– राखी चव्हाण
१०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद यंदा उपराजधानीला मिळाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ही धुरा सांभाळली. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित या परिषदेत वैज्ञानिकांची मांदियाळी असते. नागपूर शहराला यंदा आयोजनाचा मान मिळाल्यानंतर तशी तयारी करण्यात आली. मात्र, पहिल्यांदाच पंतप्रधानांनी भारतीय विज्ञान काँग्रेसचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. तर अनेक मोठ्या व्यक्तींनी याकडे पाठ फिरवली. त्यामुळे ज्या उद्देशाने भारतीय विज्ञान काँग्रेसची स्थापना झाली, तो उद्देश सफल होईल का, यांसारखे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भारतीय विज्ञान काँग्रेसचा इतिहास काय आहे?
भारतीय विज्ञान काँग्रेस ही १९१४ मध्ये कोलकाता येथे स्थापन झालेली भारतीय शास्त्रज्ञांची सर्वोच्च संस्था आहे. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये ही परिषद आयोजित केली जाते. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या स्थापनेपासून एक गौरवशाली सुरुवात आणि एक विलक्षण परंपरा त्याला लाभली आहे. सर आशुतोष मुखर्जी, लॉर्ड रदरफोर्ड, दौलतसिंग कोठारी, रामनाथ चोप्रा आणि सुरी भगवंतम यांसारखी अनेक नावे संस्थेशी जोडली गेली आहेत. भारतातील विज्ञानाच्या एकूण दर्जाची तुलना त्या काळात परदेशात सुरू असलेल्या गोष्टींशी अनुकूल होती, परंतु अभ्यासकांची संख्या कमी होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वार्षिक मेळाव्याला संबोधित करण्याची परंपरा सुरू केली आणि भारतीय विज्ञान काँग्रेस अधिक नावारूपाला आली.
भारतीय विज्ञान काँग्रेसचा मुख्य उद्देश काय?
भारतात विज्ञानाला चालना देणे, विज्ञानाचा प्रसार करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. भारतातील थोर शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी या संस्थेशी सुरुवातीपासूनच जोडले गेले होते. देशविदेशातील विज्ञानाच्या प्रगतीवर प्रतिबिंबित करणारे लेख, शोधनिबंध प्रकाशित करणे हेदेखील संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. जगभरात विज्ञान वेगाने प्रगती करत असताना भारताला शर्यतीत मागे पडू नये यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस संशोधनाला गती देणारे एक महत्त्वाचे साधन बनले आहे.
भारतीय विज्ञान काँग्रेसचे सदस्य किती?
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात सदस्यांची संख्या केवळ १००च्या आसपास होती. मात्र आजमितीस सुमारे ३० हजार शास्त्रज्ञ या संस्थेचे सदस्य आहेत. पहिल्या भारतीय विज्ञान काँग्रेस सत्रात जेमतेम ३५ शोधनिबंध सादर झाले होते. आता मात्र एकेका परिषदेत एक हजाराहून अधिक शोधनिबंध सादर केले जातात. भारतीय विज्ञान काँग्रेसची स्वारस्य क्षेत्रेदेखील वाढली आहेत. वनशास्त्र आणि कृषी विज्ञान, वनस्पती विज्ञान, मानववंशशास्त्र आणि वर्तणूक विज्ञान (पुरातत्त्व, शिक्षण आणि मानसशास्त्र), गणित विज्ञान (सांख्यिकी) यांचाही समावेश करण्यात आला आहे. सामायिकरण आणि लाभ दोन्हीच्या दृष्टिकोनातून परदेशी वैज्ञानिक संस्था आणि संघटनांचाही यात अंतर्भाव असतो.
हेही वाचा : नागपूर: राष्ट्रपती, पंतप्रधानांसह ‘या’ निमंत्रितांच्या अनुपस्थितीने इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील उत्साह हरपला
पंतप्रधानांच्या उपस्थितीचे महत्त्व का?
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या वार्षिक मेळाव्याला संबोधित करण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे भारतीय विज्ञान काँग्रेसला बळ मिळाले. नेहरूंचा विज्ञानावर एक उत्थानकर्ता म्हणून खरा विश्वास होता आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते सांभाळले. ही परंपरा सर्व पंतप्रधानांनी १९९६ पर्यंत सुरू ठेवली होती. या परंपरेमुळे भारतीय शास्त्रज्ञांनाही उत्साह आला. दरम्यानच्या काळात ती खंडित झाली, पण पुन्हा सुरू झाली. नागपूर येथे आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नसले तरीही आभासी पद्धतीने उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. वर्षानुवर्षे पंतप्रधानांचे भाषण हे विज्ञानाचे महत्त्व, राष्ट्रउभारणीत त्याची भूमिका आणि त्याचे सामान्य महत्त्व याबद्दल उपदेश आणि मार्गदर्शन करणारे असते. यावेळी पंतप्रधान प्रत्यक्षात उपस्थित नसले, तरी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.