गौरव मुठे
सध्याच्या पिढीचा ऑनलाईन माध्यमातून विनासायास आणि जलद कर्ज मिळविण्यावर अधिक भर आहे. शिवाय ही वाढती गरज बघून अनेक बॅंकेतर वित्तीय कंपन्यांसह, तंत्रज्ञान आधारित वित्तीय कंपन्या म्हणजेच ‘फिनटेक’चाही या उत्पादनावर भर आहे. मोबाइल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्जाचा हा कल भविष्यात आणखी वाढणार आहे. म्हणूनच सध्या अनेकांसाठी अपरिचित असलेल्या या कायदेसंमत वित्त पर्यायाची दखल अनिवार्य ठरते…
डिजिटल कर्ज म्हणजे नेमके काय?
पारंपरिकरित्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या माध्यमातून इच्छुकांना कर्ज दिले जाते. बँकेकडून कर्जदाराची पात्रता, ओळख पटवून घेऊन, व्याजदर निश्चित करून आणि गरज पडल्यास तारणाच्या बदल्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय दुसरा मार्ग, असंघटित माध्यमातून म्हणजेच सावकारामार्फत विनातारण उच्च व्याजदर आकारून कर्ज दिले जाते. आता मात्र नव्या युगाच्या ‘फिनटेक’ कंपन्या कर्ज व्यवसायात उतरल्या आहेत. या कंपन्या मशीन लर्निंग, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि ब्लॉकचेन यांसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद प्रक्रिया आणि अधिक किफायतशीर पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देऊ लागल्या आहेत. परिणामी प्रक्रिया आणि स्वरूप दोन्ही अंगाने कर्ज योजना ‘डिजिटल’ बनली आहे.
डिजिटल कर्ज कसे उपलब्ध करून दिले जाते?
भारतात अजूनही बँक खाते नसलेल्या लोकांची संख्या मोठी असून या बाबतीत जगात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. जन-धन योजनेनंतरही भारतात सध्या १९ कोटी लोकांचे कोणत्याही बँकेत खाते नाही. म्हणूनच ‘फिनटेक’नी डिजिटल वेब प्लॅटफॉर्म (संकेतस्थळ) किंवा मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणे आणि प्रमाणीकरण व पत मूल्यांकनासाठी (क्रेडिट स्कोअर) यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यामुळे फसवणूक रोखली जाऊन योग्य त्या प्रमाणात कर्ज देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते. जेणेकरून या क्षेत्रातील बुडीत कर्जाचे प्रमाणदेखील अल्प आहे. यामध्ये पीअर टू पीअर लेंडिंग (‘पी २ पी लेंडिंग’) हा अतिशय लोकप्रिय प्रकार असून, यातून गुंतवणूक आणि कर्ज अशा दोन्ही गोष्टी शक्य असून, दोन्हीही कायदेसंमत आहेत. या माध्यमातून जास्त परतावा व तुलनेने कमी जोखीम असून अजूनही बहुतांश लोकांना हा पर्याय अपरिचित आहे.
‘पी २ पी लेंडिंग’ म्हणजे काय?
बँक, पोस्ट, पीपीएफ यासारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर, ‘थोडी जोखीम घेऊन पाहू काय हरकत आहे’ म्हणत काही गुंतवणूकदार अन्य काही अपारंपरिक पर्याय शोधत असतात. अशा वेळी शेअर बाजार /म्युचुअल फंड हे बहुश्रुत पर्याय असतातच, तथापि ज्यांना नियमित उत्पन्न पाहिजे त्यांना आणखी वेगळ्या वाटा चोखाळाव्याशा वाटतात. जास्त परतावा देणारा व तुलनेने कमी जोखीम असलेला असाच हा एक पर्याय आहे. सध्या पीअर टू पीअर (पी २ पी) लेंडिंग या नवीन गुंतवणूक पर्यायाचे दालन त्यायोगेच खुले झाले असून सुमारे २५ फिनटेक कंपन्या गेल्या पाच-सात वर्षांपासून भारतात कार्यरत आहेत
विश्लेषण : खाद्यतेल उद्योगावर सरकीच्या टंचाईचे सावट?
पी २ पी लेंडिंग हा क्लाऊड फंडिंगचा प्रकार असून यात ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खर्च वजा वरकड (सरप्लस) रक्कम आहे व जास्त परतावा मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे असा गुंतवणूकदार याकडे वळतो. हा असा गुंतवणूकदार समुदाय आणि ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती यांना समोरासमोर आणणारे हे एक सामायिक व्यासपीठ आहे.
‘पी २ पी लेंडिंग’चे कामकाज कसे चालते?
गुंतवणूकदार आपली रक्कम पी २ पी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या व्यासपीठांच्या एस्क्रो अकाऊंट (ठरावीक उद्दिष्टासाठी सुरू केलेल्या बँक खात्यावर) जमा करतो व ज्याला कर्ज हवे असते अशी व्यक्ती तिची कर्ज मागणी या व्यासपीठावर ऑनलाइन पद्धतीने नोदवते. या दोन्हीही व्यक्ती एकमेकास ओळखत असतीलच असे नाही. किंबहुना बहुतांश एकमेकास ओळखत नसतात. जसे ओला/उबर मार्फत प्रवासासाठी गाडी बुक करताना आपण मोबाइलवरील संबंधित ॲपवर गाडीसाठी नोंदणी करतो तसाच हा प्रकार आहे.
आपल्याला कोठे जायचे आहे याची नोंद केल्यानंतर ओला/उबर ॲप, आपल्याला कोणत्या प्रकारची गाडी हवी आहे त्यानुसार किती भाडे असेल हे सुचवत असते, आपण आपली गरज व परवडणारे भाडे यांचा विचार करून आपल्या सोयीनुसार गाडी निवडतो. आपण निवडलेल्या पर्यायानुसार जवळपास असणाऱ्या गाड्यांपैकी एक ड्रायव्हर आपल्याला ॲपवर होकार कळवितो व त्याच वेळी त्याला यायला किती वेळ लागेल याचा अंदाज दर्शविला जातो. त्या सोबतच ड्रायव्हरने आतापर्यंत किती ट्रिप केल्या आहेत व ग्राहकांनी त्याला कसे रेटिंग दिले आहे हेही त्या ॲपवर दर्शविले जाते. मिळालेली माहिती समाधानकारक वाटली तरच आपण प्रवासाला होकार कळवतो. तसेच गाडी चालवून प्रवास भाड्यावर गुजराण करू पाहणारी व्यक्ती ओला/उबरकडे स्वतःची आणि प्रवासी वाहनाची नोंद करतात.
तद्वतच कर्ज मागणी करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती व अन्य आवश्यक ती माहिती पी २ पी प्लॅटफॉर्ममार्फत मिळविली जाते व ज्या व्यक्तीने एस्क्रो अकाऊंटवर रक्कम जमा केली आहे अशा व्यक्तीस ई-मेल, एसएमएस मार्फत ती दिली जाते व सोबतच मिळू शकणारे व्याज व जोखीम याबाबत माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे निर्णय घेऊन कर्जदाराने मागणी केलेल्या कर्जात सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत आपला निर्णय गुंतवणूकदाराने पी २ पी प्लॅटफॉर्मला कळवायचा असतो. अशा रीतीने ज्याच्याकडे वरकड रक्कम आहे असा गुंतवणूकदार थेट गरजूस कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम पी २ पी लेंडिंग प्लॅटफॉर्म करत असतो.
डिजिटल कर्जाची बाजारपेठ किती मोठी?
देशातील डिजिटल कर्जाची बाजारपेठ लक्षणीयरीत्या विस्तारत आहे. डिजिटल माध्यमातून आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ३३ अब्ज डॉलरचे कर्ज वाटप करण्यात आले होते. ते २०१९-२० मध्ये १५० अब्ज डॉलर, तर २०२३-२४ मध्ये ३५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या सुमारे २५ कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने पी २ पी लेंडिंगसाठी रजिस्ट्रेशन दिले असून खालील काही कंपन्या सध्या प्रामुख्याने या व्यवसायात दिसून येत आहेत. यात फेअरसेंट, ब्रिज फ्रेन्जी, लेंड बॉक्स, लेनदेन क्लब, पैसा दुकान, रुपी सर्कल, आय टू आय फंड्स, लेंडिंगकार्ट, मोनेक्सो, कॅशकुमार या प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत. या व्यवसायाची सुमारे २१ ते २२ टक्के दराने प्रति वर्षी वाढ अपेक्षित असून २०२६ अखेर भारतातील हा व्यवसाय सुमारे ८०,००० ते ८५,००० कोटी रुपये इतका होईल असा अंदाज आहे.
डिजिटल कर्जाचे भवितव्य काय?
करोनाच्या महासाथीमुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन घडून आले. संपर्करहित व्यवहारांसाठी ग्राहकांची मागणी वाढत असताना, कर्जदारांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी अधिक कर्जदार तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. पारंपरिक बँका आणि बॅंकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देखील कार्यचालन खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी विविध बँकिंग प्रक्रियांचे डिजिटायझेशन करत आहेत. ज्यामुळे व्हिडिओ-केवायसी, आधार-संलग्न केवायसी यांसारख्या सेवा आणि अत्याधुनिक कार्यक्षमतेसह संकेतस्थळ आणि ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे कर्जासाठी अर्ज प्रक्रिया कार्यक्षम आणि सोपी बनली असून, कर्जमंजुरी ते कर्ज वितरण या दरम्यानचा कालावधी हा काही दिवसांवरून, काही मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.
gaurav.muthe@expressindia.com