अनेकदा इंटरनेट युजर्सला आपल्या मेल बॉक्समध्ये नकोशा मेलचा पाऊस झालेला दिसतो आणि त्यामुळे दैनंदिन कामाचे महत्त्वाचे मेलही या गर्दीत हरवून जातात. याशिवाय इंटरनेटवर वावरत असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्यांना फॉलो केलेलं नाही त्यांच्याही पोस्ट दिसतात. इतकंच नाही तर काही ठिकाणी सबस्क्राईब करणं जितकं सोपं असतं, तितकंच त्याला अनसबस्क्राईब करण्याची प्रक्रिया अवघड असते. असं का होतं? असा प्रश्न तुमच्याही मनात कधी पडलाय का? याचं उत्तर हो असेल तर असं का होतं, इंटरनेटवरील डार्क पॅटर्न काय आहे? जगभरात याच्या कोणत्या मोठ्या घटना चर्चेत राहिल्यात आणि इंटरनेट युजर म्हणून याचा तुमच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हे विश्लेषण जरूर वाचा…
इंटरनेटवरील अनेक कंपन्या (फर्म) युजर्सला आपल्याकडे खेचण्यासाठी वेबसाईटची डिझाईन अशी करतात की, युजर्सने त्यांना अपेक्षित लिंकवर क्लिक करावं किंवा अपेक्षित असाच मजकूर पाहावा. यासाठी संबंधित संकेतस्थळावरील युजर्सचा अनुभव इतका किचकट केला जातो की त्यातून वेगवेगळ्या लिंकवर क्लिक केलं जातं आणि या मोठ्या कंपन्यांना अपेक्षित परिणाम मिळतो. यानंतर लिंक्सवर क्लिक करणाऱ्या युजर्सचा मेल बॉक्स अनेक अनपेक्षित मेलने भरून जातो आणि त्या मेलला अनसब्सक्राईब करणंही अवघड होतं. हा अनुभव म्हणजे इंटरनेटवरील डार्क पॅटर्न आहे. याला डिसेप्टिव्ह पॅटर्न म्हणूनही ओळखलं जातं.
डार्क पॅटर्नचे प्रकार कोणते?
डार्क पॅटर्नचे हे प्रकार अनेकदा हेतूपूर्वक इंटरनेट युजर्सला गोंधळात टाकतात. त्यामुळे इंटरनेट युजर्सला अपेक्षित गोष्टी पाहण्यासाठी अडथळे येतात. इतकंच नाही तर अनेकदा यातून फसवणूकही होते. या डार्क पॅटर्न ज्या कंपनीसाठी विकसित केला जातो त्या कंपनीचा फायदा व्हावा हाच त्यामागील हेतू असतो.
इंटरनेटवर युजर्स जो प्लॅटफॉर्म वापरतात त्याविषयी त्यांना पूर्ण माहिती असण्याचा अधिकार आहे. विशेष म्हणजे ही सर्व माहिती सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने युजर्सला समजणे अपेक्षित असते. मात्र, डार्क पॅटर्नच्या माध्यमातून हीच माहिती किचकट केली जाते. त्यामुळे ब्राऊझिंगचं युजर्सचं नियंत्रण अनेकदा मर्यादित होऊन जातं. याचं उदाहरण म्हणजे एखाद्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला अचानक अनपेक्षित जाहिरात दिसणे आणि ती जाहिरात हटवण्यासाठी पटकन दिसेल असा पर्याय न दिसणे किंवा तसा पर्यायच उपलब्ध न ठेवणे असे प्रकार तुम्ही अनुभवले असतील. हा त्याचाच प्रकार.
इंटरनेट अभ्यासकांनी अशाप्रकारचे युजर इंटरफेस आणि युजर एक्सपेरियन्सचे अनेक पॅटर्न शोधले आहेत आणि त्याचं जतन केलं आहे. यावरून अशा कंपन्या युजर्सची कशी फसवणूक करतात हे स्पष्ट होतं.
कंपन्या डार्क पॅटर्नचा वापर कसा करतात?
अॅपल, अमेझॉन, स्काईप, फेसबूक, लिंकइन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्या डार्क पॅटर्नचा वापर करताना समोर आलंय. यातून कंपन्यांच्या फायद्यासाठी युजर्सचा इंटरनेट वापर अवघड केला जातो. याबाबत अमेझॉनचं एक प्रकरण जगभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. यात युरोपमध्ये अमेझॉनने आपलं सबस्क्रिप्शन बंद करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट केली होती. यामुळे युजर्सकडून सबस्क्रिप्शन रद्द होऊ नये असा हेतू होता. मात्र, हे प्रकरण ग्राहक नियंत्रकापर्यंत पोहचलं. त्यानंतर अमेझॉनने आपलं सबस्क्रिप्शन रद्द करण्याची प्रक्रिया सोपी केली.
हेही वाचा : विश्लेषण : तुमचं ट्विटर अकाऊंट बंद होण्याचं कारण ठरू शकणारा ‘डॉक्सिंग’चा नवा नियम काय? वाचा…
मेटाने टिकटॉकशी स्पर्धा करत इंस्टाग्रामवर अनेक फीचर्स आणले. मात्र, त्यानंतर अनेक युजर्सने त्यांना नकोशा अनेक पोस्ट दिसत असल्याच्या तक्रारी केल्या. विशेष म्हणजे त्या पोस्ट दिसू नयेत म्हणून इंस्टाग्रामवर तसे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. आणखी एक डार्क पॅटर्न म्हणजे युजर्स ज्यांना फोलो करतात त्यांच्या पोस्ट आणि स्टोरीजमध्ये इतर स्पॉन्सर्ड पोस्ट्सचा भडीमार.