पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) यांच्यातील वाद गेल्या काही काळापासून वाढतच चालला आहे. याला प्रामुख्याने ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळ कारण ठरले आहे. आघाडीच्या बुद्धिबळपटूंना ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्यापासून ‘फिडे’ रोखत असल्याचा आरोप कार्लसनने केला होता. मात्र, कार्लसनची सहमालकी असलेली ‘फ्री-स्टाइल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम टूर’ आता कोणत्याही अडथळ्याविना सुरू असून यात आघाडीचे ग्रँडमास्टर सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे भविष्यात बुद्धिबळपटूंचा याच प्रकाराकडे अधिक कल असू शकेल, असेही मत व्यक्त केले जात आहे.

‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळ म्हणजे काय?

‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळाला फिशर रॅपिड किंवा ‘चेस९६०’ म्हणूनही संबोधले जाते. अमेरिकेचे दिग्गज बुद्धिबळपटू बॉबी फिशर यांनी ‘रँडम बुद्धिबळ’ या संकल्पनेसाठी बराच लढा दिला. यात पारंपरिक बुद्धिबळाचे सर्वच नियम पाळले जातात, अपवाद केवळ एका नियमाचा. या पद्धतीत डावाच्या सुरुवातीलाच मोहऱ्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची असते. सामन्यापूर्वी १५ मिनिटे मोहऱ्यांची मांडणी उघड केली जाते.

या प्रकाराचे काय वेगळेपण?

बुद्धिबळात डावाच्या सुरुवातीला पटावर १६ मोहरे असतात आणि त्यांची दोन ओळींमध्ये विभागणी केलेली असती. पुढील ओळीत आठही प्यादी, तर मागील म्हणजेच खेळाडूच्या जवळील ओळीत १ राजा, १ वजीर, २ उंट, २ अश्व आणि २ हत्ती असतात. नियमित बुद्धिबळात, मागील ओळीत दोन्ही कोपऱ्यांत हत्ती, त्या बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांत अश्व, त्यानंतर दोन्ही बाजूंना एकेक उंट आणि मधल्या दोन घरांमध्ये (चौकटींमध्ये) डावीकडे वजीर आणि उजवीकडे राजा अशी मोहऱ्यांची मांडणी असते. मात्र, ‘फ्री-स्टाइल’ प्रकारात, मागील ओळीतील मोहऱ्यांची मांडणी ‘रँडम’ म्हणजे वेगळ्याच पद्धतीने केले जाते. परंतु त्यातही काही नियम पाळावे लागतात. राजा हा दोन हत्तींच्या मध्येच असू शकतो, उंट वेगळ्या रंगाच्या घरांमध्ये (चौकटींमध्ये) असावे लागतात. अशाच पद्धतीने प्रतिस्पर्ध्याच्याही मोहऱ्यांची मांडणी असते. परंतु राजा आणि हत्ती हे कोणत्याही घरांमध्ये असले, तरी ‘कॅसलिंग’साठी (राजाला वाचवणे आणि हत्तीला चालवणे) नियमित बुद्धिबळाचे नियमच वापरावे लागतात.

हेच बुद्धिबळाचे भविष्य?

बुद्धिबळविश्वात ‘फ्री-स्टाइल’ प्रकारावरून बरीच मतमतांतरे आहेत. काहींच्या मते हेच बुद्धिबळाचे भविष्य आहे. या प्रकारात बुद्धिबळपटूंना सुरुवातीला नेहमीपेक्षा वेगळ्या चाली खेळाव्या लागतात. त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता वाढते. परिणामी तुलनेने दुबळ्या असलेल्या खेळाडूलाही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याची संधी निर्माण होते. त्याच वेळी पारंपरिक बुद्धिबळात ‘ओपनिंग’ अर्थात सुरुवातीच्या चालींना फार महत्त्व असते. बुद्धिबळपटू याचा वर्षानुवर्षे अभ्यास करतात. त्यामुळे जर पारंपरिक बुद्धिबळाची जागा ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळाने घेतली, तर या अभ्यासाला आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीला काहीच महत्त्व राहणार नाही. याच कारणास्तव काही जण या प्रकाराच्या पक्षात आहेत, तर काही जण याला विरोध करत आहेत.

एरिगेसी तरबेज, गुकेश चाचपडतो

पारंपरिक प्रकाराच्या तुलनेत ‘फ्री-स्टाइल’मध्ये भारतीय बुद्धिबळपटू अद्याप फारशी छाप पाडू शकलेले नाहीत. जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांसारखे भारतीय बुद्धिबळपटू ‘ओपनिंग’वर विशेष लक्ष देतात. मात्र, ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळात सुरुवातीच्या चालींचे महत्त्व काहीसे कमी होते. बुद्धिबळपटूंना अधिक धोका पत्करून वैविध्यपूर्ण चाली रचाव्या लागतात. गुकेश आणि प्रज्ञानंद निडरपणे खेळत असले, तरी आपल्यापेक्षा अनुभवी बुद्धिबळपटू समोर आल्यास त्याला अडचणीत टाकण्यात हे दोघे कमी पडतात. अर्जुन एरिगेसी मात्र अधिक संयम राखून खेळण्यासाठी ओळखला जातो. प्रतिस्पर्ध्याने नेहमीपेक्षा वेगळ्या चाली रचल्या, तरी तो गोंधळून चुका करत नाही. याचाच त्याला ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळात फायदा होतो. एरिगेसीने ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’च्या पॅरिस टप्प्यात कार्लसनला पराभूत करण्याची किमया साधली.

‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’बाबत…

गुकेश आणि कार्लसन या आजी-माजी जगज्जेत्यांसह प्रज्ञानंद, एरिगेसी, फॅबियानो कारुआना, इयन नेपोम्नियाशी यांसारखे आघाडीचे बुद्धिबळपटू ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’मध्ये सहभाग नोंदवत आहेत. टेनिसमधील चार ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या धर्तीवर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याला ‘फिडे’चा अधिकृत दर्जा नाही, पण बुद्धिबळविश्वात याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’चे वर्षभरात पाच टप्पे होणार असून अखेरीस सर्वाधिक गुण असणारा बुद्धिबळपटू विजेता ठरेल. यंदा हे पाच टप्पे वँगल्स (जर्मनी), पॅरिस (फ्रान्स), न्यूयॉर्क (अमेरिका), नवी दिल्ली (भारत) आणि केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) येथे रंगणार आहेत.