भारतात आणखी नऊ उत्पादनांना भौगोलिक मानांकन (Geographical Indications,जीआय) प्राप्त झाले आहे. यामध्ये आसाममधील गामोचा, तेलंगाणामधील तंदूर रेड ग्रामी, महाराष्ट्रातील अलिबाग येथील पांढरा कांदा यांचाही समावेश आहे. पाच भौगोलिक मानांकन एकट्या कर्नाटक राज्यातील शेतिविषयक उत्पादनांना देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भौगोलिक मानांकन म्हणजे नेमकं काय? त्याचा उत्पादन, उत्पादकांना काय फायदा होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भौगोलिक मानांकन म्हणजे काय?

एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात आसेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी त्याचा फायदा उत्पादकांना होतो. भौगोलिक मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. कारण वेगवेगळ्या भौगौलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी भौगोलिक मानांकन महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा >>> विश्लेषण : चीनमध्ये करोनाचा उद्रेक, बदललेल्या निकषांमुळे मृतांच्या आकडेवारीबाबत संभ्रम; नेमकं काय घडतंय?

भौगोलिक मानांकनामुळे उत्पादकास कोणते अधिकार प्राप्त होतात?

भौगोलिक मानांकनामुळे उत्पादकाला अनेक अधिकार प्राप्त होतात. भौगोलिक मानांकनामुळे भेसळयुक्त उत्पादनाची निर्मिती तसेच विक्री करण्याास आळा बसू शकतो. उदाहरणादाखल दार्जिलिंग चहाचे उत्पादक अन्य ठिकाणी उत्पादित केलेल्या चहाला ‘दार्जिलिंग’ या शब्दाचा वापर करण्यास मज्जाव करू शकतात. दार्जिलंग येथे निर्माण होणाऱ्या चहाची गुणवत्ता अन्य ठिकाणी उत्पादित केल्या जाणाऱ्या चहाच्या गुणवत्तेपेक्षा वेगळी असते. याच कारणामुळे भौगोलिक मानांकनाच्या नियमांनुसार दार्जिलिंग चहाचे उत्पादक अन्य चहा उत्पादकांना दार्जिलिंग हा शब्द वापरण्यास मनाई करू शकतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : मालिकेच्या सेटवर आत्महत्या अन् बॉयफ्रेंडला अटक; अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरण नेमकं काय?

भारतामध्ये कोणत्या राज्यात किती भौगोलिक मानांकन आहेत?

भौगोलिक मानांकनाचा उपयोग हा त्या उत्पादनाच्या संरक्षणासाठी होतो. शेती, अन्न, वाईन, स्पिरिट्स, हस्तकला, औद्योगिक उत्पादने या क्षेत्रांत उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना भौगोलिक मानांकने दिली जातात. भारतामध्ये सध्या एकूण ४३२ उत्पादनांना भौगोलिक मानांकने आहेत. यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांना सर्वाधिक भौगोलिक मानांकने मिळालेली आहेत. भौगोलिक मानांकने मिळालेल्यांपैकी ४०१ मूळचे भारतीय तर ३१ उत्पादने परदेशातील आहेत. कर्नाटक, तामिळनाडू यांच्याकडे सर्वाधिक भौगोलिक मानांकने आहेत. तर उत्तर प्रदेशकडे ३५, महाराष्ट्र ३१ आणि केरळ राज्याकडे ३५ भौगोलिक मानांकने आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: जीभ स्वच्छ करण्यासाठी चरक संहितेत सांगितली आहे योग्य पद्धत; तुम्ही चुकताय का? जाणून घ्या नियम

भारतातील प्रसिद्धा भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादने

दरम्यान, भारत सरकारने आगामी तीन वर्षांमध्ये भौगोलिक मानांकनाचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सरकारने ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भारतात भौगोलिक मानांकन मिळालेली अनेक प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये बासमती तांतूळ, दार्जिलिंग चहा, चंदेरी फॅब्रिक, मैसुर सिल्क, कुल्ली शॉल, कांग्रा चहा, तंजावूर पेटिंग्ज, अलाहाबाद सुर्खा, फारुखाबाद प्रिंट्स आदी उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is geographical indication tag know detail information and rules prd