‘कॉक्स ॲण्ड किंग्स’ भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले कंपनीचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांच्याकडे मोबाइल आणि टॅब सापडल्याने गोंधळ उडाला. बॉम्बे रुग्णालयात साडेचार महिन्यांपासून दाखल असलेल्या एका आरोपीकडे ही संभाषणाची साधने सापडल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने हा भ्रष्टाचार काय आहे, केरकर यांनी बँकांना ३,७०० रुपयांचा गंडा कसा घातला, याचा हा आढावा…
केरकर यांच्याकडे मोबाइल, टॅब कसे सापडले?
‘कॉक्स ॲण्ड किंग्ज’चे प्रवर्तक असलेले केरकर २०२० पासून आर्थर रोड तुरुंगात आहेत. मात्र प्रकृती खालावल्याने न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर स्थानिक शस्त्रागार विभागाच्या पोलिसांना २४ तास पहारा होता. आर्थर रोड तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली असता त्यांच्याकडे मोबाइल, टॅब व चार्जर सापडले. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरकर यांना विविध आजार असून ते साडेचार महिन्यांपासून रुग्णालयात आहेत. आता ते मोबाइल किती दिवसांपासून वापरत आहेत, या काळात त्यांनी कुणाशी आणि काय संभाषण केले, त्याचा गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होऊ शकेल का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
केरकर यांच्याविरोधात कोणता गुन्हा दाखल आहे?
अजय अजित पीटर केरकर यांच्यावर मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अनेक गुन्हे दाखल आहेत. केरकरांशी संबंधित किमान १० प्रकरणांचा ईडी तपास करीत आहे. बँकांकडून कर्ज घेऊन त्या रकमेचा अपहार केल्याचे हे गुन्हे आहेत. मे. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि, एम. एस. फायनान्स कर्ल ऑन इंटरप्रायजेस लि., येस बँक, लक्ष्मी विलास बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक व इंडसइंड बँकेसह काही खासगी गुंतवणूकदार कंपन्यांनी केरकर व त्यांच्या कंपनीविरोधात तक्रारी केल्या आहेत. कॉक्स ॲण्ड किंग्सचे पीटर केरकर यांनी केलेल्या तक्रारीवरूनही आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत.
प्रकरणातील अन्य आरोपी कोण?
या प्रकरणी करण्यात आलेल्या न्यायवैद्यक लेखापरीक्षणानुसार फसवणुकीची रक्कम साडेतीन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. या प्रकरणी प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांच्यासह सीएफओ अनिल खंडेलवाल व लेखापरीक्षक नरेश जैन यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी ताळेबंदामध्ये खोटे व्यवहार दाखवून कंपनीची आर्थिक स्थिती खूप चांगली असल्याचे भासविले व त्याआधारे अनेक वित्त संस्थांकडून कर्जे मिळविली व या पैशांचा वापर कंपनीसाठी न करता अन्यत्र अपहार केला गेल्याचा आरोप या तिघांवर आहे.
तपासाची सद्य:स्थिती काय?
विविध वित्त कंपन्या, बँका आणि खासगी गुंतवणूकदार कंपन्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले. त्या गुन्ह्यांच्या आधारे पुढे ईडीनेही गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. फसवणूक झालेल्या बँका व खासगी कंपन्या अशा एकूण २३ संस्थांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. या समितीने ‘प्राईज वॉटरहाउस प्रा.लि.’ या कंपनीमार्फत न्यायवैद्यक लेखापाल परीक्षण करून घेतले आहे. याच्या अहवालानुसार आरोपींनी बनावट कागदपत्रे सादर करून, कंपनीचा व्यवसाय, आर्थिक स्थिती व व्यवहारांची चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या कर्जांची परतफेडही करण्यात आलेली नाही.