– निशांत सरवणकर
उत्तर प्रदेशचा एकेकाळचा कुख्यात गुंड, माजी खासदार आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची हत्या तीन हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने केली तो देखावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकापुढे पोलिसांनी निर्माण करून दाखविला. फक्त खुनाच्याच नव्हे तर अपहरण वा इतर फौजदारी गुन्ह्यात घडलेल्या गुन्ह्याचा देखावा निर्माण केला जातो. असे का केले जाते, याला कायदेशीर आधार आहे का, याचा हा आढावा.
प्रकरण काय?
एकेकाळचा कट्टर गुंड आणि माजी खासदार आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांना प्रयागराज (अलाहाबाद) येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पत्रकार बनून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी पोलिसांदेखत गोळ्या घातल्या. तिघा हल्लेखोरांना घटनास्थळी लगेचच अटक करण्यात आली. याबाबत उलटसुलट तर्कवितर्क केले जात असले तरी या प्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले असून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. हल्लेखोरांचे कृत्य ध्वनिचित्रफीतीत कैद झाले आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या पथकापुढे पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घडलेल्या गुन्ह्याचा पुन्हा देखावा निर्माण केला.
गुन्ह्याचा देखावा म्हणजे काय?
आतिक व अश्रफ यांच्या हत्येचा देखावा पुन्हा निर्माण करण्यात आला. या दोघांप्रमाणे डोक्यावर फेटे परिधान केलेले दोन इसम पोलिसांच्या गाडीतून उतरले. पोलीस बंदोबस्तात त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात नेले जात होते. इस्पितळाच्या आवारात त्यांना पत्रकारांनी घेरले. पत्रकारांशी बोलत असताना त्यापैकी पत्रकार बनलेल्या हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. पोलिसांनी झडप घालून तिघा हल्लेखोरांना पकडले. हा देखावा विशेष तपास पथकापुढे निर्माण करण्यात आला. त्यावेळी न्यायवैद्यक अधिकारी तसचे सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. या देखाव्याचे या पथकाने बारकाईने निरीक्षण केले. घटनेच्या दिवशी काढलेल्या ध्वनिचित्रफीतीशी हा देखावा मिळताजुळता आहे का याची चाचपणी करण्यात आली. काही त्रुटी आढळल्यानंतरही त्या दुरुस्त करण्यात आल्या. यावेळी देखाव्याची ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली तसेच छायाचित्रेही काढण्यात आली. प्रत्यक्ष हत्या झाली त्यादिवशी हजर असलेले सर्व पोलीस यावेळी हजर होते.
असे का करतात?
गंभीर गुन्ह्याचा देखावा प्रामुख्याने देखावा निर्माण केला जातो. याचा मुख्य हेतू तपासात कुठलीही त्रुटी राहू नये हा असते. संपूर्ण घटनाक्रम मिळताजुळता असावा यासाठी ही खबरदारी घेतली जाते. गुन्ह्याचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या फौजदारी प्रक्रिया संहितेत याबाबत काहीही उल्लेख नाही. मात्र मुंबईचा विचार केला गेला तर मुंबई पोलीस मॅन्युअल १९५८मध्ये याचा उल्लेख आहे. असेच प्रत्येक राज्याच्या पोलिसांचे स्वतंत्र मॅन्युअल असते. नागालँड, सिक्कीम या राज्यांत स्वतंत्र पोलीस मॅन्युअल नाही. शेजारील राज्यांच्या पोलिसांचे मॅन्युअल ते वापरतात. ८० टक्के राज्यांचे स्वतंत्र मॅन्युअल आहे. मॅन्युअल स्वतंत्र असले तरी गुन्ह्याचा तपास करताना काय काळजी घ्यावी, याचा उल्लेख त्यात आढळतो. देशभरात एकच पोलीस मॅन्युअल असावे या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाने पोलीस मॅन्युअल तयार केले आहे. त्यात कुठल्याही परिस्थितीत आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी तपासाच्या सर्व दिशा स्पष्ट व्हाव्यात यासाठी गुन्ह्याचा देखावा निर्माण करणे आवश्यक मानले आहे.
कायदेशीर आधार काय?
गुन्ह्याचा देखावा निर्माण करणे याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. मात्र पोलीस मॅन्युअलमध्ये खून, अपहरण, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यांत तपासाचा कुठलाही मुद्दा दुर्लक्षित राहू नये यासाठी तपास कसा करावा याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. अनेक मुद्द्यांचा त्यात ऊहापोह आहे. गुन्ह्याचा कृत्रिम देखावा निर्माण करण्याचेही त्यात सुचविले आहे. आतिक व अश्रफ हत्याप्रकरणात ध्वनिचित्रफीतच उपलब्ध असल्यामुळे गुन्ह्याचा देखावा निर्माण करण्याची तशी गरज नाही. परंतु तरीही हा देखावा निर्माण करण्यामागे भक्कम खटला न्यायालयात दाखल करणे हा त्यामागे हेतू असू शकतो. गुन्ह्याचा कृत्रिम देखावा सादर करताना प्रत्यक्षात घटना कशी घडली असेल हे दाखवताना घटनास्थळी सापडलेले पुरावे, साक्षीदार, आरोपी व गुन्हा घडला त्या ठिकाणपासूनचे अंतर आदी बऱ्याच बाबींची नोंद केली जाते. न्यायवैद्यकांचीही मदत घेतली जाते. घटनास्थळ व गुन्ह्याच्या अनुषंगाने आराखडाही रेखाटला जातो. खटल्यांच्या वेळी तो गुन्ह्याचे गांभीर्य उघड करण्यासाठी उपयोगी पडतो.
न्यायालयात उपयोगी ठरतो?
गुन्ह्याचा देखावा न्यायालयात संबंधित खटला उभा करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याअनुषंगाने साक्षीदार व इतर पुरावे तपासले जातात. तांत्रिकदृष्ट्या काही चूक मिळाली तरी त्याचा आरोपीला फायदा होऊ शकतो. अशा वेळी आरोपपत्र दाखल करण्याआधी तपास पूर्ण झाला आहे का, यासाठीही गुन्ह्याच्या देखाव्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याची भिस्त असते. न्यायालयाच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याचा देखावा महत्त्वाचा नसला तरी काही वेळा न्यायालयही आपल्या समाधानासाठी काही प्रश्न निर्माण करू शकते. अशा वेळी या देखाव्याचा फायदा होतो, असे गुन्हे अन्वेषणातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
याचा फायदा होतो का?
गुन्हे अन्वेषण करणारे अनेक जुनेजाणते अधिकारी महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्यांत देखावा निर्माण करण्याची पद्धत वापरतात. त्यावरून त्यांना तपासाची दिशा योग्य आहे का याची कल्पना येते. गुन्हे अन्वेषणात वाकबगार निवृत्त सहायक आयुक्त प्रफुल्ल भोसले, मिलिंद खेतले यांच्या मते, गुन्ह्याचा देखावा निर्माण करण्याची पद्धत खूपच फायदेशीर आहे. बऱ्याच वेळा आरोपपत्र दाखल करणाच्या आधीही गुन्ह्याचा देखावा निर्माण करून झालेला तपास योग्य दिशेने आहे का याची खात्री केली जाते. न्यायालयात आरोपीला शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी याचा निश्चितच फायदा होतो. आतिक प्रकरणात ध्वनिचित्रफीत असली तरी गुन्ह्याचा देखावा निर्माण करून खटला अधिक मजबूत करण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न दिसतो, असे त्यांना वाटते.
nishant.sarvankar@expressindia.com