– राखी चव्हाण
जागतिक पातळीवर तापमान वाढ होत असताना पृथ्वीवरील सर्वांत थंड भूप्रदेश अशी ज्याची ओळख आहे, त्या अंटार्क्टिका खंडात थोडथोडकी नाही तर बऱ्यापैकी तापमान वाढ झाली आहे. पूर्व अंटार्क्टिका सामान्यापेक्षा ७० अंश अधिक गरम झाल्यामुळे हवामान शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यामुळे अंटार्क्टिकावरील हवामान प्रणालीबाबत अनेक शास्त्रज्ञांचा अपेक्षाभंग झाला आहे.
पूर्व अंटार्क्टिकामध्ये तापमान का वाढले?
या खंडावरील हिमस्तराचे तापमान एका दशकात एक दशांश अंश सेल्सिअस या वेगाने वाढत आहे. जगभरात होत असलेल्या जीवाश्म इंधनाच्या वापरातून तयार होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे ही तापमान वाढ होत असल्याचे निरीक्षण ‘नासा’ने नोंदवले आहे. भविष्यात अंटार्क्टिकावर बर्फ वितळण्यापेक्षा बर्फवृष्टीचे प्रमाण अधिक राहील. किनारी भागातील तापमान वाढत असल्याचे व अंतर्गत भागातील तापमान कमी होत असल्याचे दिसत असले तरी अंटार्क्टिकाच्या एकूणच प्रदेशात तापमान वाढ होत आहे.
हरितगृह वायू म्हणजे काय?
हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूंमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणे हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते.
अंटार्क्टिकाच्या तापमानवाढीचे दुष्परिणाम?
अंटार्क्टिकाच्या तापमानवाढीचा नजीकच्या काळातील जाणवू शकेल असा परिणाम म्हणजे जगभरातील समुद्रांच्या पातळीत दरवर्षी तीन मिलीमिटर या वेगाने वाढ होणार आहे. बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेमुळे समुद्रात गोडे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळून समुद्रातील पाण्याची क्षारता कमी होईल. अंटार्क्टिकावरील तापमान वाढ आणि परिणामी बर्फ वितळू लागल्यामुळे अनेक भाग बर्फाच्या आवरणातून मुक्त होतील. परिणामी अंटार्क्टिका खंडावरील खनिजे काढण्याचे प्रयत्न होतील. जे धोकादायक असेल.
अंटार्क्टिकावरील वातावरण नेमके कसे?
अंटार्क्टिका खंडा हा पृथ्वीवरील सर्वांत थंड भूप्रदेश आहे. पूर्व अंटार्क्टिकाचा प्रदेश पश्चिम अंटार्क्टिकापेक्षा त्याच्या समुद्रसपाटीपासून असलेल्या जास्त उंचीमुळे नेहमीच थंड असतो. या खंडाच्या द्विपकल्पीय भागात दरवर्षी १६६ मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस होतो. तर अंतर्गत भागात केवळ ५५ मिलीमीटर पाऊस होतो. या खंडात होणारा पाऊस हा बर्फवृष्टीच्या स्वरूपातच असतो. कमी तापमानामुळे येथील निरपेक्ष आर्द्रतादेखील कमी असते. मागील दशकात पूर्व अंटार्क्टिकावरील बर्फाचा थर दरवर्षी दोन सेंटीमीटरने वाढला. तर पश्चिम अंटार्क्टिकावरचा थर दरवर्षी नऊ मिलीमीटरने कमी झाला. मात्र, आता पूर्व अंटार्क्टिकावर तापमान वाढले आहे.
यापूर्वी अंटार्क्टिकात तापमान वाढ होती का?
याआधी पूर्व अंटार्क्टिकातील बर्फाच्या तापमानात चढउतार होताना दिसत नव्हता, पण आता तिथेदेखील बदल घडत आहेत. काही ठिकाणी तापमान वाढ होणे हेदेखील धोक्याचे लक्षण मानले जाते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून देखील जागतिक तापमानवाढ झाली नसल्याचे काही वैज्ञानिक म्हणत होते. या स्थितीला ‘पॉज’ असे म्हणतात. अंटार्क्टिकाच्या निमित्ताने मात्र वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे.