जगभरामध्ये ओमायक्रॉनची दहशत असतानाच आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लसी देणारा पहिला देश असल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये मात्र नव्याच संकटाने डोकं वर काढलंय. इस्रायलमधील या संकटामुळे जगभरातील करोना संसर्गाची भिती अनेक पटींनी वाढल्याचा दावा केला जातोय. इस्रायलबरोबरच जगभरात चर्चेचा विषय ठरत असणारं हे संकट आहे, ‘फ्लोरोना’चं. हे ‘फ्लोरोना’ काय प्रकरण आहे. त्याची लक्षणं काय आहेत?, त्याची काय माहिती समोर आलीय?, तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे?, कोणाला याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…
फ्लोरोना म्हणजे काय?
फ्लोरोनाचा अर्थ होतो करोना आणि इन्फ्लूएन्झाचा एकाच वेळी संसर्ग होणे. येथील व्हानेटन्यूज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी करोना आणि इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झालेली रुग्ण ही एक गरोदर महिला आहे. राबीन मेडिकल सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे. या महिलेचं लसीकरण झालेलं नसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला करोना आणि इन्फ्लूएन्झा या दोन्हींची लस देण्यात आलेली नाही.
हा करोनाचा नवा व्हेरिएंट आहे का?
फ्लोरोना हा करोनाचा नवीन व्हेरिएंट नसल्याचं नहल्ला अब्दुल वहाब यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटलंय. वहाब हे कायरो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. फ्लोरोनाचा संसर्ग म्हणजेच एकाचवेळी दोन वेगवेगळ्या विषाणूंचा संसर्ग होणं हे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती अगदीच संपलीय किंवा नष्ट झाल्याचं निर्देशित करतं असं डॉक्टर सांगतात. एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग होत असल्यास रोगप्रतिकारशक्ती अगदी संपल्यात जमा असल्याचं म्हणता येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल
यापूर्वीही असा संसर्ग झाल्याची शक्यता…
इस्रायमधील आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहे. या महिलेला फार त्रास होत नसला तरी मध्यम स्वरुपाची लक्षणं तिच्यामाध्ये दिसत आहेत. या दोन्ही विषाणूंचा एकाचवेळी संसर्ग झाल्यास अधिक प्रमाणामध्ये प्रकृती खालावते का?, एकाच वेळी संसर्ग झाल्याने विषाणू अधिक घातक ठरतात का?, या सारख्या गोष्टींचा शोध सध्या संशोधकांकडून घेतला जातोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यापूर्वीही अनेकांना अशाप्रकारे एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग झाला असावा मात्र त्याचं निदान न झाल्याने ही प्रकरण उजेडात आली नसतील.
गरोदर महिलांमधील करोना संसर्ग आणि फ्लू संसर्ग वाढला
मागील वर्षी या देशामध्ये गरोदर महिलांमध्ये फ्लूची फार प्रकरणं आढळून आली नाहीत, अशी माहिती रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ असणाऱ्या अरनॉन विझिन्टर यांनी दिली. मात्र मागील काही काळापासून फ्लू त्याचबरोबर करोनाचा संसर्ग झालेल्या गरोदर महिलांची संख्या वाढताना दिसत असून ही चिंतेची बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. गरोदर महिला रुग्णालयामध्ये दाखल होताना तिला ताप असेल तर तो नक्की करोनाचा संसर्ग आहे की इन्फ्लूएन्झा याचं निदान लवकर होत नाही. अशावेळेस या महिलांच्या चाचण्या केल्या जातात. यापैकी अनेक महिलांना श्वसनाचाच त्रास असल्याचं डॉक्टर म्हणतात.
नक्की पाहा >> Omicron: लस घेतलेल्यांनाही संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाऐवजी…; WHO ने मांडलेले १८ मुद्दे
चिंता या गोष्टीची की पूर्णपणे बरं होण्यासाठी…
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार या आजाराची नक्की लक्षणं काय आहेत हे ठामपणे सांगण्यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागेल. मात्र करोना या आजारामध्येही सामान्यपणे करोनाची लक्षणं दिसून येतात आणि यामधून पूर्णपणे बरं होण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यात असते. करोना आणि फ्लू एकाचवेळेस झाल्यास असं घडू शकतं. फ्लूचा संसर्ग झाल्यास एक किंवा चार दिवसांमध्ये लक्षणं दिसतात. तर करोनामधून सावरण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. दोघांचाही संर्सग एकाच वेळेस झाला तरी लक्षणं ही संसर्ग झाल्यानंतर दोन ते १४ दिवसांच्या कालावधीमध्ये दिसतात.
संसर्ग कसा होतो?
या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्यानंतर काही कालावधीनंतर नव्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीत लक्षणं दिसू शकतात. लक्षणं न दिसणारी किंवा अगदीच सौम्य लक्षणं दिसाणारी लोकही या विषाणूचे वाहक असतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, अशी व्यक्ती शिंकल्यास किंवा खोकल्यात त्यांच्या तोंडावाटे निघणाऱ्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यास त्यानंतर तोच हात नाक, डोळे किंवा तोंडाला लावल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : ‘डेल्मिक्रॉन’ म्हणजे काय? तो किती घातक आहे?, भारतीयांना त्याचा धोका किती?
…म्हणून एकाचवेळी दोघांचा प्रादुर्भाव
करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्येच या विषाणूमुळे ट्विन्डेमिक म्हणजेच दोन विषाणूंचा एकत्र प्रादुर्भाव होतो अशी साथ निर्माण होण्याची भीती व्यक्त केलेली. मात्र सोशल डिस्टन्सिंगचे कठोर नियम आणि निर्बंधांमुळे मोठ्याप्रमाणात असा दुहेरी संसर्ग झाल्याचं पहायला मिळालं नाही. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोकांच्या बेजबाबदारपणामुळे एकाच वेळेस दोन विषाणूंच्या संसर्गाची शक्यता अधिक वाढलीय. त्यामुळेच आता हा एकाच वेळी करोना आणि इन्फ्लुएन्झासारख्या दोन विषाणूंचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. २०२०-२१ च्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये फ्लूची प्रकरण ही सामान्य आकडेवारीपेक्षा फार कमी होती. कारण लोकांनी मास्क वापरण्याला आणि शारीरिक अंतर ठेवण्यास प्राधान्य दिलेलं.
लक्षणांबद्दल डब्ल्यूएचओ काय म्हणतं?
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच एब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार करोना आणि इन्फ्लुएन्झा या दोघांचा एकाच वेळी संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही विषाणूंचा रचना आणि संसर्गानंतरची लक्षणं जवळजवळ सारखीच असतात. यामध्ये वाहते नाक, घशात खवखवणे, ताप, डोकेदुखी, अशक्तपणा ही लक्षणं दिसू शकतात. मात्र लोकांनुसार ही लक्षणं वेगळीही असू शकतात. काहींमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नाहीत तर काहींना थोड्या प्रमाणात त्रास होतो तर अगदी काही प्रमाणामध्ये लोकांना फार त्रास होतो.
नक्की वाचा >> ओमायक्रॉनबाधितांवर या गोळ्यांचा वापर करुन केला जातोय उपचार; डॉक्टरांनीच दिली माहिती
नेचरमधील संशोधनामधून समोर आली धक्कादायक माहिती…
नेचर या नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन्ही विषाणूंचा प्रादुर्भाव हवेतून होतो. श्वसननलिका, ब्रोकाइल आणि फ्फुफुसांमधील पेशींवर हे विषाणू हल्ला करतात. त्यामुळे दोन्हींचा एकाच वेळी प्रादुर्भाव सुरु झाल्यास अनेकांना याचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
नेचरमधील अहवालानुसार उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये असं दिसून आलंय की इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झाल्यास करोनाचा संसर्ग होण्याचा अधिक असतो. त्यामुळे करोनाचा व्हायरल लोड वाढतो त्याचा फ्फुफुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झाल्यास करोना विषाणूचा शरीरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळेच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी इन्फ्लूएन्झावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: करोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्राने मंजूरी दिलेल्या Molnupiravir गोळीबद्दल जाणून घ्या
लक्षणं दिसून येत नसल्याने अडचणी…
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार वातावरणातील बदलानुसार दरवर्षी देशात व्हायरल आजारांचे प्रमाण वाढतं. करोनामुळे हे आजार सध्या मागील दोन वर्षांपासून अधिक घातक झालेत. करोनाचा संसर्ग झाल्यास अशा आजारांची लक्षणं पटकन दिसून येत नसल्याने त्यांच्यावर उपचार करणं अधिक कठीण होतं.
दोन वेगळ्या चाचण्या…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार ज्या ठिकाणी इन्फ्लूएन्झा आणि करोनाचे रुग्ण आढळतील तिथे दोन्ही विषाणूंच्या संसर्गाच्या तपासण्या केल्या पाहिजेत. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएन्झाच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसून येतं. एकाच वेळी दोघांचा संसर्ग झाल्यास अडचणी वाढू शकतात. दोघांची लक्षणं सारखीच असल्याने वेगवेगळ्या पीसीआर चाचण्या केल्यानंतरच दोघांचा संसर्ग झालाय की एकाच याचं निदान करता येतं, असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Omicron चा संसर्गच ठरतोय नैसर्गिक लस?; साथरोग तज्ज्ञ, संशोधक म्हणतात, “एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर…”
उपचार काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सर्वच वयातील लोकांना या संसर्गाचा धोका संभवतो. मात्र खास करुन वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला, सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, नुकत्याच बाळांतपण झालेल्या महिलांना याच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास करोनावर जगभरामध्ये जे उपचार केले जातायत, ज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कॉर्टिकोस्टेराइडचा समावेश आहे तेच इन्फ्लूएन्झासाठी अॅण्टीव्हायरल औषधं म्हणून देऊन प्रकृतीवर होणारा गंभीर परिणाम आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी फायद्याचे ठरतात.