यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ मध्ये कररचनेत कोणताही बदल न करून समान्य करदात्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्र सरकारने केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इतर काही नव्या संकल्पनांचा वापर अर्थसंकल्पीय भाषणात केला आहे. यामध्ये ‘गती-शक्ती’सारख्या उपक्रमांसोबतच ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’चा देखील उल्लेख त्यांनी केला. सध्या करोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व्यवस्थेचा डोलारा तोलून धरला असताना आता डिजिटल युनिव्हर्सिटीची नवी संकल्पना देशात अंमलात आणण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्पाचं वाचन करताना डिजिटल युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला. “देशात एक डिजिटल युनिव्हर्सिटीची स्थापना केली जाणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण अगदी व्यक्तिगत स्वरुपाच्या शिक्षण अनुभवाची अनुभूती करून देण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे”, असं अर्थमंत्री म्हणाल्या. नेटवर्क हब अँड स्पोक मॉडेलवर ही डिजिटल युनिव्हर्सिटी काम करेल, असं देखील त्यांनी नमूद केलं.
डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणजे काय?
केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ही डिजिटल युनिव्हर्सिटी हब अँड स्पोक मॉडेलवर आधारीत असेल. अर्थात, या विद्यापीठाचं एकच केंद्र असेल जिथे सर्व प्रशिक्षणाचा किंवा अध्यापनाचा डेटा तयार होईल. तिथून तो देशभरात दूरवर पसरलेल्या भागातील विद्यार्थी देखील पाहून किंवा वापरून अध्ययन करू शकतील. विद्यार्थ्यांनी या साखळीतील शेवटच्या टप्प्यात या ज्ञानाचा किंवा अभ्यासक्रमाचा वापर करून अध्ययन करणे याला ‘स्पोक्स’ म्हणण्यात आलं आहे.
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास देशातील सर्वोत्तम शासकीय, निमशासकीय विद्यापीठे या मॉडेलमध्ये हब म्हणून काम करतील. या विद्यापीठांमध्ये तयार होणारा कंटेंट देशभरातील विद्यार्थी त्यांच्या घरी किंवा कुठेही ऑनलाईन पद्धतीने डिजिटल माध्यमातून शिकतील. यातील प्रत्येक हबला अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम दर्जाची माहिती किंवा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावं लागेल.
प्रादेशिक भाषांना प्राधान्य!
दरम्यान, या हबच्या माध्यमातून तयार होणारी माहिती ही विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांना बळ देण्याचा देखील यातून प्रयत्न होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच, ऑनलाईन शिक्षण क्षेत्राती गुणवत्तेसाठी ठरवण्यात आलेल्या ISTE मानांकनानुसार दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था या डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.