गेल्या काही वर्षांपासून लोक लैंगिक ओळखीविषयी मोकळेपणाने बोलू लागले आहेत, त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या नव्याने लोकांपुढे येत आहेत. लैंगिक ओळखीशी संबंधित सिम्बायोसेक्शुअल, अ‍ॅब्रोसेक्शुअल यांसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा एका नवीन लैंगिक ओळखीविषयी चर्चा होताना दिसत आहे आणि ती म्हणजे ‘डेमिसेक्शुअल.’ गायिका आणि टेलिव्हिजन अभिनेत्री तुलिसा कॉन्टोस्टावलोसने आपण ‘डेमिसेक्शुअल’असण्याबद्दल उघड केले. एका रिॲलिटी शोमध्ये तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी स्पष्ट चर्चेदरम्यान तुलिसाने सांगितले की, ती तीन वर्षांहून अधिक काळ लैंगिक क्रियाकलापांपासून दूर आहे. ३७ वर्षीय गायिकेने खुलासा केला की ती डेटिंग ॲप्स टाळत आहे आणि म्हणाली, “मी तिथे असले तरीही मी तिथल्या कोणाशीही प्रत्यक्ष डेटवर गेले नाही. मी योग्य रक्षण करते.” तर डेमिसेक्सुअल म्हणजे नेमके काय? चला जवळून बघूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुलिसा काय म्हणाली?

तुलिसा कॉन्टोस्टावलोस एक सेलिब्रिटी आहे. ती ‘गेट मी आऊट ऑफ हिअर’मध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा सेलिब्रिटींपैकी एक आहे. या स्पर्धेत स्पर्धक जंगलाच्या वातावरणात एकत्र राहतात. नातेसंबंधांबद्दल सहकारी शिबिरातील सहकाऱ्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान, तुलिसाने तिचे ब्रह्मचर्य आणि तिच्या नवीन लैंगिकतेविषयी खुलासा केला. “मला असं वाटतं की मी डेमिसेक्शुअल आहे. आपण लैंगिक संबंधांपासून दूर असल्याचेही तिने सांगितले. लंडनच्या असलेल्या तुलिसाने खुलासा केला की, ‘राया’ या खास डेटिंग ॲपवर तिचे प्रोफाइल आहे. परंतु, एखाद्याला डेट करण्याचा किंवा त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा विचार मला खरोखरच शारीरिकदृष्ट्या आजारी करणारा वाटतो, असे तिने सांगितले. माझे शरीर माझे मंदिर असल्याचेही ती पुढे म्हणाली. तिच्या लव्ह लाईफवर पुढे चर्चा करताना गायिकेने शेअर केले, “मला खरंच अविवाहित राहण्यात मजा येते आणि मला यात आनंद मिळतो,” असे ती म्हणाली.

गायिका आणि टेलिव्हिजन अभिनेत्री तुलिसा कॉन्टोस्टावलोसने आपण ‘डेमिसेक्शुअल’असण्याबद्दल उघड केले. (छायाचित्र- तुलिसा कॉन्टोस्टावलोस/ इनस्टाग्राम)

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने निराश लोकांना इटलीत केवळ ८४ रुपयांत घर; काय आहे नेमका प्रकार?

‘डेमिसेक्शुअल’ म्हणजे काय?

‘द इंडिपेंडंट’च्या मते, डेमिसेक्शुएलिटी ही एक लैंगिक प्रवृत्ती आहे, ज्यात व्यक्तींना लैंगिक आकर्षण वाटण्यासाठी मजबूत भावनिक संबंध आवश्यक असतो. मुख्यत्वे ही अलैंगिकतेच्या स्पेक्ट्रममध्ये येते, जेथे लैंगिक आकर्षण वारंवार कमी होते किंवा केवळ विशिष्ट परिस्थितींमध्ये लैंगिक आकर्षण निर्माण होते; जसे की भावनिक जवळीकता. सोप्या भाषेत याची व्याख्या करायची झाल्यास एखाद्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याच्याशी चांगलं नातं तयार होणं आणि जोवर असं नातं तयार होत नाही तोवर असेक्शुअल राहणं म्हणजेच डेमिसेक्शुएलिटी.

डेमिसेक्शुएलिटी ही एक लैंगिक प्रवृत्ती आहे. (छायाचित्र-फ्रीपीक)

अलैंगिकता आणि लैंगिक आकर्षणाविषयीचे अधिक वर्णन करण्यासाठी असेक्शुअल विझीबिलीटी अँड एज्युकेशन नेटवर्क (AVEN) द्वारे २००६ मध्ये ‘डेमिसेक्शुअल’ हा शब्द सादर केला गेला. हा शब्द शारीरिक आकर्षणाच्या ऐवजी दृढ भावनिक आकर्षणावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकतो. रिलेशनशिप आणि डेटिंग कोच केट मॅन्सफिल्ड यांनी मेट्रोला स्पष्ट केले की, डेमिसेक्शुअल लोक एखाद्या व्यक्तीबरोबर नाते तयार करायला अधिक वेळ घेतात. याचा अर्थ ही लोक शारीरिक संबंधांच्या विरोधात आहेत असे नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीत ते भावनिकरित्या गुंतत जातात, तेव्हाच ते शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तयार असतात, असे केट मॅन्सफिल्ड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

भावनिक संबंध तयार करण्यासाठी लागणारा कालावधी डेमिसेक्शुअल लोकांमध्ये लक्षणीयरीत्या बदलतो. काहींना भावनिक संबंध विकसित करण्यात थोडा कालावधी लागतो, तर काही असेही असतात, ज्यांना असे नाते विकसित करण्यात वर्षे लागू शकतात. जागतिक स्तरावर किती लोक डेमिसेक्शुअल आहेत, हे अस्पष्ट आहे. २०२१ च्या ब्रिटीश जनगणनेने नोंदवले आहे की, ब्रिटनच्या लोकसंख्येपैकी फक्त ०.०६ टक्के लोक अलैंगिक आहेत. केट मॅन्सफिल्डने यावर जोर दिला की, डेमिसेक्शुएलिटी हा मजबूत, निरोगी नातेसंबंधांचा पाया असू शकतो. “माझ्यासाठी ‘डेमिसेक्शुअल’ असणं हा एक निरोगी नातेसंबंध निर्माण करण्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्यामध्ये भावनिक आणि लैंगिक किंवा शारीरिक सुसंगततेचा चांगला समतोल आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले, “हे नक्कीच असे काहीतरी आहे, ज्याचा आपणही प्रयत्न करू शकतो आणि सर्वांनी प्रयत्न करायला हवा.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is demisexuality a lesser known sexual orientation rac