गेल्या एक वर्षापासून प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन कर्करोगाशी लढा देत आहे. त्यांनी यावरील उपचारासाठी वारंवार फॉरेस्ट बाथिंग करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते, परंतु आता ही फॉरेस्ट बाथिंग थेरपी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. नक्की फॉरेस्ट बाथिंग काय आहे? ही थेरपी खरंच कर्करोगासाठी उपयुक्त आहे का? एकूणच या थेरपीचे फायदे काय? राजकुमारी केटचे याविषयीचे म्हणणे काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकुमारी केट काय म्हणाली?

राजकुमारी केटला फॉरेस्ट बाथिंगची आवड आहे. राजकुमारी केटने विंडसरमधील विलोच्या झाडाखाली उभे राहून आकाशाकडे पाहत असल्याचे एक छायाचित्र शेअर केले. आपल्या पोस्टमध्ये प्रिन्सेस ऑफ वेल्स केट म्हणाली, “गेल्या काही महिन्यांपासून मला मिळणारा पाठिंबा आणि प्रोत्साहनाच्या सर्व प्रकारच्या संदेशांनी मला आनंदित केले आहे. यामुळे विल्यम आणि माझ्यात खरोखरच फरक पडला आहे आणि या सगळ्या संदेशांनी कठीण काळात आम्हा दोघांनाही मदत केली आहे.” ती पुढे म्हणाली, माझी प्रकृती सुधारत आहे. परंतु, केमोथेरपीतून जात असलेल्या प्रत्येकाला माहीत आहे की, यात चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस असतात. त्या वाईट दिवसात तुम्हाला अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि तुम्हाला तुमच्या शरीराला विश्रांती द्यावी लागते. पण चांगल्या दिवसांमध्ये, तुमच्या शरीरात ऊर्जाही दिसते,” असे त्या म्हणाल्या.

“मी या आठवड्याच्या शेवटी माझ्या कुटुंबासह ‘द किंग्स बर्थडे परेड’मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे आणि उन्हाळ्यात काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सामील होण्याचीही मला अपेक्षा आहे, परंतु सध्या मी जंगलाच्या सानिध्यात आहे. मी धीर कसा ठेवावा हे शिकत आहे. प्रत्येक दिवस जसा येतो तसा त्याचा सामना करणे, माझ्या शरीराचे ऐकणे आणि मला बरे होण्यासाठी आवश्यक वेळ काढणे, यावर मी भर देत आहे,” असेही ती म्हणाली.

मॅट पोर्टियसने टिपलेल्या छायाचित्राविषयी रॉयल चरित्रकार सॅली बेडेल स्मिथ यांनी ‘पीपल मॅगझिन’ला सांगितले, “तिथे राजकुमारी निसर्गात आहे, निसर्गाच्या सानिध्यात त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि प्रत्येकासाठीच ही एक प्रेरणा आहे.” प्रिन्सेस ऑफ वेल्सला जपानी ‘शिनरीन योकू’ (ज्याचा अर्थ ‘जंगलातील वातावरणात राहणे’ असाही होतो) या प्रथेने प्रेरणा मिळाली. खरं तर, जेव्हा ती केंब्रिजची डचेस होती, तेव्हा तिने चेल्सी फ्लॉवर शोमध्ये एक बागदेखील डिझाइन केली होती.

फॉरेस्ट बाथिंग म्हणजे काय?

फॉरेस्ट बाथिंग किंवा शिनरीन योकू, ही जपानी प्रथा आहे. या प्रथेनुसार जंगलातील नैसर्गिक शांततेचा अनुभव घेता येतो. ही एक प्रकारची थेरपी आहे. या प्रकारच्या थेरपीमध्ये लोक जंगलात जातात, शांत ठिकाणी बसतात, दीर्घ श्वास घेतात आणि सभोवतालच्या निसर्गाची शांतता अनुभवतात. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. फॉरेस्ट बाथिंगला वनस्नानही म्हणतात. ही सजगतेची क्रिया आहे, जी मनाला वर्तमानात आणण्यासाठी पाचही इंद्रियांचा वापर करते. १९८० च्या दशकात उगम झालेला हा शब्द जपानी सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या तणावाच्या आणि स्वयंप्रतिकार रोगांमध्ये वाढ झाल्यामुळे तयार केला. टेक-बूम बर्नआउटसाठी ही थेरपी उपयुक्त मानली जाते. नागरिकांना जंगलांशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी आणि जंगलांना वाचवण्यासाठी प्रोत्साहित करणे हेदेखील याचे उद्दिष्ट आहे.

फॉरेस्ट बाथिंग कसे करायचे?

फॉरेस्ट बाथिंग करण्याच्या मूलभूत पद्धतींमध्ये कोणत्याही नैसर्गिक वातावरणात फेरफटका मारणे, दीर्घ श्वास घेणे आणि आपल्या सभोवतालच्या परिसराशी हेतुपुरस्सर संवाद साधणे यांचा समावेश होतो. अधिक चांगल्या अनुभवासाठी अनुभवी मार्गदर्शकांसह दोन-तीन तासांच्या इकोथेरपीचादेखील लाभ घेता येतो. ‘द इयर ऑफ लिव्हिंग डॅनिशली’ लिहिणाऱ्या लेखिका आणि संशोधक हेलन रसेल यांनी ‘द इंडिपेंडंट’ला सांगितले, “जपानमध्ये आनंदावर संशोधन झाल्यापासून मला शिनरीन-योकू किंवा फॉरेस्ट बाथिंगची आवड आहे. फॉरेस्ट बाथिंगसाठी पाण्याची गरज नाही. विश्रांतीच्या उद्देशाने लोक केवळ निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आणि नैसर्गिक वातावरणात वेळ घालवू शकतात.”

फॉरेस्ट बाथिंगचे फायदे काय आहेत?

फॉरेस्ट बाथिंगचे मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फॉरेस्ट बाथिंग चांगल्या मानसिक आणि भावनिक निरोगीपणाला प्रोत्साहन देते. तणावात असणाऱ्या लोकांसाठी, फॉरेस्ट बाथिंगचा सराव त्यांच्या मज्जासंस्थेला शांत करू शकतो कारण त्यांचे लक्ष त्यांच्या विचारांपासून त्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक घटकांकडे वळते. टोकियोमधील निप्पॉन मेडिकल स्कूलचे प्रोफेसर किंग ली यांच्या म्हणण्यानुसार, झाडांद्वारे सोडले जाणारे फायटोनसाइड्स श्वासोच्छवासामुळे जैविक बदल घडवून आणतात आणि नैसर्गिक पेशींचे उत्पादन वाढवतात, जे विषाणू आणि ट्यूमरपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

जपानमध्ये केलेल्या काही अभ्यासांनुसार, मधुमेहाच्या रूग्णांचा रक्तदाब, रक्तातील ग्लुकोजची पातळी हे सर्व जंगलातील दृश्ये पाहून आणि जंगलात तीन किंवा सहा किलोमीटरचा फेरफटका मारून कमी करता येते. “फॉरेस्ट बाथिंग ही लोकांनी स्वतःसाठी वेळ काढण्याची आणि निसर्गाशी जोडण्याची एक संधी आहे. तुमच्या आयुषतील केवळ २० मिनिटे तुम्हाला मदत करू शकतात,” असे ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. किंग्ज कॉलेज लंडनच्या २०१८ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, झाडे, आकाश आणि पक्ष्यांच्या आवाजाच्या संपर्कात आल्याने काही तासांनंतरही मानसिक निरोगीपणा राहतो. इतर अभ्यासातून असे दिसून आले आहे की, यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढू शकते आणि कोर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन) कमी होऊ शकते. फॉरेस्ट बाथिंग केल्याने रोगप्रतिकारक पेशींची क्रिया वाढू शकते आणि कर्करोग-विरोधी प्रथिनांना चालना मिळू शकते.

“फॉरेस्ट बाथिंग प्रत्येकासाठी फायदेशीर असू शकते, परंतु शहरी वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींसाठी ते विशेषतः फायदेशीर आहे,” असे एका डॉक्टरने ‘स्टॅनफोर्ड’ला सांगितले. “शहरी नागरिकांना सामान्यत: तणावाची उच्च पातळी, ध्वनी प्रदूषण आदींचा तुलनेने अधिक सामना करावा लागतो. फॉरेस्ट बाथिंग केल्याने शहरातील नागरिकांना या तणावातून बाहेर पडण्याची आणि निसर्गाशी जोडल्या गेलेल्या चांगल्या आरोग्याचा अनुभव घेण्याची संधी मिळते,” असेही ते पुढे म्हणाले. असे दिसते की, फॉरेस्ट बाथिंग करणे केवळ ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठीच व्यवहार्य आहे. परंतु, असे आढळून आले आहे की शहरांमध्ये राहणाऱ्या किशोरवयीनांनादेखील शहरातील जंगलात फॉरेस्ट बाथिंग करून शांततेचा अनुभव घेता येऊ शकतो; ज्यामध्ये ते जवळच्या उद्यानातही जाऊ शकतात.