बिश्नोई टोळीचा प्रमुख असलेला लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती मध्यवर्ती कारागृत कैद आहे. असे असले तरी तो कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. बाबा सिद्दीकींची हत्या ते अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, अशा अनेक कारनाम्यांमुळे तो चर्चेत आला आहे. अलीकडेच तो वापरत असलेल्या ‘डब्बा कॉलिंग नेटवर्क’ची चर्चा सुरू आहे. राजस्थान पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ‘डब्बा कॉलिंग नेटवर्क’ अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांसाठी कम्युनिकेशन कंट्रोल रूम (सीसीआर) चालवणाऱ्या आदित्य जैनला दुबईत अटक करण्यात आली आहे.
“रोहित गोदरा किंवा लॉरेन्स बिश्नोईसारखे गुंड आजकाल त्यांच्या लक्ष्यांना थेट फोन करत नाहीत, तर ते लक्ष्यांना फोन करण्यासाठी डब्बा कॉलिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संप्रेषण पद्धतीचा वापर करतात. जैन हा दुबईतून चालवल्या जाणाऱ्या रॅकेटचाच प्रमुख होता,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काय आहे ‘डब्बा कॉलिंग नेटवर्क’? कुख्यात गुंडांद्वारे त्याचा वापर कसा केला जायचा? लॉरेन्स बिश्नोईने या नेटवर्कचा वापर कसा केला? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
‘डब्बा कॉलिंग नेटवर्क’ काय आहे?
डब्बा कॉलिंग ही संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे, ज्याचा वापर गुंडांद्वारे केला जातो. याचा वापर तुरुंगात असलेला गुंड बिश्नोई आणि त्याचे साथीदार बाहेर गुन्हेगारी कारवायांच्या योजना आखण्यासाठी म्हणून एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी करत होते. डब्बा कॉलिंगमध्ये दोन प्रक्रियांचा समावेश असतो, त्यानुसार टोळीतील गुंड सर्वात आधी इंटरनेटवर आधारित कॉल सुरू करतात आणि त्यानंतर मोबाईल फोनद्वारे दुसरा कॉल करतात.
दोन्ही कॉल स्पीकर मोडवर केले जातात; ज्यामुळे गुंडाचे ठिकाण किंवा ओळख उघड होत नाही. पोलिसांद्वारे केली जाणारी ट्रॅकिंग टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या कॉलच्या माध्यमातून हे गँगस्टर खंडणीच्या धमक्या देतात, एखाद्याच्या हत्येची योजना आखतात आणि टोळीच्या कारवाया व्यवस्थापित करतात. याच पद्धतीमुळे बिश्नोईला तुरुंगातूनही टोळीच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत होती.
डब्बा कॉलिंग म्हणजेच लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळ्या आधी त्यांचे लक्ष्य निवडतात. त्यानंतर टोळीतील कोणताही सक्रिय सदस्य त्याच्या लक्ष्यावर इंटरनेट कॉलिंग करतो. हे कॉल्स खंडणीसाठी असतात. या प्रक्रियेत फोन एकमेकांजवळ ठेवले जातात. दोन्ही फोनचे स्पीकर चालू असतात आणि अशा पद्धतीने ते लोकांची फसवणूक करतात. गुंडांचा नंबर दिसणार नाही याची कॉलसेंटर खात्री करते. आदित्य जैन हा बिश्नोई-गोदरा टोळीसाठी दुबईमध्ये असेच एक कॉल नियंत्रित करणारे केंद्र चालवत होता.
दुबईतील हे केंद्र भारत, कॅनडा आणि अरब अमिरातीमधील टोळीच्या प्रमुखांमधील कॉलसाठीचे एक केंद्र ठरत असल्याचे दिसून येते. भारतातील या स्वरूपाची ही पहिलीच अटक असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नेटवर्कमधील दोघांना इटलीमध्ये आधीच अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.
बिश्नोई गँगने डब्बा कॉलिंगचा वापर कसा केला?
डब्बा कॉलिंग हे लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारी नेटवर्कसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. या नेटवर्कद्वारेच ते खंडणी, तस्करी आणि हत्यांच्या योजना आखत होते. मुख्य म्हणजे, सध्या गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून हाय-प्रोफाइल गुन्ह्यांचे निर्देश देण्यासाठी या पद्धतीचा वापर केला आहे. त्याने गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खानला धमकी, यांसारखे अनेक कटकारस्थान या नेटवर्कच्या माध्यमातून केले आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शूटरना निर्देश देण्यासाठी, पैशांचे लाँडरिंग करण्यासाठी आणि अभिनेता सलमान खानसारख्या हाय-प्रोफाइल लक्ष्यांना धमकावण्यासाठी डब्बा कॉलिंग नेटवर्कचा वापर केला.
आदित्य जैनला अटक कशी करण्यात आली?
रेड नोटीस आणि इंटरपोलच्या मदतीने, संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिस अधिकाऱ्यांनी आदित्य जैनला अटक केली. राजस्थानच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) ने दुबईमध्ये आदित्य जैनला अटक केली. त्यानंतर इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणण्यात आले. आतापर्यंत या नेटवर्कशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये कम्युनिकेशन कंट्रोल रूम चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये विक्रम ब्रारचा समावेश होता. विक्रम ब्रार हा बिश्नोई, कॅनडास्थित गोल्डी ब्रार आणि इतर टोळी सदस्यांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी ही नेटवर्क सुविधा प्रदान करत होता. मुख्य म्हणजे विक्रम ब्रार सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीमध्ये व खंडणीतदेखील सहभागी होता. जुलै २०२३ मध्ये त्याला संयुक्त अरब अमिरातीहून भारतात हद्दपार करण्यात आले आणि राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला अटक केली.
दुबईमध्ये याच नेटवर्कचा भाग होता मास्टरमाइंड आशीष. त्याने दुबईहून बॉक्सर अभिनव वर्मासारख्या शार्पशूटर्सना दिल्लीत हत्या आणि खंडणी करण्याचे निर्देश या नेटवर्कच्या मदतीने दिले होते. व्यावसायिकांच्या हत्येत, त्यांना लक्ष्य करण्यात आणि धमकावण्यात त्याचा सहभाग राहिला आहे. तसेच तो तुरुंगात असलेल्या हाशिम बाबासारख्या गुंडांशी समन्वय साधण्यातही पुढे होता.