बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान कालपासून पुन्हा चर्चेत आला. शारजाह इथला एक कार्यक्रम आटोपून येत असताना मुंबई विमानतळावर शाहरुखला कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं आणि त्याच्याकडून काही वस्तू ड्यूटी न भरता घेऊन जात असल्याने चांगलाच दंड वसूल केला. या गोष्टीची काल चांगलीच चर्चा झाली. आज शाहरुखच्या टीमने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. शाहरुख आणि त्याच्या टीमने कोणताही कर चुकवला नसून उलट त्यांनी रीतसर कस्टम ड्यूटी भरल्याचं वृत्त समोर आलं. ही ‘कस्टम ड्यूटी’ हा प्रकार नेमका आहे तरी काय? लोक हा कर का चुकवतात? हा कर का लावला जातो? याविषयी आज आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.
१९६२ पासून भारतात ‘कस्टम कायदा’ लागू झाला. या कायद्याअंतर्गत देशातील आयात आणि निर्यात या दोन्हीवर विशेष कर लादला जाऊ लागला. कालांतराने यात वेगवेगळे बदल होत गेले. अर्थात कायदा म्हंटलं की त्यात पळवाटाही येतात. या कायद्यामुळे तस्करीसारख्या गोष्टी वाढू लागल्या. अगदी बच्चनच्या ‘दीवार’पासून अजय देवगणच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ पर्यंत कित्येक चित्रपटातून आपण ही गोष्ट अनुभवली आहे. बाहेरील देशातील वस्तू आणि त्यावर लागणारा कर वाचवण्यासाठी तस्करी केली जाऊ लागली. २०१६ साली जेव्हा ‘जीएसटी’ (गुड्स अँड सर्विस टॅक्स) लागू झाला तेव्हा ‘कस्टम’चं नामकरण झालं आणि त्याऐवजी ‘आयजीएसटी’ (इंटीग्रेटेड गुड्स अँड सर्विस टॅक्स) हा नवा कर लागू झाला. किरकोळ तरतुदी सोडल्या तर दोन्हीमध्ये नाव सोडल्यास बाकी काहीच फरक नाही.
आणखी वाचा : शाहरुख खानने मुंबई विमानतळावर भरला रितसर कर, कस्टम ड्यूटी प्रकरणात वेगळ्याच गोष्टीचा खुलासा
देशात आयात होणाऱ्या गोष्टींवर किंवा सर्विसेसवर किती आयात शुल्क म्हणजेच (इम्पोर्ट ड्यूटी) लावायची आणि देशातून निर्यात होणाऱ्या गोष्टींवर किंवा सर्विसेसवर किती निर्यात शुल्क (एक्सपोर्ट ड्यूटी) लावायचं हे सर्वस्वी केंद्र सरकार ठरवतं. हे आयात आणि निर्यात शुल्क प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात. हा कर लावण्याचे प्रमुख ३ फायदे आहेत. पहिला म्हणजे यामुळे तुमच्या देशाची आर्थिक सक्षमता, रोजगाराचा अंदाज येतो. दूसरा फायदा म्हणजे देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर सरकारची नजर राहते आणि तिसरा फायदा म्हणजे प्रतिबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यास याची मदत होते.
बेसिक कस्टम ड्युटी, अतिरिक्त कस्टम ड्यूटी, सुरक्षात्मक ड्युटी, काउंटरवेलिंग ड्युटी, अँटिडंपिंग ड्युटी, कस्टम ड्युटीवरील सेस अशाप्रकारात या कस्टम ड्यूटीचं वर्गीकरण केलं जातं. ज्या ज्या गोष्टींची आयात आणि निर्यात केली जाते त्यासाठी विशिष्ट कस्टम ड्यूटी भरावीच लागते किंवा ‘आयजीएसटी’नुसार एखाद्या वस्तूवर किती ड्यूटी लागेल ती काढून तेवढी रक्कम भरावीच लागते. ही ड्यूटी भरली गेली नाही तर तुमच्या वस्तू, गोष्टी जप्त केल्या जातात आणि त्यासाठीदेखील तुमच्यावर वेगळा दंड लावला जातो. छोटयातील छोटी आणि मोठयातील मोठी कोणतीही वस्तू तुम्हाला आयात किंवा निर्यात करायची असेल तर या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागतं. हे न करता ड्यूटी वाचवून एखादी गोष्ट तुम्ही नेत असताना पकडले गेलात तर तुमच्यावर कडक कारवाईदेखील होऊ शकते.
आणखी वाचा : समांथाचा ‘यशोदा’ अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’वर पडला भारी; बॉक्स ऑफिसवर करतोय जबरदस्त कमाई
सध्याच्या नवीन तरतुदींप्रमाणे हा कर तुम्ही ऑनलाइनदेखील भरू शकता. विमानतळ, जहाज, अशा ठिकाणी तुम्ही ने आण करत असलेल्या गोष्टींची तपासणी होते आणि त्यांचे कागदपत्र योग्य असले तरच तुम्हाला त्या गोष्टी देशात आणता येतात किंवा दुसऱ्या देशात पाठवता येतात. अर्थात कायदा म्हंटलं की त्यात पळवाट ही आलीच. त्यामुळे ही काही परिपूर्ण योजना नाही, पण एकूणच देशाची आर्थिक सक्षमता आणि देशाची ताकद नेमकी किती यांचा अंदाज घेण्यासाठी बनवलेली ही यंत्रणा आहे. कोणतीही यंत्रणा १००% अचूक काम करत नाही, त्यामुळे कस्टम ड्यूटीमुळे सगळ्याच अवैध गोष्टींना आळा बसलाय असं आपण म्हणून शकत नाही, पण या सगळ्या गोष्टींवर ‘कस्टम’च्या रूपात एक अंकुश आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.