what is Flying naked? ‘फ्लाइंग नेकेड’ या नावाचा एक नवीनच प्रवासी ट्रेण्ड चर्चेत आहे. या ट्रेण्डच्या नावामध्ये ‘नेकेड’ हा शब्द असला तरी, या ट्रेण्डचा आणि अंगावरील कपड्यांचा काहीही संबंध नाही; हा संबंध आहे विनासामान प्रवासाशी. या प्रकारच्या प्रवासात प्रवासी कोणत्याही प्रकारचे सामान न घेता प्रवास करतात, त्याचे अनेक फायदे आहेत. यात सामानासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. या ट्रेण्डबद्दल लोकांमध्ये संमिश्र भावना मनात आहेत. सध्या हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यावर्षी प्रवासाशी संबंधित डेस्टिनेशन ड्युपिंगपासून ते रॉ-डॉगिंगपर्यंत अनेक ट्रेण्ड्स व्हायरल होताना दिसले. सध्या सोशल मीडियावर ‘फ्लाइंग नेकेड’ हा ट्रेण्ड प्रचंड लोकप्रिय होत आहे. कमी सामानासह प्रवास हे अनेक पर्यटकांचे स्वप्न असते. त्याच निमित्ताने या ट्रेण्डचा घेतलेला हा आढावा.
‘फ्लाइंग नेकेड’ प्रवासाचा नवा ट्रेण्ड
‘फ्लाइंग नेकेड’ या नावाचा शब्दशः अर्थ काहीही असला तरी त्याचा संबंध हा प्रवासादरम्यान सामान टाळण्याशी आहे. अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कमीत कमी सामान घेऊन प्रवास करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळेच कमी खर्चात प्रवास करू इच्छिणारे प्रवासी हे नवीन ट्रॅव्हल हॅक वापरत आहेत. सामान चेक-इन करणे किंवा कॅरी-ऑन बॅग आणण्याऐवजी हे हॅक केव्हाही चांगले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. Thrillist या लाईफ स्टाईल कव्हर करणाऱ्या मीडिया आऊटलेटने या ट्रेण्डचे तीन प्रकार सांगितले आहेत. १. टोटली बेअर: ज्यामध्ये प्रवासी फक्त आवश्यक वस्तू, उदाहरणार्थ फोन, वॉलेट आणि चार्जर घेऊन प्रवास करतात. २. पॉकेट पीपल: ज्यामध्ये प्रवासी त्यांच्या खिशांमध्ये जास्तीत जास्त वस्तू कोंबून ठेवतात. ३. डिलिव्हरी क्रू: ज्यामध्ये प्रवासी आपले सामान आधीच त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी कुरिअरद्वारे पाठवतात. या तीन प्रकारांचा समावेश होतो. ही संकल्पना खरेतर नवीन नाही. कारण यावर अनेक वर्षांपासून चर्चा आणि प्रयोग होत आहेत. जे प्रवासी लहान प्रवासासाठी निघतात, म्हणजेच ज्यांना एकाच दिवसाचा प्रवास अपेक्षित असतो किंवा डेस्टिनेशनवर परवडणाऱ्या सोयी सुविधा आहेत ते प्रवासी अशा स्वरूपाच्या संकल्पनेचा विचार करतात.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या ट्रेण्डची लोकप्रियता अलीकडेच वाढली आहे. कमी सामानाबरोबर केलेल्या प्रवासाचे अनुभव लोकांकडून शेअर होत आहेत. “पॅरिसला माझ्याबरोबर नेकेड फ्लाईंग… म्हणजे काहीसे तसेच. मी पॅरिस/लंडनमध्ये नऊ दिवसांसाठी माझे अंगावरचे कपडे वगळता कोणतेही कपडे घेऊन जाणार नाही,” असे जियोव्हानी फेअर्स (प्रवासी) यांनी TikTok वर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये “जेव्हा तुम्ही नेकेड फ्लाईंग करता” अशी कॅप्शन होती आणि हा व्हिडिओ ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर बेथनी सिओटोलाने शेअर केला होता. त्यात ती केवळ एक छोटी पर्स घेऊन विमानात चढताना दिसत आहे. या व्हिडिओला २,२५,००० व्ह्यूज आणि १२,६०० पेक्षा अधिक अपव्होट्स मिळाले आहेत. “कॅरी-ऑन बॅगशिवाय विमानात चढणे हा सगळ्यात वेगळा अनुभव आहे,” असे ऑस्ट्रेलियन गिटारवादक सेब सझाबो यांनी एका TikTok व्हिडिओत सांगितले. “हे जणू काही स्थानिक बसमध्ये चढण्यासारखे आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही एका पूर्णपणे वेगळ्या शहरात उतरत आहात.” दुसऱ्या प्रवाशाने एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे.
पहिल्या नजरेत ‘फ्लाइंग नेकेड’ ही कल्पना आनंददायी वाटू शकते, परंतु तुम्ही उतरल्यानंतर काय कराल?
सोशल मीडिया पोस्टनुसार काही लोक म्हणतात की, स्वतःच्या अंगावर असलेल्या कपड्यांचाच वापर ते करतील. काही जण याला एक संधी म्हणून पाहतात आणि जिथे पोहोचतील तिथे कपडे खरेदी करतील किंवा थ्रिफ्टिंग करतील. परंतु, नंतर त्यांना नव्याने घेतलेल्या कपड्यांसाठी बॅकपॅक किंवा सामान खरेदी करावे लागते. खरेदी केलेल्या वस्तू परत कुरिअरद्वारे पाठवण्याचा पर्यायही ते निवडू शकतात, ज्यासाठी चेक-इन बॅगेसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा अधिक शुल्क लागण्याची शक्यता असते. परंतु या संकल्पनेसंदर्भात लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी याला विरोध केला आहे. एका TikTok वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार, सामानाशिवाय प्रवास करणे वेडसर आणि समजून घेणे कठीण आहे.
फायदे
‘फ्लाइंग नेकेड’ प्रवासाचा एक प्रमुख फायदा म्हणजे चेक-इन बॅगेजशी संबंधित अतिरिक्त शुल्क वाचवणे. सध्या विमान कंपन्या चेक-इन बॅगेजसाठी, कधी कधी कॅरी-ऑन बॅगसाठीही जास्त शुल्क आकारतात. तुम्ही बॅग्स नोंदवण्याची आवश्यकता टाळल्यामुळे हे पैसे तुम्ही इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरू शकता. परदेशी प्रवासासाठीची योजना आखू शकता. बॅग्स न घेता प्रवास केल्यास बॅगेज क्लेममध्ये वेळ घालवावा लागत नाही आणि तुम्ही थेट तुमच्या पुढील प्रवासासाठी निघू शकता. याशिवाय, मोठ्या बॅगेजचं ओझं नसल्यानं वर्दळीच्या विमानतळांवरून जाणे- येणेही खूप सोपे होते. तुम्हाला तुमच्या सर्व आवडत्या गोष्टी बरोबर नेण्याची सवय असेल तर हा ट्रेण्ड कदाचित खूपच वेगळा वाटू शकतो.