चंदीगढच्या सेक्टर १६ या ठिकाणी गांधी स्मारक आहे. या स्मारकावर कब्जा केल्याच्या आरोपात पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. त्यामुळे गांधी स्मारक सध्या चर्चेत आहे.
काय आहे गांधी स्मारक भवन?
गांधी स्मारक भवन हे चंदिगढच्या सेक्टर १६ मध्ये आहे. या स्मारक भवनाचं क्षेत्रफळ ५ हजार स्क्वेअफूट आहे. १९४८ ला महामत्मा गांधी यांच्या हत्येनंतर हे स्मारक भवन उभारण्यात आलं. सुरूवातीला या ट्रस्टचं नाव गांधी स्मारक निधी असं होतं. डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि जगजीन राम हे सगळे नेते या ट्रस्टचे संस्थापक आणि त्याचप्रमाणे विश्वस्त होते. १९५२ ते १९५९ या कालावधीत GSN चं काम दिल्लीतून चालत होतं.
गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…
गांधी स्मारक भवनात काय आहे?
गांधी स्मारकात महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शन आहे, अनेक छायाचित्रं आहेत. या ठिकाणी महात्मा गांधी यांचा आवाजही ऐकण्यास मिळतो. ११ जून १९४७ ला एक भाषण केलं होतं. त्या भाषणात महात्मा गांधी असं म्हणाले होते की जो आदमी खुदा से डरता हे उसे किसीसे डरने की जरूरत नहीं. आजही त्यांचे हे शब्द या भवनात असलेल्या संग्रहालयात जाऊन आपण ऐकून शकतो. २२ मिनिटं ४६ सेकंदांचं हे भाषण आपण हिंदी आणि इंग्रजीत ऐकू शकतो. या गांधी स्मारक भवनात जे संग्रहालय आहे तिथे महात्मा गांधी वापरत असत ते पाण्याचं मडकं, त्यांच्या खडावा तसंच त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक वस्तू पाहण्यास मिळतात.
महात्मा गांधी यांची शिकवण देशभरात पोहचावी म्हणून हे भवन उभारण्यात आलं आहे. या भवनात असलेलं संग्रहालय खास आहे. महात्मा गांधी यांच्यावर आधारित देशभरात अनेक संग्रहालयं आहेत. मात्र या संग्रहालयात महात्मा गांधी हे ज्या तुरुंगात राहिले होते तो तुरुंगही पाहण्यास मिळतो. महात्मा गांधी वापरत असलेले चष्मे आणि त्यांनी बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत कहो हे सांगणारी तीन माकडंही पाहण्यास मिळतात. महात्मा गांधी हे त्यांच्या आयुष्यात १३ वेळा तुरुंगात गेले होते.
देवराज त्यागी कोण आहेत? त्यांच्यावर फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
देवराज त्यागी हे मूळचे उत्तर प्रदेशातल्या मुराबादचे रहिवासी आहेत. १९८६ मध्ये गांधी स्मारक भवनचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती केली गेली तेव्हा देवराज त्यागी २४ वर्षांचे होते. ते उत्तर प्रदेशातले असल्याने त्यांना या ठिकाणी राहण्याची संमती देण्यात आली. इथे राहू लागल्याने काही कालावधीनंतर देवराज त्यागी यांचं लग्न झालं. देवराज त्यागी हे गांधी स्मारक भवनातच राहात होते. ३१ जानेवारी २०२२ ला ते निवृत्त झाले. मात्र त्यांनी आपल्याला इतक्या वर्षांच्या सेवेनंतर थोडी मुदतवाढ मिळावी ही विनंती केली. त्यांना मुदतवाढ दिली गेली मात्र तुम्ही कुठल्याही बेकायदेशीर घटना किंवा व्यवहारांमध्ये गुंतलेले आढळल्यास तुमची मुदतवाढ रद्द करण्यात येईल अशी अटही त्यांच्यापुढे ठेवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांचे राजकारणी आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी चांगले संबंध होते. २०१६ मध्ये त्यांनी एका वेगळ्या ट्रस्टची स्थापनाही केली होती. मात्र हे प्रकरण १६ ऑक्टोबर २०२२ ला उघड झालं. त्यांच्या निवृत्तीला मुदतवाढ दिल्यानंतरच्या दहाव्या महिन्यात हे प्रकरण समोर आलं. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.
चतु:सूत्र : गांधीजी समजून घेताना..
देवराज त्यागी यांचे गैरव्यवहार प्रकाशात कसे आले?
देवराज त्यागी यांनी गांधी जयंतीचं औचित्य साधून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यानंतर एक बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन केला. त्याआधारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला. या कार्यक्रमात उच्चपदस्थ अधिकारी आणि नेते मंडळी यांना बोलवण्यात आलं होतं. गांधी स्मारक निधी भवन नावाने ही ट्रस्ट देवराज त्यागींनी स्थापन केली होती. त्यानंतर आपणच याचे मालक असल्याचंही देवराज त्यागी यांनी सांगितलं. या प्रकरणी संस्थेच्या संचालकांना माहिती मिळाली. त्यानंतर चंदीगढचे प्रशासक बनवारी लाल पुरोहित यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
गांधी स्मारक भवन चालवणाऱ्या संस्थेचे सचिव आनंद शरण यांनी देवराज त्यागी यांच्या विरोधात सेक्टर १७ च्या पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्यामध्ये माजी संचालक देवराज त्यागी, पत्रकार भूपिंदर शर्मा, नरेश शर्मा, ईश्वर अग्रवाल, योगेश बहल, देवराज त्यागी यांची पत्नी कांचन त्यागी त्यांचा मुलगा मुदित त्यागी, सून अक्षा रैना, आनंद राव, पपिय चक्रवर्ती, अमित कुमार, मोहिंदर, रमा देवी आणि एम. पी. डोगरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कलम ४१९, ४२०, ४५८, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० ब च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आनंद शरण यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर जी चौकशी झाली त्यात हा सगळा घोटाळा उघड झाला.