलं. सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे भारतीय संघाला अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा फायदा झाल्याने इंग्लंडचा कर्णधार बटलरने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

काँकशन टेस्ट काय असते?

आयसीसीच्या २०२३ सुधारित नियमांनुसार चेंडू हेल्मेटवर आदळल्यास खेळाडूची काँकशन टेस्ट घेण्यात येते. त्या संघाचा फिजिओ मैदानावर येतो. खेळाडूला नीट उभं राहता येतंय ना? त्याला संतुलन राखण्यात काही अडचण नाहीये ना? चेंडूने किती मार बसला आहे? खेळाडूला दिसण्यात काही अडचण नाहीये ना? चक्कर किंवा फीट सारखं काही येत नाहीये ना? या सगळ्या चाचण्या फिजिओ मैदानात जाऊन करतो. खेळाडूची शारीरिक आणि मानसिक स्थिती नीट असेल तर त्याला पुढे खेळण्याची परवानगी देण्यात येते.

खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर काय होतं?

आयसीसीच्या १.२.७ नियमानुसार काँकशन सबस्टिट्यूटची तरतूद करण्यात आली आहे. चेंडूचा मार गंभीर असेल आणि खेळाडू खेळण्यासाठी आवश्यक शारीरिक किंवा मानसिक स्थितीत नसेल तर त्याच्याऐवजी काँकशन सबस्टिट्यूट अर्थात बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याची मुभा नियमात देण्यात आली आहे. सामनाधिकारी यासंदर्भात अंतिम निर्णय घेतात. काँकशन सबस्टिट्यूट खेळाडू घेताना संघाला अतिरिक्त फायदा मिळू नये यासाठी नियमांमध्ये लाईक अ लाईक रिप्लेसमेंट या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त खेळाडू फलंदाज असेल तर त्याच्याऐवजी संघात येणारा खेळाडू फलंदाज असायला हवा. दुखापतग्रस्त खेळाडू गोलंदाज असेल तर त्याच्याऐवजी गोलंदाजांचाच समावेश करण्यात यावा असं नियमात म्हटलं आहे. उदाहरणार्थ एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला आणि त्याऐवजी बदली खेळाडू म्हणून गोलंदाजाला समाविष्ट करण्यात आलं तर त्या संघाला एक अतिरिक्त गोलंदाज उपलब्ध होतो. यामुळे त्या संघाला आपसूकच फायदा होतो. असं होऊ नये यासाठी लाईक अ लाईक रिप्सेलमेंटची तरतूद करण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी सारासार विचार करुन संघाला काँकशन सबस्टिट्यूटसाठी परवानगी द्यावी असं नियमात म्हटलं आहे.

काँकशन सबस्टिट्यूटची परवानगी कशी मिळते?

वैद्यकीय चमूने खेळाडू खेळण्यासाठी फिट नसल्याचे चाचणीनंतर स्पष्ट केल्यानंतर संघ सामनाधिकाऱ्यांकडे बदली खेळाडूसाठी विनंती करतो. यामध्ये खेळाडूला झालेली दुखापत, त्याचे स्वरुप हे नमूद केलेलं असतं. लाईक अ लाईक रिप्लेसमेंट तत्व लक्षात घेऊन सामनाधिकारी संबंधित संघाला परवानगी देतात. लाईक अ लाईक रिप्लेसमेंट उपलब्ध नसेल तर काही अटी घालून बदली खेळाडूला परवानगी देण्यात येते. उदाहरणार्थ बांगलादेशने काही दिवसांपूर्वी लिट्टन दासऐवजी मेहदी हसन मिराझला संघात समाविष्ट केलं. लिट्टन हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. मेहदी अष्टपैलू खेळाडू आहे. हे लक्षात घेऊन सामनाधिकाऱ्यांनी मेहदीच्या समावेशाला परवानगी दिली मात्र त्याला गोलंदाजी करता येणार नाही हे स्पष्ट केलं.

काँकशनचा नियम का लागू करण्यात आला?

ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलीप ह्यूजचा उसळता चेंडू लागून मृत्यू झाला होता. यानंतर आयसीसीने उसळत्या चेंडू लागून दुखापतींचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला. फलंदाजांच्या हेल्मेटला अतिरिक्त ग्रिल बसवण्यात आलं. चेंडू लागून खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास संघाचं नुकसान होतं. त्यांना १० खेळाडूंनिशीच खेळावं लागतं. असं होऊ नये यासाठी काँकशन सबस्टिट्यूटची तरतूद नियमात करण्यात आली. पण या नियमाचा संघांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी नियमात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. चेंडू हेल्मेटला किंवा डोकं-मान या संवेदनशील भागाला लागून खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच बदली खेळाडूची परवानगी देण्यात येते.