-अन्वय सावंत
तीन वर्षांच्या कालावधीनंतर फिशर रँडम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे (एफआरडब्ल्यूसी) पुनरागमन झाले आहे. रेकविक (आइसलँड) येथे या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला मंगळवारपासून (२५ ऑक्टोर) सुरुवात झाली असून ३० ऑक्टोबरला विजेत्याची घोषणा होईल. ही स्पर्धा फिशर रॅपिड, ज्याला ‘चेस९६०’ म्हणूनही संबोधले जाते, या पद्धतीनुसार खेळवली जाणार आहे. हे नियम काय आहेत आणि या स्पर्धेत माजी जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला कोणते बुद्धिबळपटू टक्कर देणार याचा आढावा.
‘एफआरडब्ल्यूसी’ स्पर्धेत कोणत्या खेळाडूंचा सहभाग?
अमेरिकेचे दिग्गज बुद्धिबळपटू बॉबी फिशर यांनी ‘रँडम बुद्धिबळ’ या संकल्पनेसाठी बराच लढा दिला. त्यांना आदरांजली म्हणून जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) २०१९मध्ये पहिल्यांदा फिशर रँडम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले. त्या वेळी अमेरिकेच्या वेस्ली सो याने कार्लसनला पराभवाचा धक्का देत या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे गतविजेता सो आणि गतउपविजेता कार्लसन यांना यंदाच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे स्थानिक आयोजकांकडून आइसलँडचा अव्वल बुद्धिबळपटू ग्रॅंडमास्टर ह्योवर स्टीन ग्रेटरसनला, तर ‘फिडे’ अध्यक्षांकडून ग्रँडमास्टर इयान नेपोम्निशी यांना प्रवेश देण्यात आला आहे. व्लादिमिर फेडोसीव्ह, माथियस ब्लूबाउम, हिकारू नाकामुरा आणि १८ वर्षीय नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह या चार बुद्धिबळपटूंनी पात्रता फेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. या आठ बुद्धिबळपटूंना स्पर्धेत दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
फिशर रॅंडमचे वेगळेपण काय?
फिशर रँडम किंवा ‘चेस९६०’मध्ये बुद्धिबळाचे सर्वच नियम पाळले जातात, अपवाद केवळ एका नियमाचा. या पद्धतीच्या डावामध्ये सुरुवातीलाच मोहऱ्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची असते. सामन्यापूर्वी १५ मिनिटे मोहऱ्यांची मांडणी उघड केली जाते. त्यानंतर बुद्धिबळपटू काही मिनिटे आपल्या केवळ एका साहाय्यकासोबत चर्चा करू शकतात. त्यामुळे बुद्धिबळपटूंना सुरुवातीला नेहमीपेक्षा वेगळ्या चाली खेळाव्या लागतात. त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता वाढते. परिणामी तुलनेने दुबळ्या असलेल्या खेळाडूलाही आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याची संधी निर्माण होते.
फिशर रँडममध्ये मोहऱ्यांची मांडणी कशी असते?
बुद्धिबळात डावाच्या सुरुवातीला पटावर १६ मोहरे असतात आणि त्यांची दोन ओळींमध्ये विभागणी केलेली असती. पुढील ओळीत आठही प्यादी असतात, तर मागील म्हणजेच खेळाडूच्या जवळील ओळीत १ राजा, १ वजीर, २ उंट, २ घोडे आणि २ हत्ती असतात. नियमित बुद्धिबळात, मागील ओळीत दोन्ही कोपऱ्यांत हत्ती, त्या बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांत घोडे, त्यानंतर दोन्ही बाजूंना एक-एक उंट आणि मधल्या दोन घरांमध्ये (चौकटींमध्ये) डावीकडे वजीर आणि उजवीकडे राजा अशी मोहऱ्यांची मांडणी असते. मात्र, फिशर रँडम प्रकारात, मागील ओळीतील मोहऱ्यांची मांडणी रँडम म्हणजेच हव्या त्या पद्धतीने करता येते. परंतु त्यातही काही नियम पाळावे लागतात. राजा हा दोन हत्तींच्या मध्येच असू शकतो, उंट वेगळ्या रंगाच्या घरांमध्ये (चौकटींमध्ये) असावे लागतात. अशाच पद्धतीने प्रतिस्पर्ध्याच्याही मोहऱ्यांची मांडणी असते. परंतु राजा आणि हत्ती हे कोणत्याही घरांमध्ये असले, तरी कॅसलिंगसाठी (राजाला वाचवणे आणि हत्तीला चालवणे) नियमित बुद्धिबळाचे नियमच वापरावे लागतात.
फिशर रँडम हेच बुद्धिबळाचे भविष्य?
अमेरिकन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हान्स नीमन फसवणूक करून सामने जिंकत असल्याचा आरोप कार्लसनने काही दिवसांपूर्वीच केला होता. सप्टेंबरमध्ये झालेल्या सिन्कफील्ड चषक स्पर्धेतून कार्लसनने अचानक माघार घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या निमनकडून अनपेक्षित पराभूत झाल्यानंतर कार्लसनने हा निर्णय घेतला, तेव्हा नीमनने बहुधा फसवणूक करून डाव जिंकला, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर कार्लसनने जाहीर विधान करत या चर्चा खऱ्या ठरवल्या. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणारे काहीच खेळाडू आपल्याला पराभूत करू शकतात आणि नीमन त्यापैकी एक नाही, असे कार्लसनने स्पष्ट केले होते. त्यामुळे तो सामना जर फिशर रँडम पद्धतीने झाला असता, तर नीमनने कार्लसनला पराभूत केले असते का, हा प्रश्न आहे. शिवाय फिशर रँडम पद्धतीमध्ये धक्कादायक निकालांची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या पद्धतीनुसार झालेल्या सामन्यात नीमनने कार्लसनवर मात केली असती, तर कार्लसनला कदाचित फसवणुकीची शक्यता जाणवलीच नसती. त्यामुळे भविष्यात फिशर रँडम पद्धतीने अधिक सामने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धापूर्व तयारीचा घटक या प्रकारात जवळपास बाद होतो. कारण नेमकी मोहऱ्यांची स्थिती पटावर काय असेल, हे निश्चित नसते. त्यामुळे तयारीऐवजी गणनक्षमता कौशल्य हाच निकष या प्रकारात निर्णायक ठरतो.