सध्या महाराष्ट्रासह गुजरात, नवी दिल्ली, चंदिगड अशा भागांत अनेकांच्या डोळ्यांना त्रास जाणवत आहे. अनेकांना डोळ्यांना पाणी येणे, जळजळ होणे, दिसण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवत आहेत. सध्या देशात ‘कंजक्टिव्हायटीस’ या डोळ्यांच्या आजाराचा प्रसार वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हा आजार का आणि कसा होतो? त्याची लक्षणं काय आहेत? डोळ्यांना त्रास झाल्यास काय काळजी घ्यावी? यावर नजर टाकू या….
अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नये
कंजक्टिव्हायटीस या आजाराला ‘पिंक आय’ असेदेखील म्हटले जाते. या आजारात सामान्यत: डोळे लाल होतात. डोळ्यांत जळजळ होते, डोळे दुखायला लागतात, डोळ्यांतून पाणी यायला लागते. हा आजार जिवाणू, विषाणू किंवा अॅलर्जीमुळे होऊ शकतो. काही वेळा हा आजार अती संसर्गजन्यदेखील ठरू शकतो. कंजक्टिव्हायटीस या आजारापासून स्वत:चे तसेच इतरांचे संरक्षण करण्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नये. टॉवेल्स, कॉन्टॅक्ट लेन्सेस, डोळ्यांच्या मेकअपसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू एकमेकांना शेअर करू नये.
कंजक्टिव्हायटीस आजार काय आहे?
अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनने (AOA) कंजक्टिव्हायटीस आजाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या आजाराला ‘पिंक आय’ म्हणून संबोधले जाते. या आजारात कंजेक्टिव्हाला (बुबळांना स्पर्श करणारा पापण्यांच्या आतील पातळ थर) सूज येते किंवा जळजळ होते.
कंजक्टिव्हायटीस आजार का होतो?
कंजक्टिव्हायटीस आजार होण्याची मुख्यत्वे तीन कारणे आहेत. हा आजार अॅलर्जीमुळे होऊ शकतो. वातावरणात असणाऱ्या परागकणांमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. किंवा बाहेरच्या वातावरणातील एखाद्या पदार्थाचा, वस्तूचा कण डोळ्यांत दीर्घ काळासाठी राहिल्यास कंजक्टिव्हायटीस आजार होण्याची शक्यता असते. जिवाणू किंवा विषाणूंमुळे झालेला कंजक्टिव्हायटीस संसर्गजन्य असतो. अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनच्या म्हणण्यानुसार स्वत:च्याच त्वचेत किंवा श्वसनसंस्थेत असलेल्या स्टेफिलोकोकल किंवा स्ट्रेप्टोकोकल जिवाणूंमुळे कंजक्टिव्हायटीस आजार होऊ शकतो. तर विषाणूंमुळे होणारा कंजक्टिव्हायटीस सर्दीशी निगडित असलेल्या संसर्गजन्य विषाणूमुळे होतो. खोकला किंवा शिंक देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार होऊ शकतो. रासायनिक कंजक्टिव्हायटीस (केमिकल कंजक्टिव्हायटीस) हा आजार हवा प्रदूषण, जलतरण तलावात असलेल्या क्लोरीन किंवा हानीकारक रासायनिक घटकांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो.
बुहतांस रुग्णांना विषाणूंमुळे कंजक्टिव्हायटीज
या वर्षी दिल्लीमध्ये कंजक्टिव्हायटीस आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याबाबत डॉ. राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑप्थॅलमिक सायन्सेस, दिल्लीचे एम्सचे प्रमुख डॉ. जे.एस. तितियाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “साधरण प्रत्येक दोन वर्षानंतर केराटोकंजक्टिव्हायटीस (या आजारात कन्जेक्टिव्हा आणि कोर्निया (बुबुळ) सुज येणे) या आजाराची साथ येते. सध्या आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण हे विषाणूचा संसर्ग झालेलेच आहेत. तुरळक रुग्णांना स्टेफिलोकोकस यासाख्या जिवाणूचा संसर्ग आहे,” असे डॉ. तितियाल यांनी सांगितले.
कंजक्टिव्हायटीस आजाराची लक्षणं काय?
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार कंजक्टिव्हायटीस आजारात डोळे गुलाबी किंवा लाल होतात. कंजेक्टिव्हा किंवा पापण्यांना सूज येते. डोळ्यांना पाणी येण्याचे प्रमाण वाढते. डोळ्यांत काहीतरी असल्यासारखा भास होतो. डोळे सतत चोळावेसे वाटतात. विशेषत: सकाळी सकाळी पापण्या चोळाव्याशा वाटतात. विषाणूजन्य कंजक्टिव्हायटीस आजारामुळे डोळ्यांतून पाणी येते. तर जिवाणूमुळे झालेल्या कंजक्टिव्हायटीसमध्ये डोळ्यांतून येणारा श्राव हा पू प्रमाणे गडद असतो. कंजक्टिव्हायटीस आजारा झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी अगोदर लक्षणांचा अभ्यास केला जातो. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, असे डॉक्टर्स सांगतात.