Death Prediction Test: जन्माची चाहूल नऊ महिन्यांआधी लागत असली तरी मृत्यूचा क्षण कधी येणार हे कोणालाच माहित नसते. म्हणूनच अनेकांना आपल्या मृत्यूच्या भविष्यवाणीविषयी कुतुहूल असते. ही उत्सुकता पाहता अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा याबाबत अभ्यास सुरु केला आहे. अनेक संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार जर कोणत्याही माणसाला त्याच्या मृत्यूच्या आधीच नेमकी तारीख कळली तर ही व्यक्ती आपल्या उर्वरित आयुष्यात जग बदलण्यासाठी महत्त्वाची कामे करू शकते. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या माध्यमातून माणसाच्या मृत्यूच्या तारखेबाबत भविष्यवाणी केली जाऊ शकते. या चाचणीला डेथ टेस्ट असे म्हंटले जाते. नेमकी ही टेस्ट काय आहे? डेथ टेस्ट कशी केली जाते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
डेथ टेस्ट म्हणजे काय?
मृत्यूची चाचणी म्हणजेच डेथ टेस्ट ही एखाद्या रक्ताच्या चाचणीप्रमाणेच केली जाते. या टेस्ट अंतर्गत माणसाच्या रक्ताचे नमुने घेऊन बायोमार्करच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. यानुसार संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा किती वर्षांनंतर होणार याची भविष्यवाणी केली जाऊ शकते. ही चाचणी एका प्रकारे अंदाजावर आधारित असल्याने यावर विविध तज्ज्ञांकडून संशोधन सुरु आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ची असणार आहे.
डेथ टेस्टवर रिसर्च कोण करत आहे?
युनाइटेड किंग्डमच्या नॉटिंघम यूनिवर्सिटी अंतर्गत डेथ टेस्टबाबत संशोधन सुरु आहे. PloS One या वैज्ञानिक जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर या संशोधनाच्या दरम्यान संशोधकांना काही ठराविक पॅटर्न दिसून आले होते, ज्यांनुसार मृत्यूची भविष्यवाणी करणे शक्य होणार असल्याचे समजत आहे. या संशोधनासाठी ४० ते ६९ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले होते. हे सहभागी स्वयंसेवक लाइफस्टाइल संबंधित आजार जसे की डायबिटीज व ब्लड प्रेशर सारख्या समस्यांनी त्रस्त होते.
यापूर्वी झाली आहे मृत्यूची भविष्यवाणी…
मृत्यूच्या भविष्यवाणीच्याबाबत यापूर्वी सुद्धा अनेक अभ्यास झाले आहेत. याआधी पेंसिल्वेनियाची हेल्थकेयर सिस्टम Geisinger ने सुद्धा एक संशोधन केले होते. यामध्ये इकोकार्डियोग्राम व्हिडीओ पाहून AI च्या मदतीने मृत्यूच्या तारखेचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यामध्ये निधनाच्या एक वर्षाआधीच मृत्यूची चाहूल लागत असल्याचे समोर आले होते. अर्थात यात केवळ नैसर्गिक मृत्यूचा अंदाज लावता येतो, अपघाती व आकस्मिक मृत्यूबाबत कुठलीही भविष्यवाणी करणे अद्याप शक्य नाही.
हे ही वाचा<< विश्लेषण: डॉक्टरनं लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन तुम्हालाही वाचता येत नाही? डॉक्टरांचं अक्षर आपल्याला का समजत नाही?
डोळ्यातून दिसतो मृत्यू
यापूर्वी झालेल्या एका संशोधनात समोर आले होते की, माणसाच्या डोळ्यातून सुद्धा त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी करता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला हृदयाच्या संबंधित आजार असतील तर AI च्या मदतीने रेटिना स्कॅन करून मृत्यूचा अंदाज वर्तवता येतो. डोळ्यांना बघून माणसाचे बायोलॉजिकल वय सुद्धा माहित करता येऊ शकते.